आपण सारेच उत्सवप्रिय आहोत. आपल्याकडे सातत्याने उत्सव साजरे होत असतात. समारंभ होत असतात कार्यक्रमही होत असतात. उत्सव आणि कार्यक्रमात आपल्याकडे फारच उत्साह संचारलेला पहायला मिळतो.
कार्यक्रमाचे तर विचारूच नका. कार्यक्रम कोण केव्हा कसा घेईल हे सांगता येत नाही. त्यातही नाना तऱ्हा असतात कार्यक्रमाच्या. कार्यक्रम घेणारेही फारच बहादर असतात. बहादर या साठी म्हणायचे की त्यांनी कार्यक्रम ठरवलेला असतो. हा झाला एक भाग दुसरे म्हणजे कार्यक्रम करणारे जे असतात ते त्याहूनही बहादर असतात. कारण त्यांना सर्व नियोजन करायचे असते.आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, म्हणजे काय होतं. आपण सभागृहात जातो. तिथे असलेल्या खुर्चीवर जाऊन बसतो. आपल्या अवती-भोवती अनेक मंडळी येऊन बसतात. यथावकाश कार्यक्रम सुरू होतो. आपल्याला तो आवडला तर आपण थांबतो. नाही तर काढता पाय घेतो. इतकाच काय तो संबंध येतो कार्यक्रमाचा आणि आपला… पण…
कार्यक्रम घडण्याआधी जे काही होतं ते फार गमतीशीर आणि डोक्याला ताप देणारं असतं. उदाहरणार्थ- कार्यक्रम ठरवण्यापासून सुरवात करू या. कोणता कार्यक्रम घ्यावा यासंबंधी बैठक बोलवलेली असते, त्यावेळी उपस्थित जणांपैकी बोलणारे दोन-तीन लोकच असतात. बाकी सारे ऐकणारे असतात. जे बोलणारे असतात त्यांच्या फारसे एकमत होत नाही. कारण कुणीतरी एखादा पाहुणा सुचवला की दुसरा त्याला आक्षेप घेतो. पहिल्याने एखादी गोष्ट सुचवली की तिसरा त्याला विरोध करतो. बाकी सगळे ऐकत असतात. हे सारे घडत असताना कार्यक्रमही आकाराला येत जातो. मुळ कल्पना ज्याची असते कार्यक्रमासंबंधी तो केव्हाच बाजुला सारला गेलेला असतो. कारण तो जास्त बोलत नसतो, जे बोलणारे असतात त्यांच्या मर्जीनुसार कार्यक्रमाची रुपरेषा ठरत जाते. मग कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य कुणी आणायचे, पाहुण्यांचे स्वागत कुणी करायचे. स्वागतासाठी फुलं कुणी आणायची. फुल आणायची का बुके आणायचा. दीपप्रज्वलनासाठी समयी कुणी आणायची. व्यासपीठाची जबाबदारी कुणाला द्यायची, सुत्रसंचालन कुणी करायचं, आभार कुणी मानायचे या गोष्टी ठरतात. त्यावर एकमत व्हायला वेळच लागतो. ते काही पटकन ठरत नाही. कसेतरी करून या साऱ्या गोष्टी ठरतात..
मग पुढे कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. कार्यक्रमाची वेळ जवळ आलेली असते, व्यासपीठाची सजावट सुरूच असते. कुणीतरी तेथे बॅनर आणतं. सभागृहात दोघे जण उभे असतात, त्यांना विचारून बॅनर बरोबर व्यासपीठाच्या मध्यभागी येतेय काय? सरळ लागले आहे का? वर हवे की खाली करावे…या सारखे प्रश्न विचारले जातात, मग बॅनर लावायचे कशाने हा एक प्रश्न पुढे येतो. कारण ते लावण्यासाठी लागणारे साहित्य जो आणणार असतो तो अद्याप आलेला नसतो. मग कुणीतरी धावत जाऊन सेलो टेप, पिना असे काही तरी आणतो. त्याचा वापर करून बॅनर लावण्याचा कार्यक्रम एकदाचा पार पडतो. सारे जुजबी सामान वापरून बॅनर लावलेले असल्याने ते कितपत टिकाव धरेल याची भीतीच असते… असो.
हे सारे पार पडते त्या दरम्यानच्या काळात कुणीतरी व्यासपीठावर दीपप्रज्वलनासाठी समयी आणून ठेवतो. त्या भोवती रांगोळी देखील काढली जाते. याच काळात व्यासपीठावर खुर्च्या आणुन ठेवल्या जातात. फोटो आणुन ठेवला जातो. हे सारे होत असताना कार्यक्रमाच्या नियोजकाचा फोन येतो… तो चौकशी करतो तयारी झाली का म्हणून… दीपप्रज्वलनाची समयी कुठे ठेवली, फोटो कुठे ठेवला हे देखील तो फोनवरूनच विचारतो आणि तेथूनच तो सूचना करायला लागतो. त्याच्या सूचनेनुसार मग समयीची जागा बदलली जाते. आधीच्या जागेवरून दुसऱ्या जागेवर ती ठेवली जाते. आधीच्या ठिकाणी काढलेली रांगोळी पुसुन दुसऱ्या ठिकाणी रांगोळी काढली जाते. फोटोची देखील जागा बदलली जाते. सारे निटनिटके झाले ना याची खात्री वारंवार केली जाते. हार, पुष्पगुच्छ, स्वागताचे साहित्य या साऱ्या गोष्टींची तपासणी केली जाते. हे सारे होत असताना सुत्रसंचालकाचा पत्ता नसतो. आभार ज्याने मानायचे असतात तो आधीच येऊन उभा असतो. सारी तयारी झाल्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांची वाट पाहिली जाते. ते नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेपेक्षा उशीराने येतात. दीपप्रज्वलनाची वेळ जवळ येते तसे लक्षात येते की मेणबत्ती आणली पण आगपेटी राहिलीय. मग व्यासपीठाच्या मागे पुन्हा धावाधाव सुरू होते. सिगारेट ओढण्याची सवय कुणाला आहे, याचा शोध घेतला जातो, त्याच्या खिशातून आगपेटी आणून दिपप्रज्वलन केले जाते. उदघाटन होते. कार्यक्रम सुरू होताना देखील बराच गोंधळ उडालेला असतो. ज्याने स्वागत करायचे असते, त्याचे नाव घेऊनही तो न येणे, स्वागताच्या साहित्यात काही तरी राहणे, व्यासपीठावर बसलेल्यांपैकी कुणाचंतरी नाव सूत्रसंचालक विसरणे या सारख्या अनेक गोष्टी घडत असतात.
अर्थात या साऱ्या गोष्टी सगळ्याच ठिकाणी घडत असतील असे नाही. काही ठिकाणी नेटकं नियोजन असत, शिस्तबद्धपणे कार्यक्रम पार पडतात हे देखील तितकेच खरे…
— दिनेश दीक्षित
(१२ एप्रिल २०१८)
Leave a Reply