रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य.
‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. ‘संगमेश्वर’ गावाचे खरे नाव ‘नावडी’. इसवी सनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्ये होती, त्यांपैकी जैन पंथीयांची राजधानी कपिलतीर्थ (कोल्हापूर) येथे होती, परंतु संगमेश्वर हे त्यांचे राज्यकारभाराचे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशी घराण्याचे राज्य आले. त्यांच्यापैकी एका राजाची राजधानी संगमेश्वर येथे होती.
राष्ट्रकूट वंशातील राजांनी चालुक्य घराण्याचा नाश सन 753 मध्ये करून येथे सुमारे दोनशे वर्षें राज्य केले. पुन्हा चालुक्य घराण्यातील काही राजांनी राष्ट्रकुटांचा पराभव केला. त्यांची सन 973 पासून सन 1130 पर्यंत सत्ता होती. इसवी सन 1130 च्या सुमारास कपिलतीर्थ येथील जैन राजा शोणभद्र याने चालुक्य राजांचा पराभव करून संगमेश्वरचे राज्य त्याच्या राज्याला जोडले. नंतर पुन्हा चालुक्य राजांनी राजा शोणभद्र याच्या वंशजांचा पराभव करून त्याचे राज्य प्रस्थापित केले, ते 1470 पर्यंत! त्या घराण्याचा शेवटचा राजा ‘जाखुराय’ याचा मुसलमानांनी पराभव केला आणि संगमेश्वर येथे मुसलमानांचा प्रवेश झाला. ती मुसलमानी सत्ता पुढे सुमारे एकशेएक्याण्णव वर्षें म्हणजे 1661 पर्यंत होती. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी तेथे स्वारी करून विजापूरकरांचे अंकित सरदार शिर्के, दळवी, सुर्वे, सावंत, मोहिते इत्यादींचा पराभव केला व मराठी राज्याची सत्ता स्थापन झाली. पुढे, संगमेश्वर मराठा सत्तेतच राहिले. पुढे संभाजी महाराज पकडले गेले, ते कसबा संगमेश्वरमध्ये. तावडे बंदरात मुकर्रबखानाचा मुलगा इखलासखान याने संभाजी महाराजांना अटक केली. त्या घटनेने संगमेश्वरचे नाव दु:खद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी घटनेने इतिहासात नोंदले गेले. ती तारीख होती, 3 फेब्रुवारी 1682.
मराठी राज्यामध्ये त्या भागाची महसूल व्यवस्था ज्या सरदेसाई घराण्याकडे होती त्या सरदेसाई घराण्याचे वंशज कसब्यात आहेत. संभाजी महाराज सरदेसाईंच्या ज्या वाड्यामध्ये पकडले गेले त्या वाड्याच्या खाणाखुणा, त्याच्या मागील बाजूस असलेली काही शिल्पे, भग्नावस्थेतील काही शिवमंदिरे पाहण्यास मिळतात!
गुजरातचा चालुक्य (चौलुक्य) राजा कर्ण त्या ठिकाणी इसवी सन 1064 च्या सुमारास राज्य करत होता. तो कदंब राजांचा जावई होता. त्याने त्या काळात दहा हजार सुवर्णमुद्रा खर्च करून तेथे शिवमंदिर बांधले. ते त्याच्या नावाने ’कर्णेश्वर शिवमंदिर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते मंदिर शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिराची रचना हेमाडपंथीय असल्याचे म्हटले जाते. मात्र हेमाद्री तथा हेमाडपंडित तेराव्या शतकातील आहे. त्यामुळे ते मंदिर हेमाडपंथी असू शकत नाही. प्रत्यक्षात ते भूमीज शैलीतील मंदिर आहे. श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे हजार वर्षांनंतरही सुस्थितीत पाहण्यास मिळते. सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रात काळ्या पाषाणात कोरीव काम केलेले असे ते मंदिर कसब्याचे पौराणिक महत्त्व टिकवून आहे.
कर्णराजाने कर्णेश्वराच्या पूजाअर्चेच्या वेगवेगळ्या कामांसाठी सात गावे दिली होती. धर्मकार्यार्थ-धर्मपूर (धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, भेट म्हणून देवजी भूचल, तुपासाठी शिवनी (शिवने), यज्ञासाठी लवल (लोवले), फळांसाठी धमनी (धामणी), धर्मसेवकांसाठी करंबव (कळंबस्ते), निवासार्थ आम्रवल्ली (अंत्रवली). त्यां पैकी गुणवल्लिका आणि भूचल या गावांचे संदर्भ सापडत नाहीत. कर्णराजाने कर्णेश्वर मंदिराच्या निमित्ताने त्यावेळी तीनशेसाठ प्रासाद म्हणजे मंदिरे बांधली होती. त्यांतील काही मंदिरे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. त्यांमध्ये कुंभेश्वर, सोमेश्वर, काशीविश्वेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश (संगम मंदिर) व कालभैरव यांचा समावेश आहे. कोकण परिसरात वैष्णवपंथीयांचे प्रमाण अधिक आहे. त्यांनी नंतरच्या काळात कर्णेश्वर मंदिराला कळस चढवला असावा. कारण सबंध मंदिर एका दगडात आहे. कळस दगड, माती आणि विटा यांनी बांधलेला आहे. त्या काळात देवळे दगडात कोरली जात होती, त्यांचे कळस माती-विटांनी तयार झालेले नसत. वैष्णवपंथीयांनी बांधलेल्या देवळांना कळस उंच असतात. पण दक्षिणेकडील शैवपंथीयांनी बांधलेल्या मंदिरांना तसे उंच कळस नसतात. कर्णेश्वर मंदिरात पावसाचे पाणी गळत होते, म्हणून 2003-04 या वर्षी मंदिराच्या तीन छोट्या कळसांमध्ये थोडी दुरुस्ती करण्यात आली. तेव्हा ते कळस दगडमाती, विटांचे आहेत आणि त्यांना गूळ आणि चुना यांचे प्लास्टर करण्यात आले आहे ही बाब स्पष्ट झाली.
कर्णेश्वर मंदिरात आतील बाजूच्या दगडात देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. मंदिरावर जे चार कळस आहेत ते खालच्या बाजूने झुंबरासारखे कोरण्यात आले आहेत. मूळ मंदिर हे कळसरहित होते. नंतरच्या काळात कधीतरी त्यावर कळस चढवण्यात आले. त्यातून पावसाचे पाणी गळते, म्हणून त्या कळसांचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याखेरीज त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आलेली नाही. ते मंदिर आहे तसेच सुबक दिसते.
सह्याद्री खंडातील वर्णनाप्रमाणे कसबा क्षेत्राच्या आठ दिशांना आठ तीर्थे होती. पूर्वेला कमलजा तीर्थ, गोष्पदतीर्थ, दक्षिणेला अगस्तीतीर्थ, आग्नेयेला गौतमीतीर्थ, नैर्ऋत्येला एकवीरातीर्थ, पश्चिमेला वरुणतीर्थ, वायव्येला गणेशतीर्थ, उत्तरेला मल्लारी मयतीर्थ व ईशान्येला गौरीतीर्थ अशी त्यांची नावे आहेत. त्यांपैकी आग्नेय दिशेचे गौतमीतीर्थ युक्त असे ते तीर्थ भैरवाने व्यापले आहे (त्या ठिकाणी स्नान करून व ते जलप्राशन करून मनुष्यप्राणी ब्रह्मलोकाला जातो अशी समजूत) व त्याच्या पश्चिमेला ज्ञानव्यापी या नावाने विख्यात महातीर्थ अशी तीर्थे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. दक्षिणकडे डोंगरात वसलेले सप्तेश (सप्तेश्वर) हे ठिकाणही कसब्याचे वैभव म्हणावे असे आहे. रामक्षेत्रामध्ये पवित्र अशी दहा क्षेत्रे सांगितली आहेत. त्यांपैकी सहा विशेष श्रेष्ठ आहेत. त्यांची नावे- गोकर्ण, सप्तकोटीश, कुणकेश, संगमेश्वर, हरिहर आणि त्र्यंबकेश्वर. म्हणजेच, रामक्षेत्रात सांगितलेल्या पहिल्या सहा श्रेष्ठ अशा क्षेत्रांत चौथे क्षेत्र ‘संगमेश्वर’ आहे.
कसबा संगमेश्वराचे आध्यात्मिक महत्त्वही सर्वोच्च आहे. कार्तिकस्वामी व सूर्यनारायण अशी अभावाने आढळणारी दोन मंदिरे कसब्यात आहेत. चालुक्य घराण्यातील शेवटचा राजा ‘जाखुराय’ याच्या नावावरूनच त्या गावाच्या ग्रामदेवतेचे नाव ‘जाखामाता’ असे पडले असावे असा एक समज आढळतो. मात्र जाखमाता ही स्त्रीदेवता आहे आणि पुरूषाची स्त्री देवता होत नाही. त्यामुळे तो अंदाज चुकीचा असल्याचा तर्क करता येतो. जाखामातेचा ‘शिंपणे’ उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
– निबंध कानिटकर
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply