नवीन लेखन...

कसे आहेत नवे मुख्यमंत्री ?

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर वारसदार म्हणून अनेक नावे पुढे आली. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे ही दोन नावे आघाडीवर राहिली पण निवड पृथ्वीराजजींचीच झाली. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हे महत्त्वाचे घटक होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता पृथ्वीराजींची निवड सार्थ ठरते.अशोक चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या वारसदारांविषयी चर्चा सुरू होती. या निवडीचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना देण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणांचे नाव मुख्यमंत्रीपदी निश्चित करण्यात आले. या पदाच्या शर्यतीत अंतिम टप्प्यात केवळ पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे या दोनच नावांची चर्चा होती. त्यातही पृथ्वीराज चव्हाणांचे नाव अखेरपर्यंत आघाडीवर हते. आदर्श घोटाळा प्रकरणात अडकल्यामुळे अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारी व्यक्ती निष्कलंक चारित्र्याची असावी असा सूर होता. राहूल गांधी यांनीही असे मत व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांची निवड निश्चित असणार हे उघड होते.वास्तविक मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. सध्या देशात आणि राज्यात घराणेशाही आहे. शिवाय भारतीय राजकारणात बड्या घराण्याला छोट्या घराण्याने जोहार करण्याची प्रथा आहे. त्यामुळे गांधी-नेहरु घराण्याला पिढ्यान् पिढ्या निष्ठा वाहण्याची परंपरा कोणत्या घराण्यात आहे हा घटक सर्वात महत्त्वाचा ठरतो. त्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खास विश्वासातील म्ह
ूनही पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यांना काँग्रेसचे आमदार नेता मानतील हा प्रश्न उभा राहू शकत नाही. कारण दिल्ली ज्या नेत्याला मानते त्याला काँग्रेसवाले मानतात असा आजवरचा इतिहास आहे. आपला स्वार्थ साधला गेला नाही तरच बंडखोर बंडखोरी करतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस तसेच घटक पक्षाचा जवळपास प्रत्येक

आमदार

पृथ्वीराज चव्हाणांना निष्ठा वाहील यात शंका नाही.पृथ्वीराज चव्हाणांचे मूळ गाव कर्‍हाड. त्यांचे वडिल आनंदराव चव्हाण केंद्रीय मंत्री होते. आई प्रेमलाकाकी चव्हाण यांनी काही काळ प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. पृथ्वीराज चव्हाणांचे प्राथमिक शिक्षण कऱ्हाड येथे तर माध्यमिक शिक्षण दिल्ली येथे झाले. नंतर त्यांनी बिलार् इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी प्राप्त केली. नंतर युनेस्कोच्या शिष्यवृत्तीतून जर्मनीत तांत्रिक शिक्षण घेतले. पुढे कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठातून इंजिनिअरिंगची मास्टर डिग्री संपादन केली. नंतर चार वर्ष अमेरिकेत संशोधक म्हणून काम केले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानात वापरल्या जाणार्‍या विविध उपकरणांच्या संशोधनात मोलाची भर घातली. पुढे दिल्लीला परतल्यावर त्यांनी संशोधन प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार संगणक आणि लष्करासाठी लागणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या संशोधन आणि निर्मितीचे कार्य हाती घेतले. त्यातून गेल्या २० वर्षात हवाई बचाव संरक्षक प्रणाली, पाणबुडी विरोधी युध्दप्रणाली, क्षेपणास्त्र नियंत्रण प्रणाली याशिवाय रडार, दूरसंचार, टेलिग्राफ, स्विचिंग यासारख्या अनेक प्रणालींमध्ये चव्हाणांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.अशा तज्ज्ञ आणि अभ्यासू
ृथ्वीराज चव्हाणांना राजीव गांधी यांनी सक्रिय राजकारणात आणले. चव्हाण 1991 मध्ये प्रथम काँग्रेसच्या तिकीटावर कर्‍हाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. 1993 मध्ये त्यांची पक्षाच्या संसदीय कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. दहाव्या लोकसभेत त्यांनी विविध समित्यांवर प्रतिनिधित्व केले. अकराव्या लोकसभेत खासदार म्हणून त्यांची पुन्हा निवड झाली. पक्षाचे उपप्रतोद तसेच संसदीय मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 1992 मध्ये इंग्लंडमधील तसेच 1994 मध्ये पॅरिस आणि टोकियो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परीषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 1995 मध्ये इंग्लंडमध्ये पार पडलेल्या निवडणुकी दरम्यान झालेल्या हुजूर पक्षाच्या वार्षिक अधिवेशनात त्यांनी निरिक्षक म्हणून मोलाची कामगिरी बजावली. उत्तम खेळाडू, अभ्यासू वृत्ती आणि दांडगा व्यासंग ही पृथ्वीराज चव्हाणांच्या स्वभावाची आणखी काही वैशिष्ट्ये. 2002 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. 2008 मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आणि आजही ते या पदावर कार्यरत आहेत. या शिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला आहे. जातीय राजकारणापासून दूर असणार्‍या पृथ्वीराज चव्हाणांची कमालीची पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य यामुळे त्यांचे नाव कायम आदराने घेतले जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड सार्थ ठरते.असे असले तरी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांना काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. एक म्हणजे त्यांनी 1999 नंतर एकही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणापासून ते दूर राहिले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना य

ेत्या सहा महिन्यात विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी एक सभागृहाचे सदस्यत्व स्वीकारावे लागणार आहे. त्यातही विधानसभा सदस्य व्हायचे तर सुरक्षित मतदारसंघाचा शोध घ्यावा लागेल. त्यांच्या परंपरागत सातारा जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. अशा वेळी राष्ट्रवादी कोणता मतदारसंघ सोडणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांची विधान परिषदेवर निवड होणे अधिक श्रेयस्कर ठरेल.आगामी काळात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम करण्याचे आव्हानही नव्या मुख्यमंत्र्यांसमोर राहणार आहे. प्रशासन पुरेसे कार्यक्षम नसल्याने केंद्र शासनाची अनेक अनुदाने खर्चाअभावी शिल्लक राहतात किंवा काही वेळा प्रस्ताव न गेल्याने अनुदाने मिळत नाहीत. या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्या लागणार आहेत. देशातील बहुतांश राज्यांना केंद्रीय विद्यापीठे मिळाली. मात्र, यात महाराष्ट्राला अद्यापही यश आलेले नाही. त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मुख्य म्हणजे हे आघाडी सरकार असल्याने घटक पक्षांना विश्वासात घेऊन कारभार करावा लागणार आहे. विशेषत: राष्ट्रवादीची कितपत आणि कशी साथ मिळते यावरही बरेच काही अवलंबून आहे.या स्रर्‍या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांचा कारभार कितपत उजवा ठरतो ते आता

पहायचे.(अद्वैत फीचर्स)

— अभय देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..