आमच्या वडिलांच्या पिढीने घरात वयस्कर आई-वडिलांना सांभाळले आहे. त्यांच्यासोबत कधी काका किंवा आत्यालाही आसरा दिलेला आहे.. कालांतराने कुटुंब छोटी होत गेली. घरात कुणी मोठं माणूस राहिलं नाही. शहरातून राजा-राणीच्या संसारात, वृद्धांची अडगळ नकोशी वाटू लागली..
खेड्यात अजूनही काही घरांमध्ये वयस्कर दिसतात, मात्र शहरात दिसत नाहीत.. या बदलामुळे आपण किती गोष्टींना मुकलोय, त्यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप..
पूर्वी ज्या घराला उंबरठे आणि घरात मोठी माणसं असायची, त्या घराचा कारभार धाकात आणि मर्यादेत चालायचा. संध्याकाळी प्रत्येकानं सातच्या आत घरात हजर असणं, आवश्यक असायचं..
कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याआधी घरातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या अनुभवी सल्ल्याने कार्य निर्विघ्न पार पडायचे. घरातील देवघरानंतरचं महत्त्व, त्यांना आदरपूर्वक दिलं जायचं..
आता सगळीकडे आधुनिक काळानुसार, घरात साधी फरशी जाऊन गुळगुळीत टाईल्स बसविल्या जातात. सहाजिकच त्यापासून पायांना त्रास होऊ नये म्हणून देवघरापासून, स्वयंपाकघरातही सर्रास चपला वापरल्या जातात. पूर्वी चपला या दाराशी, बाहेरच असायच्या..
घरात मोठी माणसं नसल्याने ‘धाक’ हा प्रकार राहिलेला नाही. मुक्त जीवनात, संस्काराला थारा नाही. मर्यादा, शिस्त, संस्कृती या शब्दांचे अर्थ नव्या इंग्रजी माध्यमातील पिढीला माहीत नाहीत. विचारले तर त्यांना आज ‘गुगल’चा आधार घ्यावा लागतो…
पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसं सांगायची. त्यासाठी मोठी माणसं घरात हवीत. संध्याकाळी शुभं करोती, रामरक्षाचे स्वर कानावर पडायलाच पाहिजेत. रात्री घरी यायला उशीर झाला तर, काळजीपोटी चौकशी ही झालीच पाहिजे..
रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी सकाळी त्याला फोडणी, तडका देऊन चटपटीत करुन वाढणारं कुणीतरी मोठं माणूस पाहिजे.. मोजून मापून खर्च कसा करायचा, याचे धडे देणारं.. काही चुकलं असेल तर खडसावणारं व चांगल्या कामासाठी कौतुक करणारं मोठं माणूस घरात असायलाच पाहिजे…
एकाच छताखाली सर्वांना एकोप्याने बांधून ठेवणारं, टीव्ही बंद करुन खेळीमेळीने जेवण करायला लावणारं, घराबाहेर पडताना देवघरातील अंगारा कपाळावर लावायला सांगणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं व संकटाच्या वेळी देवांना पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं कुणीतरी मोठं माणूस घरात असायलाच हवं..
पिकलेले पांढरे केस असू देत की, अंधुक झालेली नजर. आशीर्वाद देताना थरथरणारे हात असू देत की, सुरकुत्या पडलेलं शरीर. लिंबू मिरचीला मानणारे विचार असू दे की, कावळ्याच्या शापाने घाबरणारं मन. एकच गोष्ट चारवेळा सांगणारे असो किंवा गप्पं राहणारे तोंड.. कसं का असेना, मात्र घरात असावं, एकतरी मोठं माणूस…
ज्या झाडाला फळे, फुलं येत नाहीत.. त्याला आपण बिनकामाचं झाड म्हणतो, पण ते सावली तरी देतच ना? त्या सावलीसारखीच घरातील मोठी माणसं असतात..
त्यांच्या असण्यानेच नकळत आपल्याला खूप मोठा आधार असतो. घरातून बाहेर पडताना, पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी घरात ही दैवतं, सदैव असायलाच हवीत…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२१-७-२१.
Leave a Reply