‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध करून मुहूर्तमेढ रोवणारे काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म २ नोव्हेंबर १८७१ रोजी आजगाव येथे झाला. काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती आणि बंगाली संस्कृतीची चांगली माहिती होती. ते बंगाली साहित्याचे अनुवादक होते. त्यांनी १८९५ साली ‘मासिक मनोरंजन’ सुरू केलं आणि पुढे १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक काढला होता. त्यांनी मुद्दाम बंगाली वाटणारं असं ‘मित्र’ हे आडनाव घेतलं होतं आणि त्याच आडनावाने ते पुढे ओळखले गेले.
इंग्लिश मासिकांचा ख्रिसमस स्पेशल दिवाळी अंक असतो, तसाच मराठीत असावा आणि बंगाली संस्कृतीतही तशी परंपरा होती म्हणून त्यांनी मराठीत दिवाळी अंक काढायचं ठरवलं आणि १९३५पर्यंत नेटाने तो अंक चालू ठेवला. त्यांनी कविता, गोष्टी, कादंबऱ्या, विनोद, अध्यात्म, साहित्य समालोचन, काव्य चर्चा अशा विविध प्रकारचा मजकूर ‘मासिक मनोरंजन’मधून प्रसिद्ध करायला सुरुवात केली होती. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, केशवसुत, काशीबाई कानिटकर, वा. व. पटवर्धन, गो. चिं. भाटे असे अनेक साहित्यिक त्यांनी जोडले होते. वंगजागृति, धाकट्या सूनबाई, मृणालिनी, प्रियंवदा, लक्ष्मणमूर्च्छा, रामविलाप, गरीब बिचारी यमुना, ही रामाची अयोध्या, बाळंतपण असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांचे २३ जून १९२० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply