अवंतीपूर !
एके काळची काश्मिरची राजधानी .
श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !
कलात्मकता , काव्यात्मकता , कौशल्य , कणखरपणा यांचा अद्वितीय संगम !
राजाधिराज अवंतीवर्मन यांनी आठव्या शतकात वसवलेली अद्वितीय , अप्रतिम राजधानी !
चिनार , देवदार सारख्या दीर्घायुषी वृक्षांची जाणीवपूर्वक केलेली लागवड आणि जोपासना जिथे आजही अनुभवायला मिळते…
हिमशिखरांचे अचंबित करणारे तेजस्वी दर्शन जिथून घडते …
एरव्ही इतरत्र अप्राप्य असणारे , पण जिथे पाऊल ठेवताच प्रसन्न , शुद्ध हवेची ग्वाही देणारे …
नानाविध फुलांच्या मोहमयी गंधात आकंठ बुडत असताना आपली जाणीव जागृत ठेवणारे …
समृद्धीच्या काळात सदैव प्रजेच्या हिताची कामे करीत असताना हिंदू संस्कृतीचा , प्राचीन परंपरांचा आणि चौदा विद्या , चौसष्ट कलांचा एकत्रित अनुभव देणारे अवंतिस्वामी हे विष्णू मंदिर …
तिथून जवळच असणारे श्री शिवेश्र्वर हे भगवान शंकरांचे मंदिर …
सृष्टीच्या उत्पत्ती , स्थिती , लय या चक्राची कल्पना देणारे भव्य दिव्य वास्तुशिल्प…
हे सगळे जिथे आहे ते अवंतीपूर पाहायचे आणि धन्य व्हायचे .
असे मनोमन ठरवले होते .
मनाच्या कॅनव्हास वर कितीतरी चित्रे रंगवली होती .
पण…
बसमधून उतरल्यावर नजरेला पडले ते भव्यतेचे भग्नावशेष !
होय !
भग्नावशेष !!
नजर जाईल तिकडे केवळ आणि केवळ उद्ध्वस्त अवशेष .
— मी मनानं आत्ता तिथे आहे .
सभोवताली पडके खांब दिसत आहेत . त्याही स्थितीत त्यांची भव्यता , उंची आणि त्यावरील कोरीव काम दिसत आहे .
श्रद्धेला हाकारणारी मंदिरे आहेत पण त्यातील देवतांच्या मूर्ती छिन्नविच्छिन्न झाल्या आहेत .
सांस्कृतिक , पौराणिक कथाशिल्पे साकारणारी शिल्पकारांची अद्वितीय कलाकुसर पहायला मिळते आहे , पण त्यावर उन्मत्त , परकीय आक्रमकांच्या क्रूर छिन्नी हातोड्याचे घाव अगदी ताजे वाटावेत असे दिसत आहेत . आणि मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांच्या डोळ्यातील वेदना रक्ताळल्या अश्रूंनी ठिबकत आहेत .
भग्न मूर्ती , झिजलेले पण तरीही खंबीर उभे असणारे खांब , अजूनही नाजूक वाटणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या कमानी , वाहतुकीची कसलीही आधुनिक साधने उपलब्ध नसताना , बांधकामासाठी वापरलेले अजस्त्र पाषाण , इतस्ततः पसरलेले दगडगोटे , झेलम नदीचे साहचर्य आणि हे सर्व पाहताना अचंबित होणारा मी .
– अनेकजण फोटो काढत होते .
वेगवेगळ्या पोझेस घेऊन फोटोत आपली छबी कशी चांगली दिसेल असा विचार करून , लाइक्स कमेंट्स चा हिशोब मांडून लगेच सोशल मीडियावर टाकत होते .
फोटोचा मोह मलाही झाला .
काढले सुद्धा फोटो .
ज्यांना फोटो काढायला सांगत होतो , त्यांना आवर्जून सांगत होतो …
परिसराची भव्यता दिसेल आणि त्या पार्श्वभूमीवर माझे क्षुद्रत्व दिसेल असेच फोटो काढा .
कारण स्वतःच्या क्षुद्रत्वाची जाणीव असेल तर समोरची कुठलीही गोष्ट मनात आतपर्यंत भिडते . विश्वाच्या पसाऱ्यात आपले स्थान काय आहे , याच्या जाणिवेतून , अहंकाराच्या पोकळ आभासी विश्वातून आपण जमिनीवर येतो .
त्यासाठी फोटोत , आपण कमी आणि भव्यता जास्त दिसायला हवी असा माझा आग्रह असतो .
अर्थात हा विचार माझ्यापुरता .
अवंतीपूर मंदिर पाहताना असं खूप काही जाणवून गेलं .
त्याचा इतिहास गाईड सांगत होता . आम्ही ऐकत होतो .
फिरत होतो . फोटो काढत होतो .
फिरताना बाहेरच्या बाजूला असणाऱ्या चिनारच्या प्रचंड मोठ्या जुन्या वृक्षाजवळ आलो आणि तिथून मंदिराकडे पाहिलं .
आणि एक गोष्ट पुनः पुन्हा जाणवली .
गाईड सांगत होता की हे मंदिर महापुरात किंवा मोठ्या भूकंपात नष्ट झाले असावे .
पण नैसर्गिक आपदा निवडक वस्तू नष्ट करीत नाहीत , महापुरात किंवा भूकंपात सरसकट सगळंच संपून जात असतं .
इथे मंदिरं होती , पण मूर्ती नव्हत्या .
शिल्पाकृती होत्या पण त्या कुणी विकृतानी तोडल्यासारख्या होत्या .
मंदिराच्या रूपानं उभी असणारी प्राचीन , समृध्द संस्कृती नष्ट केलेली दिसत होती .
आणि हे काम परकीय आक्रमकांखेरीज अन्य कुणाचे असणार ?
पण इतिहास काही वेळेला अबोल होतो आणि मग जे दिसेल ते पाहावे लागते . कुणी सांगेल ते ऐकावे लागते . धावपळीच्या युगात इतिहास अबोल होतो .
हेही जाणवले .
तरीही अवंतीपूर मनात घर करून राहिले .
अजूनही .
( क्रमशः)
– श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
—————————————-
Leave a Reply