काटेरी जखमांवर रुतणाऱ्या वेदना
मनाला हलकेच तडा देऊन गेल्या,
तेव्हाच तुझ्या मिठीचा ध्यास तनुभर
मोरपीस अलवार मोहक फिरवून गेला
व्यकतेत माझ्या दुःखच डोळ्यांत तरळले
माझ्याच दुःखाचे पड तुझ्या मोहात मिटले,
दुःख लपवता अधिक ते डोळ्यांत साचले
नागवे सत्य आनंदाचे हवेत केव्हाच विरघळले
तुझ्या कक्षेत माझे येणे कधीच नव्हते
न कुठला अट्टहास न हट्ट काही होते,
नकळत तुझ्या मोहाचे मनात दव भिजले
नव्हता ध्यास कुठला नव्हते मनात मोह चांदणे
परी आलास तू वादळ होऊन अवचित पणे
माझेच मला न कळले मोहाचे फसवे जाळे,
गुंतले मोहाच्या नकळत धाग्यात अलगद रे
अन दुःख अधिक आता अंतरगी वाढले
का भुलवितो चंद्र चांदण्यांना आकाशी
चांदणे मधुरम आकाशी असे सजते,
दिसते समोर मृगजळ फसवे मजला
परी कासावीस जीव जलात मी फसते
कसली ही शिक्षा अंतरी अनामिक
न गुलाब परी काटेरी सल बोचते,
कितीक सोडवू मी स्वप्न बावरे क्षण ते
न मनाला काहीच कधी न उमगते
कितीक काळ जावा असाच वेदनेचा
तुला न कधीच मिठीतले ते चांदणे कळले,
उरला आता तुझा निःशब्द राग कटू अबोला
मी अजूनही शांत स्निग्ध भाव मिठीत मिटले
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply