एका वेबसाईटवरील एका भव्य कथा स्पर्धेचा मी कधी नव्हे तो भाग होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कथा म्हणजे लघू कथा ! ज्या बर्याचदा दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात. दिवाळी अंकाला पृष्ठांची मर्यादा आणि दिवाळी अंकाचा व्यावसायिक दृष्ट्या विचार करता त्यात जास्तीत जास्त लेखकांना संधी द्यायची असते म्हणण्यापेक्षा द्यावी लागते. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य मराठी लेखकांना आणि कवींना घडविण्याचे श्रेय या दिवाळी अंकानाच जाते. मी स्वत:ला सामान्य लेखक म्हटले कारण माझी फक्त दोन पुस्तके खर्या अर्थाने प्रकाशित झालेली आहेत. त्यांना कोणताही पुरस्कार वगैरे मिळालेला नाही. ना कोणत्या पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळालेले आहे. मला कधी कोणत्याही मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण आले नाही की खिशातील पैसे खर्च करून मी कधी कोणत्याही मराठी साहित्य संमेलनात एकदाही मिरवायला गेलो नाही. लेखक म्हणून माझी कोणी कधी मुलाखत घेतली नाही की कधी मला साहित्यिक म्हणून दखल घेण्याजोगा कोणता पुरस्कार मिळालेला नाही. आमच्या घरातले, आमचे नातेवाईक , आमचे मित्र – मैत्रिणी आणि आम्ही ज्या उभ्या झोपडपट्टीत राहतो तेथीलही कोणी आमची लेखक म्हणून फारशी दखल घेताना दिसत नाही. पण मोठा लेखक होण्याची आमची खाज आजून मिटली नाही. बहुतेक कधी मिटणारही नाही. त्यामुळे सवड मिळेल तेंव्हा आम्ही काई- बाई लिहित असतो. या जगात लेखक होण्यासाठी बहुतेक कोणीही केला नसेल इतका मोठा त्याग आम्ही केलेला आहे. प्रसिद्ध लेखक होण्याच्या नादात अविवाहीत राहून ! वाईट ह्याचेच वाटते की आता आमचे प्रकाशित साहित्य वाचून आमच्या प्रेमात पडून आमच्याशी प्रेमविवाह करेल या वयाची कोणी शिल्लक राहिलेली नाही. फार पुर्वी मी लिहिलेल्या प्रेम कथा वाचून आजही कोणीही कोणाच्याही प्रेमात पडेल. माझ्या कथा वाचताना कोणाचेही डोळे पाणावतील त्या पाणावलेल्या डोळ्यातून पडलेल्या चार खारट अश्रूंचा अभिषेक माझ्या कवितांना अथवा माझ्या कथांना आजही केला जाईल याची मला खात्री आहे .
माझ्या कथा कविता वाचल्यावर मी प्रेमवेडा आहे असा समज माझे बहुसंख्य वाचक आजही करून घेतात. त्यांचा तो समज हा गैरसमज आहे हे त्यांना पटवून देण्याच्या भानगडीत मी कधीही पडत नाही. मला जवळून ओळखणार्या बहुसंख्य लोकांना असेच वाटते की मी खांदानी मजनू आहे. त्यामुळेच माझा प्रेमभंग झाल्यावर अथवा माझे जिच्यावर प्रेम होते तिच्या आठवणीत झुरत दिवस काढण्यासाठी मी अविवाहीत राहिलेलो आहे. पण वास्तवात इतरांचे प्रेम भंग, इतरांचे वेडे प्रेम. इतरांचे वेड्यासारखे प्रेमात पडणे आणि इतरांचे कोणाच्यातरी फालतू दबावाला बळी पडून आपल्या प्रेमाचा त्याग कारणे अथवा त्याग करण्याचे नाटक करून समोरच्याचा पोपट करून आपला स्वार्थ साधने ! हे मी निर्माण करत असलेल्या साहित्याचे खरेतर खाद्यच ठरत होते. काही लोकांना प्रेमात पडण्याचे व्यसन असते. मी माझ्या आयुष्यात कोणत्याही व्यसनाला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अमिशाला बळी न पडता जवळ केले नाही. पण प्रेमात पडण्याचे व्यसन मला अगदी नकळत्या वयात जडले… त्यामुळे मी प्रेमात पडत राहिलो. माझे प्रेमभंग होत राहिले, प्रत्येक प्रेमभंग एक- दोन कवितांना आणि एखाद कथेला नचुकता जन्म देत राहिला… आतापर्यत मी दोनशे प्रेम कविता आणि पन्नास एक प्रेम कथा लिहिलेल्या आहेत. त्यामुळे माझा तीस – चाळीस वेळा प्रेम भंग झालेला आहे असे कोणालाही गृहीत धरायला काही हरकत नाही. हल्ली कित्येकांना एक प्रेमभंगही पचवता येत नाही. तो ही त्यांना सरळ स्वर्गाची वाट दाखवतो…असो ते प्रेमासाठी आत्महत्या केल्यामुळे स्वर्गात जात असावेत असा माझा गोड समज आहे. तो खरा असेलच याची मला स्वत:लाही खात्री नाही बरे ! आत्महत्या करणे पाप असल्यामुळे ते बहुतेक आपल्या प्रेयसी अथवा प्रियकराच्या आसपासच भूत बनून फिरत असण्याची शक्यता जरा जास्तच आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता माझे हृद्य नक्कीच पाषाणाचे नाही ! त्यालाही तडा जातो. माझे हृद्य नक्कीच लोखंडाचेच असावे ! ते लोखंडाचे असल्यामुळे त्याच्यावर अधूनमधून गंज चढत असते . त्यामुळे तेवढ्यापुरता मी आराम करतो ती गंज एकदा का सफ सुफ केली की मी पुन्हा नव्याने प्रेमात पडायला तयार होतो.
मी लोकांना पुर्वीही आनंदी दिसत होतो, आजही आनंदी दिसतो आणि कदाचित भविष्यातही आनंदीच दिसेन कारण मला प्रेमात पडण्याचे व्यसन आहे… जो माणूस आनंदी असतो तोच माणूस प्रेमात पडू शकतो. माझ्या प्रेम प्रकरणात माझी ती कथा स्पर्धा मागे पडली. तर त्या कथा स्पर्धेसाठी एक दिर्घ कथा लिहायची होती. कमीत कमी 80 भागाची तर जास्तीत जास्त 130 भागाची वगैरे ! ती कथा त्या स्पर्धेसाठी लिहायल पाच महिन्याचा कालावधी होता. मी स्पर्धा सुरु झाल्यावर एक महिन्या नंतर कथा लिहायला घेतली त्या कथा स्पर्धेतील कथेचा प्रत्येक भाग हा कमीत कमी 1000 शब्दांचा असावा अशी अट होती. त्या कथेचा एक भाग 1000 शब्दांचा लिहायचा होता म्हणजे मला जवळ जवळ एक भाग म्हणून एक कथाच लिहायची होती असे म्हटले तर ते वावगे ठरणार नव्हते. माझे कथा लिहिणे याच्याशी माझ्या प्रेमात पडण्याचा जवळचा संबंध असल्यामुळे आणि या स्पर्धेसाठी रोज एका भाग लिहायचा असल्यामुळे माझ्यात रोज कोणाच्या प्रेमात पडण्या इतके बळ सध्या नक्कीच नव्हते. त्यामुळे मी ह्यावेळी प्रेमकथा नाही तर आर्थिक कथा लिहिण्याचा निर्णय घेतला. मी काही अर्थाच्या प्रेमात कधीच नव्हतो. तसा असतो तर मी प्रेमाच्या प्रेमात नसतो. आर्थिक कथा म्हणजे ! त्या कथेत नक्कीच माझ्या वाट्याला आर्थिक संघर्ष आलेला असणार हे नक्की ! पण तेवढ्यानेही भागणार नव्हते. त्यामुळे मी रोजच्या रोज माझ्या आयुष्यात येणारी जिवंत पात्रेच माझ्या कथेत जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. माझ्या आयुष्यात येणारी माणसे तशीही बर्याचदा विचित्रच असतात. त्या विचित्र माणसांसोबचा माझा सहवास हा नक्कीच एका कथेला जन्म घालण्यास पुरेसा नसला तरी एका दिर्घ कथेतील एक – एक भाग लिहिण्यास नक्कीच पुरेसा होता. एक प्रयोग म्हणून मी ही दिर्घ कथा लिहिण्याचे आव्हान स्विकारले होते. एक बरा लेखक म्हणून प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात मी माझ्या आयुष्यात आर्थिक गणितांचा कधी विचार केला नव्हता. त्यामुळे माझी संपत्ती म्हणावी अशा माझ्याकडे मी लिहिलेल्या काही कविता आणि कथाच होत्या. त्या व्यतिरिक्त ज्याला माझी संपत्ती म्हणावी अशी माझ्याकडे साधी सायकलही नव्हती. हे सारे मी पाहिलेल्या लेखक होण्याच्या स्वप्नामुळेच घडलेले होते. इतर कलाकार हल्ली कलेच्या माध्यमातून माया गोळा करण्याच्या मागे असतात. पण आम्हाला काही माया गोळा करता आली नाही. फार फार तीस चाळीस प्रमाणपत्रे गोळा करता आली. पण ती ही फ्रेम करून हक्काने लावावी अशी भिंतही माझ्या मालकीची नसल्यामुळे ती प्रमाणपत्रेही धुळ खात पडलेली आहेत. मी गोळा केलेली पुस्तकेही माझ्या पुस्तकांना ठेवायला हक्काचा माझ्या मालकीचा कोपरा नसल्यामुळे बर्याचदा रद्दीत विकलेली आहेत. त्यामुळेच मी हल्ली पुस्तके गोळा करण्याच्या भानगडीत पडत नाही. असो ! या जगात माझ्या मलकीची अशी म्हणावी अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या मेंदुत साठविलेल्या कथा आणि कविता. त्या कथा आणि कविताही ज्या मेंदूत साठविलेल्या आहेत तो मेंदू आणि तो मेंदू ज्या डोक्यात आहे ते डोके ज्या माझ्या देहात आहे ते देहही पंचमहाभुतांच्या मालकीचे आहे. तो देह नष्ट झाल्यावरही माझ्या मागे माझ्या कथा कविता जिवंत राहतील नव्हे त्या राहाव्यात माझी संपत्ती म्हणून इतकीच माझी इच्छा आहे. त्यासाठीच माझ्या आयुष्यात आता माझा सारा अट्टहास चाललेला आहे.
बरे मी त्या स्पर्धेसाठी ती 80 भागाची दिर्घ कथा लिहिण्याचा निर्णय घेतला. पुर्वी माझ्या लिखाणात सातत्य होते. पण हल्ली ते सातत्य राहिले नाही कारण माझ्या डोक्यावर साहित्य सेवेमुळे जे कर्ज झालेले आहे ते फेडण्यासाठी आणि भविष्यात एक कफल्लक लेखक म्हणून मला स्वत:ची ओळख निर्माण करायची नाही. तर मला एक समाधानी आणि सुखाचे आयुष्य जगणारा लेखक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे. समाजात लेखक हे आर्थिक निरक्षर असतात अशी जी लेखकांची प्रतिमा आहे ती मला बदलायची आहे. निदान तसा प्रयत्न तरी मला करायचा आहे. मी त्या प्रयत्नात असतानाच ही दिर्घ कथा लिहायला घेतल्यामुळे ह्या कथेचे लिखाण आणि उदरनिर्वाहासाठी मी करत असलेले संगणकावरील काम हे दोन्ही समांतर चाललेले होते. ह्यावेळी मला कथा लिहिण्यासाठी प्रेम हा विषय काही कामी येणार नव्हता त्यामुळे मागच्या काही वर्षात काही लोकांनी माझी केलेली आर्थिक फसवणूक, मी स्वत: माझी माझीच करून घेतलेली आर्थिक फसवणूक, मी अविचारीपणे भावनेच्या आहारी जाऊन कर्ज काढून केलेली चुकीची गुंतवणुक ते काढलेले कर्ज फेडण्यासाठीही काढलेले कर्ज ! त्यात ज्यांच्यासाठी भावनेच्या आहारी जाऊन मी कर्ज काढले त्याचे त्यांना काहीही पडलेले नाही ! त्यांच्या मते “ माझा गाढवपणा माझी जबाबदारी ! “ त्यामुळे ह्यावेळी माझ्या डोक्यावर असणारे कर्ज फेडण्यासाठी मी करत असलेली तारेवरची कसरत आणि ती करत असतानाही माझ्या आयुष्यात मला आर्थिक मनस्ताप देणारी माणसे माझ्या आयुष्यात येत राहणे हा माझ्या ह्या मी लिहीत असलेल्या कथेचा विषय ठरला. त्यामुळे प्रत्येक महिन्याला माझा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी लागणारे पैसे गोळा करण्यासाठी मी जीव तोडून मेहनत करत होतो आणि प्रत्येक महिन्यात जेंव्हा माझा कर्जाचा हप्ता देण्याची वेळ जवळ यायची तेंव्हा कोणी ना कोणी मला पैशाच्या बाबतीत अचानक टांग द्यायचा ! त्यामुळे नाईलाजाने तो कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मला कोणाकडून तरी नवीन कर्ज घ्यायला लागत होते. माझे सर्व खर्च भागवून मला काही केल्या कर्जाचा हप्ता गोळा करायला जमतच नव्हते. त्यामुळे माझा मुळ कर्जाचा आकडा फार फार पाचशे – हजारांनी कमी होत होता. ह्यापुर्वी कधी कोणाचे एक रुपयाचेही कर्ज न घेतलेल्या मला हे कर्ज म्हणजे डोक्याला ताप झालेला होता. कर्जाच्या बाबतीत काही लोकांचे असे म्हणने असते की कर्ज काढल्याखेरीज माणसाला आपली आर्थिक प्रगती करता येत नाही. त्यामुळे मी माझी आर्थिक प्रगती करण्याच्या नादात कारण आणि तशी गरज दोन्ही नसतानाही कर्ज काढले आणि स्वत:ला कर्जाच्या चक्रव्युहात गुंतवून घेतले. त्यामुळेच मी काढलेले कर्ज हा माझ्या कथेचा विषय होऊ शकला.
व्यावसाय म्हटला की आपल्याला बर्याचदा नफा कमावण्यासाठी आपल्या खिशातील पैसे गुंतवावे लागतात. पण नफा तर सोडाच पण जेंव्हा आपण गुंतवलेले पैसेही वेळेत माघारी येत नाहीत. तेंव्हा जे वाटते त्याचा अनुभव ही मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घेतला. व्यावसायाच्या निमित्ताने मला रोज माझ्याकडे काम घेऊन येणारी माणसे त्यांचे काम, त्यांच्या समस्या आणि त्या सोडविण्यासाठी मी केलेले मार्गदर्शन आणि त्यांनी मी त्यांचे काम केल्यावर मला दिलेले पैसे अथवा ते देण्यास केलेली दिरंगाई हे माझ्या या नवीन कथेचे खाद्य ठरत होते. त्यामुळे त्या खाद्याच्या जिवावर मी वास्तववादी दिर्घ कथेचे भाग लिहित राहिलो 60 भाग लिहिल्यानंतर पुढचे 20 भाग लिहायला माझ्याकडे एक महिना शिल्लक होता. साधारणत: माझे काम करता करता 4 रविवार सोडले तर 26 दिवसात म्हणजे त्या आगोदरच 20 दिवसात 20 भाग लिहून त्या कथेचे 80 भाग लिहून पुर्ण करण्याचा माझा मानस होता. सुरुवातीच्या 15 दिवसात मी दहा भाग लिहिले पण त्यानंतर अचानक माझी तब्बेत बिघडल्यामुळे मला तीन दिवस संगणकापासून लांब राहावे लागले त्यानंतर मी जेंव्हा जेंव्हा त्या कथेचे पुढचे भाग टाईप करायला घ्यायचो तेंव्हा कोणी ना कोणी शेजारी येऊन बसायचे नाहीतर कोणी ना कोणी संगणकावर तातडीने करावयाचे काही ना काही काम घेऊन माझ्याकडे यायचे त्यामुळे मला त्या कथेचे टायपिंग मध्येच थांबवावे लागायचे ! त्यात कोणी माझ्या शेजारी बसल्यावर मी टाईप करत असताना तो ते वाचू शकत असताना माझी कथा टाईप करायचे धाडस काही माझ्याच्याने होत नाही. माझी कथा प्रकाशित झाल्यावर जग वाचते त्याची मला फिकर नसते. पण मी माझी कथा अथवा कविता ती प्रकाशित होण्यापुर्वी कधीच कोणाला वाचायला देत नाही. त्या प्रकाशित होण्यापुर्वी वाचण्याच्या कुवतीचा कोणीही माझ्या आजुबाजुला नाही हे खरे कारण आहे त्या मागे.
पुढच्या दोन – चार दिवसात आणखी एक – दोन भाग टाईप करून झाले. शेवटचे पाच दिवस बाकी असताना मला 8 भाग टाईप करायचे होते. त्यातील तीन भाग मी रात्री जागून टाईप केले. पण अगोदरच आजारपणामुळे त्रस्त असल्या कारणाने ते टाईप करणेही मला जिवावर आले होते. शेवटचे 5 भाग 5 दिवसात टाईप करायचे होते पण त्यातील दोन दिवस मला काही कामानिमित्त बाहेर जावे लागले त्यामुळे पुढच्या 3 दिवसात मी 5 भाग सहज टाईप करेन असे मला वाटले होते. पण पुढच्या दोन दिवसात रात्री जागून कसे बसे दोन भाग टाईप केले त्यानंतर दिवसा इतर कामातून वेळ काढत मला 1 च भाग टाईप करता आला. कथा पुर्ण करण्याच्या शेवटच्या दिवशी मला 2 भाग टाईप करायचे होते ते ही रात्री 12 वाजायच्या आत. तेंव्हा मात्र पहिल्यांदा माझ्या चेहर्यावर 12 वाजले होते. ते 2 भाग जर माझे दिवसभरात टाईप करून होत नाहीत तर माझी चार महिन्यांची मेहनत वाया जाणार होती. त्यामुळे मी माझ्या हातातील महत्वाची सर्व कामे बाजूला सारुन त्या कथेचे ते 2 भाग टाईप करायला घेतले. कथेचे ते 2 भाग लिहिणेच माझ्यासाठी सर्वात जड जाणारे होते कारण हे 2 भाग म्हणजे मी लोहिलेल्या कथेचा शेवटाकडे प्रवास होता. कसा बसा संध्याकाळी 5 वाजेपर्यत मी एक भाग Taaiipa करून पुर्ण केला आणि त्या कथेचा शेवटचा भाग एकदाचा टाईप करायला घेतला. मी तो भाग टाईप करायला घेतल्यावर मला भेटायला कमीत कमी दहा जण तरी आले, त्या सर्वांना मी दारातूनच अक्षरश: हाकलेले आणि उद्या येण्यास सांगितले. त्या कथेचा प्रत्येक शब्द टाईप करताना माझा टाईप करण्याचा वेळ मंदावत चालला होता. एकाच वेळी कथेच्या शेवटाचा विचार करत मला तो भाग टाईप करायचा होता. जेथे एक भाग टाईप करायला मला दोन तास लागतात तेथे दोन तासात अर्धा भागही टाईप करून झाला नाही कारण कथेच्या शेवटाचा विचार करता करता मला तो भाग टाईप करायचा होता. रात्री 8 वाजले तरी तो 80 वा भाग अर्धाच टाईप करून झालेला होता. आता पुढच्या दोन तीन तासात पुढचा भाग टाईप करून तो त्या वेबसाईटवर अपलोडही करायचा होता. जसा जसा त्या कथेचा शेवट जवळ येत होता माझा कथेचा तो भाग टाईप करण्याचा वेग अधिक मंदावत चाललेला होता. रात्रीचे अकरा वाजले तेंव्हा माझे त्या भगाचे 900 शब्द टाईप करून झालेले होते. पुढचे 100 शब्द अधिक महत्वाचे पण त्यावर फार विचार करण्यात काही आता काही अर्थ नव्हता. त्यामुळे कथेचा शेवट टाईप करताना माझी प्रचंड घाई झाली. माझा मेंदुच काम करेनासा त्यामुळे मला त्या कथेचा शेवट मनासारखा करता आला नाही. रात्री 11.30 ला मी त्या कथेचा शेवटचा भाग टाईप करून पुर्ण केला. तो भाग पुन्हा वाचण्याची तसदी न घेता मी लगेच त्या वेबसाईटवर तो अपलोडही केला आणि एकदाचा सुटकेचा श्वास सोडला… शेवटी एकदाची माझी 80 भागाची कथा लिहून पुर्ण झाली. या कथेच्या निमित्ताने मला 8 या आकड्याची महती नव्याने कळली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मी इतक्या कथा लिहिल्या पण ही कथा मात्र माझी परिक्षा घेणारी ठरली… त्यामुळेच माझ्या ह्या कथेतूनच कधी नव्हे ती एक कथा जन्माला आली…
लेखक : निलेश बामणे
Leave a Reply