अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये मनीष पाटील यांनी लिहिलेली ही कथा.
कथे, सरिते, प्रिये! तू एक आदिम सरिता आहेस. हजार वर्षांपासून तुझ्या काठानेच फुलत राहिले माणसाचे आयुष्य आणि भावविश्व. तुला प्राशून, मनामनावर तुझे सिंचन करून समृद्ध होत गेला माणूस! बहरत गेली त्याची संस्कृती हजारो वर्षे केवळ तुझ्यामुळे! शेकडो वर्षांपासून उभ्या मानव जातीची बाळे जोजवतेस तू. सर्वांचे बालपण तुझ्याच कुशीत सांजावते! तुझ्याच कुशीत झोपतात मुले शांतपणे. तुझी कव तरी किती मोठी… अख्खे ब्रह्मांड सामावते तीत.
प्रत्येक घटना व प्रसंग उलगडून सांगण्याची शक्ती आहे तुझ्यात! तू आईसारखी आहेस… किंवा आजीसारखीही! तुला समजून घ्यावे लागत नाही. तुझ्या नुसते जवळ येण्याने त आपोआप समजतेस!
हे आदिम सरिते, तू सदा प्रवाही आहेस. तुझा हा प्रवास कधीही थांबणार नाही. जोपर्यंत मानव लिहू, बोलू, वाचू आणि ऐकू शकेल तोपर्यंत तू वाहत राहशील! किती रूपात भेटतेस तू? कधी आई बनून थोपटतेस तर कधी निरागस बहिणीसारखी खळाळत येतेस! वडिलांसारखी उपदेशही करते आणि बायकोसारखी काळजीसुद्धा करतेस. कधी मुलांसारखी अंगाला झोंबते, बिलगते. हट्ट पुरवल्याशिवाय सोडत नाहीस… आणि जिवलग मित्रासारखी प्रत्येक प्रसंगात तुझी साथ तर असतेच असते. तूच भान देतेस भाव भावनांचे. प्रेम, भीती, निरागसता, सुख, दु:ख, आनंद, चांगलं आणि वाईट… नकळत्या वयातच पुढच्या आयुष्य येऊ घातलेल्या अनेक गोष्टी तू समजावून देते अनेकांगी बोध देतेस माणसाला सोपे करतेस माणसाचे जीवन, माणसाच्या आयुष्यातील कोणतीच गोष्ट तुझ्याशिवाय सुबक होऊ शकत नाही. जगातील कोणतीच घटना तुझ्यात गुंफल्याशिवाय राहू शकत नाही. भविष्य, वर्तमान, भूत… तिन्ही काळांचे भान मिळते तुझ्यामुळे!
कथे, सरिते, प्रिये एक होता राजा म्हणत तू माझ्या जीवनात प्रवेश केला आणि मला मिठीत घेतले ते कायमचे! खेळत राहिलीस तू तेव्हापासून माझ्या तना-मनात, खुलवत राहिलीस उलवत राहिलीस माझे भावविश्व. मदत करत राहिलीस मला चांगला माणूस करण्यासाठी! मला जेव्हा जेव्हा भीती वाटली तेव्हा तेव्हा तू मला कुशीत घेतले. मी जेव्हा जेव्हा कोसळलो तू मला अलगद सावरलं. जेव्हा माझ्यासमोर अंधार पसरतो, मी विश्वासाने तुझे बोट धरून चालतो. जळी-स्थळी तू मला भेटतेस. सुखं, दु:खं, करुण, आनंदी, हसरी, आश्वासक, भितीदायक… कितीतरी रूपात, अगदी कोटी कोटीत!! पण कोणत्याही रूपातले तुझे असणे मला नेहमीच हळुवार ! अलगद उमलतेस तू एखाद्या फुलासारखी… आणि मग दरवळत राहतेस… मंद मंद… कित्येक काळ तू माझ्या आनंदात सहभागी होतेस. दु:खावर फुंकर घालतेस. तू अनेक रंगी अनेक ढंगी आहेस. महा व्यासंगी आहेस! तुझ्या इतकी व्यापकता केवळ सूर्य प्रकाशातच असावी!!
कथे, सरिते, प्रिये तू माझ्यात आता नखशिखांत उतरते आहेस. झिरपते आहेस. किंवा असे म्हण की मी मुरतो आहे तुझ्या रसात! माझ्या नसानसातून तूच वहातेस, हृदयाच्या ठोक्यांतून तूच नांदतेस. माझ्या श्वासाची लय तू, डोळ्यांत उमटणारी प्रत्येक प्रतिमा आणि भाव हे तूच प्रत्येक रूपांतून तू जाणवतेस मला. सुत्र शांततेतही माझे कान ऐकतात तुला! माझी झोप तू. माझी जाग तू. माझी जाण तू! मी देह माझा प्राण तू! तू जाण मी अजाण आहे!! मी मर्त्य तू चिरंजीव आहेस. तू अशीच माझ्यात मिसळून राहा. माझे आयुष्य व्यापून राहा. मी जगत राहतो तुझ्यामुळे आणि जगत राहीन तुझ्यासाठी! नव्हे परत परत जन्म घेईन तुझ्यात अधिकाधिक रत होण्यासाठी!… कथे, सरिते, प्रिये !!!
-मनीष पाटील
१/ए ५०१, सर्वोदय सृष्टी,
लसुनीलनगर, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१
मो. ९९२००४२४४१
E-mail – lekhakpatil42@gmail.com
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)
Leave a Reply