‘हॅलो, सुनील… कसा आहेस? काय म्हणतात अण्णा? बरंय ना सर्व…’
नेहमीचेच प्रश्न, त्याला नेहमीचेच उत्तर देऊन सुनीलने फोन कट केला. नुकताच ऑफीसमधून आला होता. पायमोजे काढून हातपाय धुऊन अण्णांच्या खोलीत गेला. अर्धांगवायूने त्यांना कायमचे अधू बनवले होते. स्वत:ला काहीच हालचाल करता येत नव्हती. बोलताही येत नव्हते. सुनील रोज सकाळ संध्याकाळ त्यांना व्हिलचेअरवर बसवून मागच्या अंगणात चक्कर मारून आणायचा. तेवढाच त्यांना विरंगुळा. बाकी सर्व बेडवरच होते. बाबू नावाचा माणूस खास सेवेसाठी ठेवलेला होता. सकाळी सात ते संध्याकाळी सात तो सेवा द्यायचा.
अण्णांचे डोळे दाराकडेच होते. सुनील दिसल्याबरोबर मंद स्मितहास्य त्यांच्या चेहर्यावर झळकले. सुनीलने आत येऊन ‘काय अण्णा, बरंय ना…’ म्हणत आधार देत त्यांना उठवले. बाबूच्या साथीने खूर्चीवर बसवले आणि मागच्या अंगणात फिरवून आंब्याच्या झाडाखाली बसवले. हा रोजचाच दिनक्रम.
बेल वाजली अन अनुराधा आली. आल्याबरोबर कंबरेला पदर खोचून स्वैपाकाला लागली. अण्णांचा आज वाढदिवस होता. शेवायाची खीर त्यांना आवडायची. दोघेही नोकरीसाठी दिवसभर बाहेर असायचे म्हणून संध्याकाळीच बेत करायचा ठरवला होता. स्वैपाक करता करता रोजच्या शिरस्त्याप्रमाणे तिने कॉन्फरंसवर दोन्ही मुलांना फोन लावला. दोघेही पुण्याला शिकत होते. सुनीलही आवरून ओट्याजवळ आला. अनुराधाला मदत करत तोही मुलांशी बोलू लागला. ख्याली खुशाली कळल्यावर सुनीलने अण्णांना आत आणून हॉलमध्ये टिव्हीसमोर बसवले आणि रामायण सिरियल सुरू केली. अण्णांना ती फार आवडायची. कितीही पारायण झाले तरी टिव्हीवर रामायण दिसले की त्यांचा चेहरा प्रसन्न दिसायचा. आजही तो तसाच दिसला. त्यांचा तो निरागस चेहरा पाहून सुनीलच्या डोळ्याची कडा ओली झाली.
काय शान होती अण्णांची एकेकाळी. गावात वेगळाच मान होता. एक आदर्श व्यक्ती आणि आदर्श कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची ख्याती होती. दहा वर्षांपूर्वी आई गेली तसे अण्णा एकटे पडले. एका जागी बसून असायचे. जपमाळ घेऊन सतत नामस्मरण करत बसायचे. वाल्मिकी रामायण त्यांना मुखोद्गत होते. गावात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात आग्रहाने भाविक त्यांचे व्याख्यान ठेवायचे. पण पत्नी गेल्यापासून त्यांनी एकप्रकारे वानप्रस्थाश्रमच स्विकारले होते. सुनीलने मोठ्या मुश्कीलीने त्यांना शहरात आणले. इथे मन रमत नव्हते. कुणी बोलायला नव्हते. मन मारून ते दिवस काढत होते. ग्रंथालयातून पुस्तके घरी यायची. वाचन आणि टिव्ही याशिवाय काहीच दुसरं काहीच नव्हते. सकाळी फिरायला जायचे. एके दिवशी रस्त्यात पाय घसरून पडले, डोक्याला मार लागला. वर्षभर सर्व ईलाज करून झाले. पण उपाय झाला नाही. काही दिवसातच ते कायमचे अपंग बनले. त्यालाही आता चार वर्ष झाली होती.
दोन मुले होती त्यांना. सर्व ठिक चालले होते. मोठा अनिल चौथीत असतांना झाडावरून पडला अन त्यातच त्याचा अंत झाला. सुनील त्यावेळी पाच सहा वर्षाचा होता. हा मोठा आघात पोटात घालून त्यांनी सुनीलला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, मोठे केले, शिकवले. त्याला बँकेत नोकरी लागली त्यावेळी त्यांचे डोळे भरून आले होते. तो बदलीच्या ठिकाणी गेला आणि दोघे पती पत्नी गावाच्या सेवेला लागले. सुनील पंधरा दिवसातून एकदा घरी येत असे.
कांदा चिरत सुनीलच्या मनात ते सर्व चित्र दिसत होते. त्याचे अश्रु कांद्यामुळे लपत असले तरी अनुराधाला सर्व समजत होते. तिला पतीच्या मनातली घालमेल समजत होती. हे नेहमीचेच होते. पोळ्या लाटून तिने खीर उकळायला ठेवली आणि टेबलवर रांगोळी काढली. ओवाळायचे तबक तयार केले. तोवर बाबूने अण्णांना स्पंजींग करून नवा सदरा घातला होता. हॉलमध्ये येऊन अनुराधाने अण्णांना ओवाळले. दोघांनी त्यांना वाकून नमस्कार केला. बाबूने फोटो काढले. अण्णांचा चेहरा थोडा उजळला होता, पण डोळ्याने सुनीलला ते काही सुचवत होते. सुनीलने ओळखले. पटकन आत जाऊन शंभराच्या तीन नोटा आणल्या आणि अण्णांचा हातात दिल्या. थरथरत्या हाताने त्यांनी अनुराधा, सुनील आणि बाबूला एकेक नोट दिली तेव्हाच त्यांच्या चेहर्यावर समाधान दिसले.
तेवढ्यात डॉक्टर पारकर आले. डॉक्टर आणि कौटुंबिक मित्र असे त्यांचे नाते होते. ‘अभिनंदन अण्णा, दिर्घायुषीभव’ म्हणत त्यांना नमस्कार केला. काही वेळ गप्पा झाल्या, चहापान झाले. बाबूने अण्णांना आत नेऊन पलंगावर झोपवले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांचे कॅथेटर बदलले. एका छोट्या कपाटात कॅथेटर कीट्स, डायपर, व इतर सर्व औषधी ठेवलेली असत. डॉक्टर आठ दिवसातून एकदा येऊन कॅथेटर बदलून जायचे. क्वचित कधी आधेमधे येऊन बदलावे लागायचे. युरीन बॅग बाबू स्वच्छ ठेवायचा. कॅथेटर लावले ती जागा तो रोज साफ ठेवायचा. डॉक्टरांनीच त्याला ते शिकवले होते. हे आटोपल्यावर बाबू खीर खाऊन घरी गेला. अनुराधाने आठवणीने त्याच्या घरच्यांसाठी खीर बांधून दिली. काही वेळाने डॉक्टरही गेले.
अण्णा रात्री जेवत नसत. फक्त एक कप दूध किंवा ज्युस पीत असत. सुनीलने त्यांना उठवून खीर खाऊ घातली. समोर भींतीवर टांगलेल्या आईच्या फोटोकडे पाहून अण्णा समाधानाने हसत आहेत असे उगीच सुनीलला वाटले. ‘आई तुझ्या हाताची चव नाही, पण तुझ्या सुनेने केलेली खीरही अण्णांना आवडली बरं का!’ सुनील फोटोकडे पहात म्हणाला. अण्णांनी होकारार्थी मान हलवली हेही त्याच्या लक्षात आले.
जेवणे करून दोघेही झोपले. दुसर्या दिवशी सकाळी सकाळीच फोन वाजला. अनुराधाने तो उचलला अन ‘काय? हो… हो… आम्ही लगेच निघतो…’ म्हणत फोन ठेवला अन मटकन खाली बसली. सुनीलने पळत जाऊन पाण्याचा ग्लास आणला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ‘काय झाले?’ विचारले. ती रडत म्हणाली ‘अजूला द्वाखान्यात अॅडमिट केलंय….’ ती पदर डोळ्यावर धरून रडू लागली. अजय आणि विजय दोन्ही मुले पुण्याला हॉस्टेलवर रहात होती. नेमकं काय झालंय समजायला मार्ग नव्हता. सुनीलने आपल्या नात्यातील लोकांना फोन करून ताबडतोब दवाखान्यात जाऊन खबर घ्यायला सांगितले. लगेच फोन करून सहकार्यांना कळवले. रजेचा अर्ज पाठवला. अनुराधाच्या शाळेतही कळवले. बॅगेत कपडे भरून दोघेही तयार झाले. तोवर बाबू आला. त्याला सर्व सूचना दिल्या. ‘तुम्ही कायबी काळजी करू नका, म्या समदं बग्तो. घरून डबा आणतो. अण्णांची कायबी काळजी करू नका.’ त्याने आश्वासन दिले. दोघे लगेच रिक्षाने बसस्टँडवर गेले.
बाबूने अण्णांचे डायपर बदलले. त्यांना आंघोळ घातली. चहा करून चमचाने त्यांना पाजला. अण्णांची नजर भीरभीरत होती. सुनील आणि अनुराधाला ते नजरेने शोधत होते. बाबू काहीच बोलला नाही. त्यांचे सर्व आटोपून त्याने धुण्या भांड्याला आलेल्या मोलकरणीकडून घरी निरोप धाडला. काही वेळातच त्याची बायको डबा घेऊन आली. दोघांनी मिळून अण्णांना खाऊ घातले.
दिवस संपला. रात्री अण्णांना त्याने दूध पाजले आणि सतरंजीवर पाय दुमडून झोपला. मध्यरात्री केंव्हातरी त्याला कण्हल्याचा आवाज आला. लाईट लावून त्याने पाहिले तर अण्णांचा श्वास वाढला होता. त्यांना हलवले, आवाज दिला पण ते डोळे उघडत नव्हते. श्वासाची घरघर वाढली होती. काय करावे त्याला समजेना. त्याच्याकडे मोबाईल नव्हता. तो पळत शेजारी गेला. त्यांनी सुनीलला फोन केला. त्याने डॉक्टरांना फोन केला, पण दुर्दैवाने डॉक्टर बाहेरगावी गेले होते! सुनील लगेच निघणार होता. पण तोवर काय करायचे हा मोठा प्रश्न होता.
बाबू पळत घरी आला. अण्णांच्या श्वासाचा आवाज दुरूनही ऐकू येत होता. बाबूने त्यांची छाती चोळली, हातपाय चोळले, पण काही फरक पडत नव्हता. तेवढ्यात त्याची नजर युरीन बॅगवर गेली. ती रिकामीच होती! तो सकाळी यायचा तेव्हा ती टंब भरलेली असायची. आता पहाटेचे तीन वाजले होते. युरीन बॅग अर्धीतरी भरायला हवी होती. मग ती एकदम रिकामी कशी काय? त्याने पोटाला जिथे नळी लावली होती त्याजागी थोडे दाबून पाहीले त्याबरोबर नळीच्या बाजूने छिद्रातून थोडे पाणी बाहेर पडले! बाबूने दोन सेकंद डोळे बंद केले. डॉक्टर काय काय करायचे ते मनातल्या मनात आठवले. झटकन कपाट उघडून त्याने एक कॅथेटर कीट बाहेर काढले. हातमोजे चढवले. सिरींजने अण्णांच्या पोटाला लावलेल्या नळीतून हवा काढली. कॅथेटरची नळी हळूच ओढून बाहेर काढली तशी त्या छिद्रातून बाबूच्या अंगावर पिचकारी उडाली. घळघळ सर्व युरीन बाहेर पडले. गादी, चादर, बाबूचे कपडे सर्व भरले. जसेजसे पाणी बाहेर पडत होते तशीतशी अण्णांची घरघर कमीकमी होत गेली आणि काही वेळातच त्यांचा नॉर्मल श्वासोच्छवास सुरू झाला. बाबूने बिटॅडिनने छिद्राच्या बाजूची जागा स्वच्छ केली. डॉक्टर करतात तसेच आठवून आठवून त्याने नवीन कॅथेटर जागेवर बसवले. नव्या युरीन बॅगमध्ये युरीन जमायला सुरूवात झाली तेंव्हाच त्याने नि:श्वास सोडला.
गादीवर रबर शीट होती. त्यावरची बेडशीट, अण्णांचे कपडे सर्व बदलून साफसूफ करून तो अण्णांच्या बाजूलाच बसून राहिला. झोपायचा प्रश्नच नव्हता. ती केव्हाच उडाली होती. सहा वाजता सुनील आला. धावत जाऊन त्याने अण्णांना पाहिले. ते अजून शुद्धीत नवह्ते. तो बाबूवर खूप रागावला. आमच्या माघारी अण्णांची नीट काळजी घेतली नाही म्हणून अद्वातद्वा बोलला. बाबू बोलायचा प्रयत्न करत होता पण सुनील ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.
त्याने फोन करून अँब्युलंस बोलावली आणि अण्णांना दवाखान्यात नेले. डॉक्टर नुकतेच गावाहुन आले होते. त्यांनी तात्काळ सगळ्या तपासण्या केल्या. बाबूला सर्व सविस्तर विचारले. सुनील अजूनही बाबूवर गुश्श्यातच होता. सर्व तपासण्या झाल्यावर डॉक्टर खुर्चीतून उठले आणि बाबूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले ‘शाब्बास बाबू. तू अशिक्षित असूनही सद्सद्विवेक बुद्धीने योग्य काम केले.’ सुनीलकडे पहात ते पुढे म्हणाले ‘अण्णांची युरीन ब्लॉक झाली होती. थोडे इंफेक्शन असल्यामुळे नळीत क्लॉट अडकला होता. ब्लॅडर फुगल्यामुळे किडनीवर अन फुफ्फुसावर दबाव वाढला होता. जर अजून काहीवेळ तशीच परिस्थिती राहीली असती तर कठीण परिस्थिती उद्व्हवली असती. कॅथेटरचे हे असेच असते. छिद्रावाटे इंफेक्शन कधीही होवू शकते. काही लोकांना दर आठ पंधरा दिवसात इंफेक्शन होते, काही लोकांना चार सहा महिन्यातुन एकदा होते. पण अण्णांच्या बाबतीत असे चार वर्षात पहिल्यांदाच घडले हे खूप आश्चर्यकारक आहे. बाबू आणि तुम्ही योग्य स्वच्छता ठेवता हेच यामागचे कारण आहे. काल रात्री बाबूने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला नसता तर…’
डॉक्टरांचे बोलणे ऐकून सुनीलच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्याने बाबूला घट्ट मिठी मारली. ‘सॉरी बाबु….मला लहान भाऊ समजून माफ कर. तुझ्या समय सुचकतेमुळे अण्णांचे प्राण वाचले. काही विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन मी तुला खूप बोललो. अजू तिकडे फुड पॉयझनिंगमुळे अॅडमिट आहे, त्यात अण्णांचे कळले. माझी मन:स्थिती समजून घे आणि मला क्षमा कर बाबू….’ तो ढसढसा रडू लागला. बाबूच्या डोळ्यातूनही पाणी वाहू लागले.
तेवढ्यात अनुराधाचा फोन आला. मुलाची तब्येत आता बरीच सुधारली होती. इकडचा सर्व वृत्तांत ऐकून तिनेही बाबूला धन्यावाद दिले. दोन्ही संकटे दूर झाली होती. चहा मागवून डॉक्टरांनी तो आनंद साजरा केला.
त्या दिवसापासून बाबू केवळ नोकर न राहता त्या कुटुंबाचा एक सदस्यच बनला…
नितीन म. कंधारकर
छ. संभाजीनगर.
https://nmkandharkar1965.blogspot.com/2024/02/blog-post.html
Leave a Reply