मागे मी सांगितलं होतं की मी कधीच रुसले नाही. आणि रागवणे हे ही नव्हतेच. पण एकदा मला खूप राग आला होता. झालं काय लग्नानंतर आम्ही दुसर्या वर्षी एका ग्रामीण भागात नोकरी करतांना एका चाळीवजा पाचसहा घरांपैकी एका दोन खोल्यात रहात होतो. घरात मोठे कुणीही नाही. अजून यांच्या स्वभावाची पुरती ओळख झाली नव्हती. मी त्यावेळी घरची कुलदैवता तुळजाभवानी म्हणून मंगळवार करायची. संध्याकाळी जेवण एक वेळ. चहा फराळ असे काही नाही. कोर्टातून आले की दोघेही एकत्रच जेवायला बसत होतो. एकदा पाटपाणी घेऊन यांना अगोदर वाढले. यांनी सुरवात केली की मी माझे ताट वाढून घेत असे. यावेळी मी पहिला घास तोंडात घालणार तोच हे म्हणाले की मला भाजीवर मिरच्यांची फोडणी करून वाढ.
भूक लागली होती म्हणून यांना म्हटले की घास घेण्यापूर्वी सांगितले असते तर.
मग काय तुझ्या लाखाचे बाराशे झाले का? असू दे मी करुन घेतो. तू जेव. आता यांना जमणार नाही म्हणून मी उठून फोडणी करून दिली. आणि राग खूपच आला होता म्हणून तावातावाने बाहेर जाऊन समोरच्या पायरीवर जाऊन बसले….
भूक व राग . मग काय मला आईची खूपच आठवण झाली. आज आईने मला ताटावरुन असे उठवले असते का? थोड्या वेळाने राग शांत झाला पण भूक नाही. हे सगळे होत असताना शेजराचा मुलगा दार उघडून आत गेला आणि म्हणाला अरे जेवण टाकून ताई कुठे गेल्या? काका ताई कुठे गेल्या आहेत वाटत. पण तिन्ही संध्याकाळी आम्ही बाहेर जात नसू. जास्त चर्चा नको व्हायला म्हणून मी म्हंटले अरे मी इथ आहे. उकडत होते म्हणून वाऱ्याला बसले होते. आणि बोलत बोलत दहा पावलावर असलेल्या घरापर्यंत गेलो. ठीक आहे ताई तुम्ही बसा जेवायला असे म्हणत तो गेला. आत मध्ये गेल्यावर दिसले की ताटात वाढलेले तेवढेच जेऊन हे पुस्तक वाचत होते. मी भरभरा सगळे आवरुन आत गेल्यावर कालवलेला तेवढाच भात खाऊन उपवास सोडला. भांडी घासून पुसून बाहेर येऊन बसले होते. मात्र विचार करत होते की मी रागाने जेवले नाही पण यांनी का जेवण केले नाही?…की आपली चूक कळाली की मी जेवले नाही म्हणून ते जेवले नाहीत की त्यांनाही राग आला होता. काहीही कळत नव्हते. आणि मीही आजपर्यंत कारण विचारले नाही. पण असे प्रसंग आले होते तेव्हा हे माझी विचारपूस करत असत. बाकी काही म्हणा पण कठीण कठीण किती पुरुष हृदय हेच खरे.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply