माणसाच्या केसांना पहिल्यांदा कात्री लागते, ते त्याचे जावळ काढण्यापासून. नंतर महिना दोन महिन्यांतून एकदा तरी त्याला कारागिरापुढे मान तुकवावी लागतेच. लहानपणी कटींग म्हटल्यावर कोणतेही मूल भोकाड पसरते. शाळा सुरु झाल्यानंतर मात्र कटींगला त्याचा विरोध हळूहळू कमी होत जातो.
पुण्यात आल्यावर माझी कटींग घरासमोरच असलेल्या सूर्यवंशी यांच्या केश कर्तनालयात होत असे. आरशासमोरील खुर्चीवर लाकडी फळी टाकून त्यावर मला बसवले जात असे. कात्रीने कटींग झाल्यावर त्यांनी वस्तरा काढला की, तेव्हाच काय, आत्तादेखील पोटात गोळा उठतो. साधारणपणे मी पाचवीमध्ये असेपर्यंत याच दुकानात कटींग करीत होतो.
आमच्या शेजारी बाबुलाल शेठजींचे किराणा मालाचे दुकान होते. त्यांची दाढी करण्यासाठी सपकाळमामा नावाचे वयाची साठी गाठलेले ‘टिपिकल’ न्हावी येत असत. डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर गंध व टिळा, झुपकेदार पांढऱ्या मिशा, गळ्यात तुळशीची माळ, अंगात पांढरा सदरा, त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट, खाली धोतर व पायात वहाणा. ते शेडगेआळीत रहायचे. आमच्या आईने आमचे डोक्यावरील ओझं खाली करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
महिनाभराने सपकाळमामा दारावरील पडदा उघडून ‘कधी येऊ मी?’ अशी विचारणा करीत. शक्यतो आम्ही त्यांना रविवारीच यायला सांगत असू. मग ते सकाळी नऊ वाजता यायचे. मी घरातले एक रिकामे पोते जमिनीवर अंथरायचो. मग मामा खाली ओणवे बसून त्यांच्या खांद्यावरील उभ्या कातडी बॅगेतून कात्री, मशीन, पाण्याची वाटी, मोठा ब्रश, इ. सरंजाम काढत. मी पहिला नंबर लावत असे. त्यांच्यापुढे मान खाली करुन बसलं की, ते पहिल्यांदा वाटीतले पाणी घेऊन डोके चोळून घेत. केस ओलसर झाल्यावर त्यांना कात्री चालविणे सोपे जायचे. केसांचा जिरेकट झाल्यावर वस्तरा एका छोट्या फरशीच्या तुकड्यावर मागून पुढून फिरवत त्याला धार लावून मानेवरून कटलाईनमध्ये फिरवला जात असे. मग कानामागून, गालाच्या वरची आडवी कटलाईन केल्यावर ब्रशने अंगावर पडलेले केस काढून टाकत. मग दोन्ही हातांनी डोक्याला जोरात मालीश करुन ते मला मान ढिली सोडायला सांगत. मग मुंडकं हातात धरून ते एकदा उजवीकडे, नंतर डावीकडे झटका देत असत. कड् कड् आवाज होऊन डोकं एकदम हलकं झाल्यासारखं वाटतं असे. शेवटी त्यांनी आरसा समोर धरल्यावर माझी मलाच ओळख पटत नसे. काॅलेजला जाईपर्यंत आम्ही दोघेही त्यांच्याकडूनच कटींग करुन घेत होतो. नंतर मी सलूनच्या दुकानात जाऊ लागलो. त्यामुळे सपकाळमामा माझ्यावर नाराज झाले.
नंतरच्या काळात माझी कटींगची अनेक दुकानं झाली. प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगवेगळा होता. कधी चिमण्या गणपती शेजारच्या पवार यांच्या दुकानात जात असे तर कधी घरासमोरच झालेल्या नवीन सलूनमध्ये जात असे. पेरुगेट चौकीसमोर एक दळवी बंधूंचं सलून होते. तिथे मी बरीच वर्ष जात होतो. काही वर्ष आमचे हरहुन्नरी कलाकार मित्र विजय तावरेच्या दुकानी जात होतो.
गेल्या पाच सहा वर्षांपासून पेरुगेट चौकातील माटे यांच्याकडे कटींग करीत होतो. हे माटेंचं सलून ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. इथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर दाढी व कटींग करण्यासाठी येत असत. त्यांच्या हस्ताक्षरातलं माटेंना लिहिलेलं पत्र दुकानात फ्रेम करून लावलेलं आहे. आता जो सुनील माटे दुकान चालवतो आहे, त्याच्या वडिलांपासून आमची त्याच्याशी ओळख आहे. ऑफिसच्या जवळच हे सलून असल्यामुळे मी संध्याकाळी सातच्या सुमारास कटींगला जात असे. आधीचा नंबर झाल्यावर मी खुर्चीत बसत असे. सुनीलनं आता पासष्टी पार केलेली आहे. तो स्वतःच नेहमी डाय करीत असल्यामुळे त्याचे काळे केस पाहून त्याच्या वयाचा अंदाज कुणालाच येत नाही. तो इतरांची कटींग करतो मात्र स्वतःच्या डोक्यावर एखाद्या पौराणिक पात्राप्रमाणे भरपूर केस ठेवलेले आहेत. मी त्याला कडेने केस कमी करायला सांगतो. डोक्यावर पाण्याचा फवारा मारला की, तो जीभ दाताखाली दाबून कात्री चालवायला सुरुवात करतो. त्याचे डोळे बटाटे आहेत, त्यामुळे तो साधं बोलला तरी रागाने बोलल्यासारखं वाटतं. कात्री चालवताना तो गप्पाही सुरू करतो, ‘मी राजकपूर बरोबर परदेशात जाऊन आलोय. फिल्म इंडस्ट्रीत मी बरीच वर्षे काम केले आहे.’ मी फक्त ‘हो का?’ एवढंच उत्तर देतो. पंधरा मिनिटांत कटींग झालेली असते. त्याला डोक्याला मालीश कर म्हटलं की, तो आता माझं वय झालंय, हात दुखतात अशी सबब सांगून टाळतो. अंगावरील कापड काढून झटकून तो गळ्याशी टाॅवेल लावतो. तोंडावर पाण्याचा स्प्रे मारुन एका डबीतल्या क्रिमचे चार ठिपके कपाळावर, गालावर लावतो. आपल्या दाही बोटांनी चेहऱ्यावर मालीश करुन पुन्हा पाण्याचा फवारा मारतो. मग एका कोरड्या टाॅवेलने चेहरा स्वच्छ पुसून काढतो. डोळ्यात गुलाबपाणी टाकून टाॅवेलने डोळे टिपून घेतो. हातावर पाॅण्डस पावडर घेऊन माझा चेहरा मोहराच बदलून टाकतो. पावडर जास्त लावल्यामुळे आरशात मी ‘गोसावी’ दिसू लागतो. मी खुर्चीतून उठतो व रुमालाने पहिल्यांदा पावडर पुसून टाकतो. सुनीलला त्याचा मेहनताना देऊन बाहेर पडतो.
जीवनातील काही प्रसंग आपण कधीच टाळू शकत नाही. आई आणि वडील गेल्यानंतर दशक्रियेच्या दिवशी एरवी कटींग करताना बडबडणारा मी, मूकपणे सामोरा गेलो होतो. आयुष्यात असा प्रसंग कधीही येऊ नये असं मला वाटत होतं, मात्र आपल्या हातात काही नसतं हेच खरं…
सध्या मी केके मार्केट समोरच्या सलूनमध्ये जातो. त्याला कटींग मला कशी हवी असते, ते पक्कं ठाऊक आहे. पंधरा मिनिटांत तो मला हलकं करतो. मस्त मालिश करतो. पाच रुपयांत लहानपणी कटींग करुन घेणारा मी एकशे वीस रुपये देऊन बाहेर पडतो….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२९-८-२०.
Leave a Reply