वसंत निनावे यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३० रोजी झाला . ते मूळचे भंडाऱ्याचे . त्यानंतर शिक्षणानिमित्त ते नागपूरला आणि मुंबईला स्थायिक झाले . त्यांनी मराठी घेऊन एम. ए . केले , त्यांना संस्कृत घेऊन एम. ए . करायचे होते पण ते काही कारणामुळे होऊ शकले नाहीत. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रथम माहिती आणि जनसंपर्क खात्यात काम केले आणि त्यानंतर सहकारी बँकेमध्ये पी. आर. ओ. चे काम केले. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती आणि त्याचप्रमाणे ते लिहितही असत . त्यांना ग.दि. माडगूळकर यांच्या रचना खूप आवडत.
त्यांनी पुढे स्वतःच्या लेखनकौशल्यावर , स्वतःच्या प्रतिभेवर रेडिओसाठी कार्यक्रम लिहावयास सुरवात केली. तिथे यशवंत देव , नीलम प्रभू , बाळ कुरतडकर यांच्याशी त्यांची ओळख आणि मैत्री झाली. रेडिओवर त्यांची ‘ मास गीत ‘ ह्या कार्यक्रमात गाणे लागे . ‘ मास गीत ‘ म्हणजे एकच गाणे महिनाभर दर रविवारी लागायचे. त्यावेळी त्यांची तेथे खूप गाणी रेकॉर्ड झाली आणि ती आकाशवाणीवर प्रसारितही झाली. त्यावेळी कॅसेट्स नसायच्या किंवा आजच्यासारख्या डी.व्ही.डी. ही नसायच्या . त्यावेळी रेकॉर्ड्स असायच्या , ध्वनिमुद्रिका असायच्या. त्यांच्या खूप खूप ध्वनिमुद्रिका रेकॉर्ड झाल्या. तलत मेहमूद यांनी गायलेले ‘ ना खंत नाही खेद जे जाहले तयाचा ..’ तर सुमन कल्याणपूर यांनी गायलेले ‘ यांचे पाण्यातली परी मी …’ शामा चित्तार यांनी गायलेले ‘ नच साहवतो भार ..’ अशी अनेक जणांनी त्यांची गाणी गायली. त्यांचे दत्ता डावजेकर , बाळ बरवे , यशवंत देव यांच्याशी चांगले सूर जुळले होते. त्यांच्या घरी नेहमी गाणी लिहिण्यासाठी बैठकी व्हायच्या नकळतपणे घरातील राहणाऱ्या मुलांवर शब्दांचे, त्या वातावरणाचे संस्कार होत असत. त्यांच्या पत्नी सरिता निनावे यांची त्यांना उत्तम साथ होती .
लता मंगेशकर यांनी वसंत निनावे यांचे ‘ चुकचुकली पाल एक कालचक्र चुकले ‘ हे गाणे गायले होते . तेव्हा पं . हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना शंभर रुपयाची नोट स्वाक्षरी करून दिली होती. वसंत निनावे यांचे हिंदी, मराठी ,इंग्रजी , संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते . ते कुठल्याही गाण्याचा अनुवाद सहजपणे करत असत. एकदा त्यांनी चायनीज गाण्याच्या संगीतावर ‘ ही माराही ‘ हे गाणं लिहिले होते. त्यांनी ‘ पोरकी ‘ या मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. त्यांचे सर्वात गाजलेले गाणे म्हणजे रामदास कामात यांनी गायलेले ‘ आदिमा रे अतिमा… ‘, हे गाणे . त्यांची बरीच गाणी गाजली. त्यांची गाणी सुधीर फडके , अशा भोसले, पूष्प पागधरे यांनी देखील गायली. ते नोकरी करत होते परंतु त्यांना संसारासाठी पैसे पुरत नसल्यामुळे ते पुस्तिकांच्या भाषांतराची कामे करत असत कारण त्यांचे भाषांवर प्रभुत्व होते. पंधरा-अठरा तास काम केल्यानंतर आपला हा लेखनाचा छंद ते जोपासत.
वसंत निनावे यांनी नाटकेही लिहिली त्यांची नावे बैजू बावरा , शिवरायाचे आठवावे तर लहान मुलांसाठी गोल गोल राणी हे नाटक लिहिले. त्यांनी दिवाळी अंकातून खूप लेखन केले . त्यांनी आकाशवाणीवर अनेक मुक्तछंदात्मक एकांकिका लिहिल्या . ज्याचे संकलन म्हणजे त्यांचे ‘ आकाशप्रिया ‘. एक नवीन लेखनप्रकार म्हणून त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता. आज दुर्देवाने त्यांचे फोटो , त्यांनी जे काही लिहिले , त्यांचे जे काही त्यांच्या मुलाने जपून ठेवले होते ते काहीही दुर्देवाने शिल्लक नाही , २६ जुलैच्या मुबंईत आलेल्या पावसामुळे सर्वकाही नष्ट झाले. त्यांची मुलगी रोहिणी निनावे ज्या उत्तम लेखिका आहेत यांनी मला त्यांची स्वाक्षरी आणि माहिती उपल्बध करून दिली.
वसंत निनावे यांना ‘ मै तुलसी हू तेरे आंगन की ‘ हा चित्रपट लिहिण्याची संधी आली होती परंतु त्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागणार होती , परंतु घराच्या , मुलांच्या जबाबदारीमुळे ते नोकरी सोडू शकले नाहीत. त्यामुळे ते तो चित्रपट करू शकले नाहीत. खरे तर त्यांना खूपच लिहावयाचे होते , खूप काही डोक्यात होते परंतु नोकरीमधील कामांमुळे , घराच्या जबाबदारीमुळे त्यांना ते लिहिण्यास वेळ मिळत नव्हता. त्यांनी मग ठरवले की आपण रिटायर झाल्यावर खूप पूर्णवेळ लिहावयाचे .
वसंत निनावे १० जून १९८८ रोजी रिटायर झाले आणि त्याच दिवशी दुर्देवाने अचानक त्यांचे निधन झाले . नियतीने त्यांना त्याच्या इच्छा पुऱ्या करू दिल्या नाहीत असेच म्हणावे लागेल.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply