माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्यावर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला, आजकाल आमी बी कविता करू लागलो आहे, असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर? असे म्हणत ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ या धर्तीवर’ तो कवितेची चोपडी चाळू लागला. मी ही कान टवकारून, त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. थोड्या वेळानी तो उद्गारला, लेका, कविता छान आहे, आवडल्या (?), पण एक ही कविता मीटरमध्ये नाही, आणि खरंच सांगतो, बिना मीटरच्या कवितेची मार्केट व्हॅल्यू नसते, कवीला प्रतिष्ठा ही मिळत नाही आणि मोबदला ही, असे म्हणत एखाद्या खलनायका प्रमाणे माझ्या कडे पाहत, तो खदा-खदा हसू लागला. त्या वेळी त्याचा चेहरा, मला चक्क ब्रूटस सारखा वाटला, ‘ब्रुटस तुम भी’ एवढेच म्हणायचं काय ते राहिलं. पण एक खरं त्याचा घाव जिव्हारी लागला. त्या दिवसापासून एक ही कविता सुचली नाही.
कवितेच मीटर म्हणजे काय, हा एकच प्रश्न सतत डोक्यात घोळू लागला. आज सकाळी विजेचे बिल आले. आजकाल विजेचे बिल पाहून हादरा हा बसतोच. किती ही कमी वीज वापरली तरी बिल दीड-दोन हजारापेक्षा कमी येत नाही. विजेचे निजीकरण झाल्याचा परिणाम. कंपनीने जुने मीटर बदलले, नवीन डिजीटल मीटर आले, ते वेगाने पळतात. ऊर्जा मंत्रालयात काम करणाऱ्या एक सहकर्मिला, या बाबतीत विचारणा केली होती. तो म्हणाला, मीटरच्या अचूकते बाबत काही प्रतिशत (+, -) ची सूट निजी कंपन्यांना मिळाली आहे, त्याचा गैरफायदा या कंपन्या घेतात. सर्वच मीटर (+) असतात. निष्कर्ष- मीटर आहे म्हणून आपण विजेचे बिल देतो, ‘मीटर वेगाने पळतात, आणि आपल्याला वीजेसाठी जास्त पैसा मोजावा लागतो’. दिल्लीत आटो, पूर्वी कधीच मीटरने पळत नसे, आजकाल मीटरने जायला तयार राहतात. कारण नवीन मीटर आटोपेक्षा ही जास्त वेगाने पळतात. गेल्या रविवारी कुठे बाहेर जायचे होते, गल्लीत एक आटो उभा होता, आटोवाल्याला विचारले, तो म्हणाला साहब मीटर खराब है, मीटर ठीक होने तक सवारी नाही बिठा सकता, मी- बिना मीटर के चल. तो- ‘बिना मीटर के में मुफ्त में भी किसी को नही ले जा सकता, चलान कट जायेगा’. माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली, प्रकाश पडला, एक – बिना मीटर आटो ही रस्त्यावर धावू शकत नाही, दोन- ‘मीटर असेल तरच मोबदला मिळतो’.
त्याच संध्याकाळी, एका कवी/ गीतकारची मुलाखत दूरदर्शन वर पहिली. तो म्हणत होता, त्याला संगीतकाराच्या चालीवर गाणे लिहिणे जास्त सोपे वाटते, कविता पटकन मीटरमध्ये बसविता येते. कविता आधी लिहिली असेल तर चालीनुसार मीटरमध्ये बसविणे कठीण जाते. हा त्याचा अनुभव. मीटर मध्ये बसणाऱ्या कविता लिहिणाऱ्या गीतकाराला नक्कीच भरपूर मोबदला मिळत असेल. खरंच जिथे मीटर तिथे मोबदला/ पैसा. मग विजेचे मीटर असो, आटोचे असो किंवा कवितेचे.
डोक्यात गोंधळ माजला, अनेक प्रश्न उभे राहिले, विवेक पटाईत तुम्ही मीटर मध्ये कविता लिहू शकतात का? हृदयातून उत्तर आले – शक्य नाही. बिना मीटरच्या कवितेला बाजारात किंमत नाही, मग तुम्हाला आयुष्यात कधी प्रतिष्ठा आणि नाव मिळेल का? प्रतिष्ठा व नाव नसलेल्यांना कविसंमेलनात कुणी बोलवतो का? कुणी कविता छापतो का? माझ्या एका दिल्लीकर कवी मित्राने स्वत:च्या खर्चाने नागपूर हून आपले दोन-तीन कविता संग्रह प्रकाशित केले आहे (५००च्या आवृतीचे, १५ ते वीस हजार खर्च येतो असे तो म्हणाला होता). पुस्तके किती विकली गेली त्यास माहीत नाही. कारण रॉयल्टी त्याला कधीच मिळाली नाही.
आपण काय विचार करतो आहे, या विचाराने मला माझेच हसू आले. तुलसीदासाला कुठल्या ही राजाच्या दरबारी ‘राजकवीचे’ पद सहज मिळाले असते. पण तुलसीदासाने काशीच्या घाटावर, स्वांत सुखाय ‘रामचरितमानस रचले’ होते, कुठल्या ही मोबदल्याचा विचार न करता. त्या वेळी आत्मशून्य झालेल्या लोकांना राक्षसी शक्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणे हाच रामचरितमानस रचण्याचा त्यांचा कदाचित उद्देश्य असेल.
— विवेक पटाईत
Leave a Reply