कविता राऊत ज्या स्पर्धेत उतरते त्यात पदक कमावल्याशिवाय थांबत नाही, असा तिचा लौकिक आहे.
यश म्हणजे जीवतोड मेहनत करावी लागणार, हे इतर सगळ्याच स्पर्धकांना न सांगताही माहीत असतं; पण तिचं आजचं यश हे असं सहजासहजी तिच्या पदरी पडलेलं नाही; तर तिनं शब्दशः घाम, रक्त आणि अश्रू गाळून ते कमावलेलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक आदिवासी पाडा… पाचशे वस्तीचं लहानसं गाव. रस्ते, वीज आणि पाणी या कशाशीही संबंध नाही. शाळा जेमतेम चौथीपर्यंत. असं जंगलातल्या कुशीतलं सावरपाडा. याच गावावरून कवितालाही नाव पडलं “सावरपाडा एक्स्प्रेस’.
कविताचं सगळं बालपण याच सावरपाडामध्ये गेलं. वडील फॉरेस्टमध्ये नोकरीला होते; पण सावरपाड्यातल्या इतर मुलींप्रमाणेच तिचंही आयुष्य चालू होतं. रोजच 15-20 मैलांची पायपीट. सावरपाडामध्ये चौथीनंतरच्या शिक्षणाची सोय नव्हती; म्हणून मग तिच्या वडिलांनी तिला ठाणापाडा इथल्या आश्रमशाळेत घातलं. सावरपाडापेक्षाही आश्रमशाळेतले दिवस कठीण होते. ठाणापाडातही पाण्याची वानवाच होती. प्रत्येक मुलीला स्वतःच्या पाण्याची सोय स्वतःच करावी लागत असे. त्यामुळे सावरपाडातली पायपीट ठाणापाडामध्यही तशीच सुरू होती. ठाणापाड्याहून मग कविता हरसूलच्या केबीएच शाळेत शिकायला गेली. चौथीत असताना तिने पहिल्यांदा धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर आजतागायत तिने कधीच मागे वळून बघितलेले नाही.
हरसूलच्या शाळेत असताना कविता विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होती, बक्षीसंही मिळवत होती; पण शास्त्रोक्त पद्धतीने धावणं तिला माहीत नव्हतं. लहानपणापासून केलेल्या कष्टामुळे तिचं शरीर काटक बनलेलं होतं. मैलोन् मैल पाण्यासाठी ये-जा करण्यामुळे तिचा स्टॅमिना तुफान होता आणि त्याच बळावर ती धावत होती. याचदरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते डॉ. पिसोळकर यांनी शालेय राज्य स्पर्धेच्या तीन दिवस आधी “साई’चे (स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडिया) प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्याकडे तिला आणलं. विजेंद्र सिंग यांच्याकडे कविता आली आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. धावणं ही फक्त आवड न राहता त्यातच करिअर करता येऊ शकतं, हा विचार कवितामध्ये रुजला.
कविता सांगते, “”आदिवासी मुलांमध्ये टॅलेंट ठासून भरलेलं आहे. फक्त त्यांना योग्य ती संधी मिळायला हवी. या मुलांमध्ये नैसर्गिकपणे असणाऱ्या अफाट ऊर्जेचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा. तसं झालं तर सगळ्याच क्षेत्रांत ही मुलं नक्कीच उत्तम कामगिरी करून दाखवू शकतील.”
कविता राऊत हे एक उदाहरण आहे, माणसातल्या जिद्दीचं… चिकाटीचं!
Leave a Reply