साप्ताहिक उल्हास प्रभात, ठाणे आणि आरोग्य होमिओपॅथीक फार्मसी यांच्यातर्फे राज्यस्तरीय दिवाळी अंक २०१३ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या मध्ये महाराष्ट्रातील शेकडो दिवाळी अंकांनी आपला सहभाग नोंदवला होता. दिवाळी अंकांच्या शतकोत्तर परंपरेचे औचित्य साधून यंदाच्या उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देण्यासाठी आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या ” कविता सागर ” दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले असून लवकरच ठाणे येथे होणार्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ” कविता सागर ” चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ असलेल्या कविता सागर प्रकाशन यांच्या वतीने प्रकाशित एक आगळा वेगळा व कौतुकास पात्र ठरलेला, अनेक नवकवींच्या कवितांना अग्रगण्य स्थान देणारा व केवळ कवितांसाठी असलेला एकमेव दिवाळी अंक ” कविता सागर ”
गेल्या वर्षी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. कविता सागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवा मार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला होता. या दिवाळी वर्षीचा अंक १ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झाला व तो सर्वदूर पोहचविण्यासाठी संपादक मंडळाने चांगले प्रयत्न केले आहेत. कविता सागर सर्व लेखक कवी यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत कविता सागर प्रकाशनाने अनेक लेखक कवी यांचे साहित्य प्रसिध्द करून ते जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचवले आहे. यावर्षीचा हा दिवाळी अंक हा जगभरातील ई-दिवाळी अंकांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये येन्याचा बहुमान मिळवला आहे. कविता सागर मधील सर्वच साहित्य वाचनीय, हृदयस्पर्शी आहे. या सर्व साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कविता सागर हा दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे.
बाळ बाबर, डी. बी. चिपरगे, डॉ. कुमार पाटील, डॉ. उमेश कळेकर, अनिल पाटील, त्रिवेणी हरोले, सौ माधुरी काजवे, सौ. स्वप्नजा घाटगे, किरण पाटील, विजय बेळंके, दिशा शिंदे, अनिल धुदाट, प्रकाश केसरकर, डॉ. विजयकुमार माने, शांतीनाथ पाटील, जयंत पठाडे, प्रा. दिवाकर
बोबडे, मयुर ढोलम, उज्ज्वला माघाडे, मयुरी नाईक, डॉ. नंदकुमार नहार, पूजा डकरे, रमेश इंगवले, सुहास समडोळे, शफी बोल्डेकर, अशोक पाटील, विष्णू वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कवितांनी या अंकाची उंची वाढवली आहे.
गतवर्षी कविता सागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. ठाणे येथील हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल, “ कविता सागर ” च्या अतिथी संपादिका – सौ. विजया पाटील त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि दिवाळी अंकांची सुरू असलेली १०५ वर्षांची परंपरा यापुढेही कायम राहावी, तसेच वाचकांना यापुढेही दर्जेदार दिवाळी अंक वाचायला मिळावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे व या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ” उल्हास प्रभात ” चे संपादक गुरुनाथ बनोटे यांनी दिली.
(संकलन – सागर मालाडकर)
— सागर मालाडकर
Leave a Reply