अमरावतीतील कर्हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. श्रीधर-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला. श्रीधर स्वत: डॉक्टर असूनही काहीही करू शकले नाहीत कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस वा औषधच उपलब्ध नव्हती. अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकला नाही. शालेय शिक्षण संपता संपता मॅट्रिकला पण नापास झाला. डॉ. श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली. मग दुसर्यांदा मॅट्रिकला बसून पास झाला, तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाला. तिथेही परत परीक्षेला बसून पास झाला तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला. तिसर्यांदा परीक्षेला बसून तिसर्या श्रेणीत पास झाला व मग पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली. पण तीही एकामागून एक सुटतच होती. पण एक गोष्ट मात्र सुरेशकडे कायम टिकून होती ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. कुठेतरी आत कविता रुजली व फुलत होती. समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेऊन कंदीलाच्या पिवळ्या प्रकाशात सुरेश तळपत होता. असेच एकदा अमरावतीला सुरेश गेला असताना प्रा. मधुकर केचे त्याला स्टेशनवर भेटले व स्वत: यशस्वी वाटेवर आरूढ असल्याने उपहासाने सुरेशला म्हणाले, कवी म्हणून तू संपलास. आता फक्त मास्तरकीच कर. पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, ते अजून ठरायचंय!
१९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले. यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला १३ वर्षांचा काळ जावा लागला व त्यातही सुरेशने ‘रंग माझा वेगळा’ हे दाखवून देत केशवसुत पारितोषिक पटकावले. बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेशचा ‘रंग माझा वेगळा’नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला. १९८३ साली सुरेशने स्वत:च प्रकाशक व्हायचं ठरवलं व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.
शिक्षणात गती नसलेल्या सुरेशने आईकडून काव्याप्रमाणेच संगीताची आवड पण उचलली होती. मैदानी खेळ पायाच्या अधूपणाने न खेळू शकणार्या मुलाला डॉ. श्रीधर यांनी बाजाची पेटी आणून दिली. पुढे त्याची संगीतातील आवड व प्रगती बघून संगीतातील शिक्षणासाठी प्रल्हादपंतांकरवी घरी त्याला संगीत शिकवणी सुरु केली. पुढे शालेय जीवन संपता संपता पायातील कमजोरीवर मात करण्यासाठी सुरेश जिद्दीने व्यायाम करू लागला.मवेळ बराच लागला पण दंडबैठका—डिप्स यासारख्या व्यायामामुळे तो हाडापेराने मजबूत झाला. नंतर नंतर तर पायात पण चांगलीच शक्ती आल्याने सुरेश सायकल पण चालवू लागला. वडिलांनी मग त्याला रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी आणून दिली.
अभ्यासात गती नसलेला सुरेश आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप, पेरिस्कोपसारख्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात वाकबगार होता. तसंच तो काचा कुटून पतंगाचा मांजा बनवी. सुरेशला बेचकी छान बनवता येई व त्यातही त्याचा नेम अचूक असे. या व्यायामाचा फायदा पुढे जेव्हा सुरेशने काव्यगायनाच्या मैफिली करायला सुरुवात केली तेव्हा मांडी घालून तासन् तास बसण्यासाठी झाला. सुरेशने केवळ शारीरिकच नव्हे तर शैक्षणिक कमतरतेमुळे त्याला दिल्या गेलेल्या दुय्यम वागणुकीला आपल्या जिद्दीच्या बळावर मात केली आणि तथाकथित साहित्यिकांना व दांभिकांना आपल्या कवितांद्वारे चोख उत्तर दिले.
कधीतरी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना सुरेशचा काव्यसंग्रह एका खोपटवजा दुकानात सापडला. तो वाचून प्रभावित होऊन त्यांनी सुरेशला शोधून काढलं आणि त्याच्या अनेक गाण्यांना चाली लावून अजरामर केलं. ‘मालवून टाक दीप’ ते पार ‘केंव्हातरी पहाटे’पर्यंत मंडळी अशा या तळपत्या सूर्याचा — सुरेशचा म्हणजेच कवीवर्य सुरेश भट यांचा आज स्मृतिदिन आणि म्हणून हे सगळं आठवण्याचं व सांगण्याचं कारण.
रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार यानंतर भटसाहेबांनी गझलेची बाराखडी, काफिला, झंझावात, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग, निवडक सुरेश भट आणि हिंडणारा सूर्य ही पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना मानाचा सप्रेम मुजरा! त्यांच्याबाबत बोलायचं तर ओठी असं येतं :
कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता
उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता
– उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
Leave a Reply