फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे ।
कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे…..१
बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने ।
यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने….२
निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती ।
शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती….३
लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता ।
छंद लागूनी नशाच चढली, जीवनामधील रंग बघता…४
त्या रंगाच्या छटा उमटल्या, फुला फुलातूनी दिसूनी येती ।
सप्त रंगाचे मिलन दिसले, आकाशाच्या क्षीतीजावरती….५
काव्यावरती जगेल कोण, हवी भाकरी जगण्यासाठी ।
मानहानी ती सदैव होई, केवळ अल्पशा पैशापोटी….६
मदत कुणाची मिळत होती, आला दिवस जाई निघूनी ।
काव्यातील आनंदात परि, डुबता सारे विसरूनी…. ७
विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फुर्ती देवता ।
अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता….८
अनुभव होता तना मनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते ।
उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते….९
लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी ।
परिस्थितीशी झगडा देवूनी, बाहेर आणती कुणी प्रसंगी….१०
गेलो विसरूनी उदास दिन , आज उमटले चित्र निराळे ।
सरस्वती नि लक्ष्मी दोघी, आशीर्वाद त्यांचा मिळे…. ११
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply