नवीन लेखन...

कायस्थी खाद्यजीवन इतिहास आणि संस्कृती

बंगालमध्ये फिरत असताना बंगाली पत्रकार -मित्र श्रीकांत बॅनर्जी आग्रहाने त्याच्या बोलपूरच्या घरी घेऊन गेले, मी जाणार म्हणून त्यांच्या एकत्र कुटुंबातील साऱ्या सदस्यांबरोबरच गावातील इतर नातेवाईक व शेजारी-पाजारी मला भेटायला गोळा झाले होते.चहापानाची तयारी जय्यत होती. एक गोड पदार्थ मुद्दाम देत होता. जायफळाचा वास येणारा तो मुडसर पदार्थ पाहून मी बुचकळ्यात पडलो. मग माझं बंगाली भाषांचे ज्ञान एकवटून मी श्रीकांतच्या आईला त्याची कृती विचारली ते आपल्या ‘निशाण्याचं’ बंगाली रुप होतं. मग चटकन माझ्या लक्षात आलं… बॅनर्जी म्हणजे ही मंडळी कायस्थच असणार की ! तिकडचे आपलेच भाऊबंद ! आज महाराष्ट्रातील कायस्थ समाज हा खानपान व खूश्ममीजाजचा शौकीन म्हणून ओळखला जातो. पण इतिहासात या मंडळींनी ज्या भूप्रदेशात वास्तव्य केलं तिथला इतिहास, निसर्ग, जीवनशैली व संस्कृतीचा गाढ प्रभाव या त्यांच्या खाद्यजीवनावर पडलेला दिसतो. त्याचा शोध खूप रोचक ठरतो.

प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या मते काश्मिरातील चिनाब नदीच्या खोऱ्यातून काया देशात म्हणजे आजच्या अयोध्या प्रांतात ही मंडळी स्थायिक झाली. त्यातील काही मंडळी आजच्या बंगालमध्ये गेली व तिथे ती कायस्थ या नावाने ओळखू लागली. तर शिलाहार काळात काही मंडळी गुजरात, माळवा व कराची इथून कोकणात आले. तिथे त्यांना प्रभू हे अधिकारपद मिळाले व त्याच जाती नामाने ओळखले जाऊ लागते. त्याकाळात उपजिविकेवरुन समाजात दोन गट वावरत असत. त्यांना असीजीवी व मसीजीवी म्हणत. म्हणजे तलवारीच्या जोरावर उपजिविका करणारे वा लेखणीचा पेशा करणारे! कायस्थ या दोन्ही प्रकारात मोडत. ते कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, हजरनीस अशी पदं, सांभाळीत लेखणीबहाद्दर म्हणून पुढे आले. त्याच काळात यांच्यातीलच काहींनी हाती नंग्या तलवारी घेऊन रणांगणेही गाजवली. या दोन्हीचाही सरळ सरळ प्रभाव त्यांच्या जीवनशैलीवर व खाद्यसंस्कृतीवर पडलेला दिसतो.

व्यवसायामुळे ही मंडळी राजे महाराजे सरदार-दरकदार, सावकार, जमीनदार यांच्या अगदी जवळची राहिली. काहींना तर स्वतःलाच तो बहुमान प्राप्त झाला. त्यामुळे बहुतांशतः जीवनशैली राजेशाही राहिली. खावे प्यावे मस्त मजा करावी. आपलं उत्पन्न, जबाबदारी, भविष्य याचा मेळ घालत खर्चावर नियंत्रण ठेवावे याचा ज्याची चाकरी करत होते. त्या राजे-महाराजाप्रमाणे सर्वसामान्य कायस्थाच्या माणसानेही विचार केला नाही. त्यामुळे यांच्या खाद्यजीवनात गोड तिखट, शाकाहारी, मांसाहारी अशा सर्व पदार्थांचा समावेश तर होत असेच.

पण तो करतानाही साऱ्याच गोष्टींचा मुक्त वापर होत असे. एकेकाळच्या मुगल सम्राटांच्या सान्निध्यात मटण-मांसाहारी प्रिती जडली तर पुढे कोकणातील विशेषतः रायगड जिल्हयातील निवासामुळे खाण्यात माशांचा मुक्त वापर होऊ लागला. जो कायस्थ समाज बंगालमध्ये गेला तिथेही त्यांनी मत्स्यप्रेम कायम ठेवून मूळ नाळेबरोबर इमान राखले.

कदाचित या साऱ्यांचा जो मूळ भूप्रदेश चंदा उर्फ चिनाब नदीच्या खोऱ्याचा प्रदेश तिथेही भोजनात माशांचा मुक्त वापर होत असावा. तो रक्तातील मूळ प्रवाह दोन्ही मंडळींनी कायम ठेवला. कालीमातेची भक्ती हे दोन्हीकडच्या कायस्थांचे समान वैशिष्टय आहे. त्यातूनच मांसाहार व मद्य याला नैवेद्यात स्थान मिळाले. महाराष्ट्रातील बहुतेक सारे कायस्थ हे कालीमातेच्या विविध रुपातील देवीचे भक्त आहेत. त्यामुळे मांसाहाराला यांच्यात धार्मिक महत्व प्राप्त झाले. याचे मूळ त्यांच्या रणांगणातील तलवार बाजीशीही करता येईल. ‘कनकारण्य’ या संस्कृत ग्रंथात त्याचे सुंदर वर्णन केलेले आढळले.

नारळ, सुके खोबरे, मसाल्याचे पदार्थ, केशर, जायफळ यांचा मुक्त वापर हे ही त्यांच्या आहाराचे अविभाज्य अंग आहे. त्याचाही संबंध त्यांच्या एकेकाळच्या मध्य भारतातील वास्तव्याशी आहे. नारळ मात्र कोकणात प्रवेश केल्यावर आहारात आला. ‘खाजाचा कानवला’ हा कायस्थी गृहिणीचे वैशिष्ठय आहे. पण या कानवल्याचे मूळ रुप म्हणून पाकातल्या चिरोट्याकडे बोट दाखवता येईल. दोन पिढ्या अगोदरची कायस्थांची गृहिणी पूर्ण वेळ घरात असे. शिक्षणाची तोंडओळख झालेली असली तरी अर्थाजनासाठी घराबाहेर पडणे अजून रुळले नव्हते. चार-पाच मुलांमध्ये का होईना कुटुंब मर्यादित होते. अशा काळात मिळालेला मोकळा वेळ उपजत बुद्धिमत्ता कल्पकता व कला याचा मेळ घेऊन हा पदार्थ तयार झाला. कुटुंबात व ज्ञातीत प्रसारित झाल व लवकरच लोकप्रिय झाला.

मुन्शी प्रेमचंदांच्या ‘गोमतीके किनारे’ या गाजलेल्या कादंबरीत किशू नावाचे एक पात्र आहे. त्याला ‘शक्करख्वाजे’ आवडत. चंद्रकोरीच्या आकाराचे पांढरे शुभ्र खाजे त्याची आजी दिवाळीत बनवे. याचे सविस्तर वर्णन या कादंबरीत विषय अनुरोधाने आले आहे. हे शक्करख्वाजे म्हणजेही खाजाच्या कानवल्याचे पूर्वज असण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारचा पदार्थ मी मध्यप्रदेशात ‘मांडवगड’ मधे चाखला होता.

बाकी वालाचं बिरडं हे मात्र खास रायगड जिल्ह्यातील वास्तव्याचं चिन्ह आहे. हा वालही या जिल्ह्यातील कुठलाही चालत नाही. महाराष्ट्र सोडून किंवा अगदी देश सोडून कुठेही गेलेल्या कायस्थाच्या माणसाला वाल मात्र पेण, नागोठणे किंवा रोहाचाच हवा असतो. हंगामात तो कसंही करुन वर्षभरासाठी वाल घेवून ठेवतोच. मग या बियतनच पुढे मुगाचे, चवळीचे व हरभऱ्याचे बिढे कल्पकपणे तयार झाले. श्रावणातील जिवतीच्या वाणात ‘आरती’चा यमविराही अशा विपुल तांदुळाच्या प्रदेशातील वास्तव्यानेच झाले, मात्र साधं तांदळाचे पिठ, गूळ यातून तयार होणाऱ्या या टेरेदार पदार्थामधील कल्पकता वाखाणण्याजोगी तेव्हा मेहनत व चिकाटी वेळखाऊ पणाबरोबर सुचवतात.

आगरी, कोळी, भंडारी व पाठारे प्रभू यांच्याबरोबरच खूप जुन्या काळापासूनच चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंचे वास्तव्य मुंबई, ठाणे, डोंबिवली व कल्याण परिसरात आहे. त्यांच्यात एकमेकांच्या आहार-विहार पद्धतीची सहज देवघेव झाली. माझ्या डब्यातले तळलेले बोंबिल पाहून रोहिंटन हा माझा बॅकेतील सहकारी मला हा पारसी पदार्थ तुझ्या डब्यात कसा रे? म्हणून नेहमी विचारी. भरलेले पापलेट, बोंबिल, बटाटा भाजी, माशाचे भुजणे कोलंबीची खिचडी, खिम्याचे कानवले गाभोळी करी, चिंबोरीचे सूप शेवळाची कणी आणि गुंजरमाशाची खिचडी हे सारे मुंबईचा मूळ रहिवाशांचे पदार्थ आहेत. पारसी समाजही खूप जुन्या काळापासून मुंबईत स्थिरावला आहे. प्रभू मंडळीशी त्यांचा अनेक ठिकाणी दोस्ताना आहे.

साधी व बरक्या फणसाची खांडवी, राजेरी केळ्याचा हलवा, आंब्याच्या रसाली, खारी किंवा साधी सांजणी, आंबोळे, भरती केळी, साधे, व चवाचे घावणे, मोराणी हे पदार्थ चविष्ट व खुमासदार खरेच पण ते करायला मेहनत व वेळ लागतो. जुन्या जमान्यात हा पदार्थ आधुनिक यंत्रसामग्री अभावी व खूप मोठ्या प्रमाणात करावा लागत असे. तेव्हा गृहिणीची कसोटीच लागे. पण कायस्थांच्या घराघरातील माहिला ते हौसेने पार पाडत.

गोळ्याचे सांबार, सोडयाची खिचडी विविध प्रकारच्या रानभाज्या व त्यांचे पदार्थ. सुक्या मासळीचा मुक्त वापर मुगाच्या डाळीची कळण व शेंगवळे हे सारे पदार्थ कायस्थांच्या घराघरात जुन्या काळापासून होते. मुंबईत अनेक पिढ्यांपासून असलेले वास्तव्य व शिक्षणात आघाडी याने इथे ही मंडळी खूप पूर्वीपासून फोर्टात विविध ऑफिसेस व शासकीय कार्यालयात नोकरीला होती. त्यातूनच ब्रिटिश काळात गोऱ्या राज्यकर्त्यांशी निकटचा संबंध आला. एके बाजूने स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसरत्त्वाची धुरा वहात वहात गोऱ्या लोकांच्या काही गोष्टींचे या मंडळीनी कळत न कळतपणे अनुकरण केले. यात पेहरावाबरोबर खाद्य संस्कृतीचाही समावेश होतो. आज कुणाला नीटसे समजणारही नाही पण अगदी सत्तर-ऐंशी वर्षापूर्वी चहा, पाव, बिस्कीटे, केक हे पदार्थही लोकांच्या खाद्य जीवनात त्याज्य समजले जात.

पण मुंबईत दादर, ठाणे, कल्याणमध्ये राहून ब्रिटिश कंपन्यामध्ये नोकऱ्या करणाऱ्या प्रधान, गुप्ते, चित्रे, राजे या मंडळींनी या गोष्टी केव्हाच आपल्याशा केल्या होत्या. त्याला अर्थात त्यांचे सामाजिक पुरोगामीत्वही काहीसे कारणीभूत ठरले होते. त्या काळात ही मंडळी सपत्निक एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याकडील पार्टीला जात असत याचे आता राहून राहून आश्चर्य वाटते. मग तिथे गेलेल्या या देखण्या महिल्या नाकातील सर्ज्याची नथ सांभाळत चांदीच्या प्याल्यातील मद्याचा कसा दिमाखात स्वाद घेत याचे बहारदार वर्णन साहित्यिक दि. द. घाटे यांच्या एका लेखात आला आहे. पूर्वी ‘दाट्या’च्या दिवशीही कायस्थ स्त्री-पुरुष एकमेकांकडे फराळाला जातं. लग्नाआधीचं गडोतर व्याही भोजन किंवा हा दात्याचा फराळ ह्या काळातल्या कौटुंबिक पायच होत्या. रायगड परिसरातील वालाची ‘पोपटी’ ही त्यातीलच खाणे. पिणे, दुसऱ्यांना खायला घालणे व मौज मजा करणे याची कायस्थ मंडळींना मनापासून आवड होती.

श्रीनिवास गडकरी
कायस्थ वैभव या कायस्थ समाजाच्या मुखपत्रातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..