भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने भर घालणाऱ्या सूरश्री केसरबाई केरकर या गोव्याच्या भूमीकन्या. त्यांचा जन्म १३ जुलै १८९२ रोजी झाला. उस्ताद अब्दुल करीम खाँ, प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. १९२१ मध्ये त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खाँ यांचे शिष्यत्व पत्करले. त्या राजे – सरदार मंडळींसाठी नियमितपणे मैफिली करत असत. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली. नोबेल पुरस्कारविजेते कवी रवींद्रनाथ टागोर हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते.
कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने १९४८ साली केसरबाईंना ‘सूरश्री अशी पदवी बहाल केली. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला. रवींद्रनाथ टागोरांनी ‘सूरश्री’ किताब बहाल केला. रवींद्रनाथांनी दिलेले गौरवपत्र चांदीच्या चौकटीत घालून केसरबाईंनी शेवटपर्यंत जतन करून ठेवले. संगीत नाटक अकादमीने १९५३ साली ‘प्रमुख आचार्या’ ही सनद त्यांना बहाल केली. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जाते.
गोव्यातील कवी, नाटककार आणि आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे. केसरबाई केरकर यांचे १६ सप्टेंबर १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
Leave a Reply