मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती होती. त्यांचा जन्म २३ मे १८९६ रोजी अमरावती येथे झाला. केशवराव भोळे यांचे वडीलही संगीताचे शौकीन होते. ते स्वतः सतारही वाजवीत असत. केशवरावांचा जन्म होण्यापूर्वीच त्यांचे वडील वारले. तथापि घरातील संगीतमय वातावरणामुळे केशवरावांना लहानपणापासूनच नाटक-संगीतादी पाहण्या-ऐकण्याचा नाद लागला आणि तो वाढत जाऊन अखेरपर्यंत टिकला. वैद्यकीय अभ्यासासाठी ते मुंबईस आल्यावर ह्या नादाला खोली आणि चौरसपणा येऊन तो इतका वाढला की, त्यांनी वैद्यकीय अभ्यासावर पाणी सोडले. ह्याच सुमारास त्यांचा दुर्गा केळेकर (विवाहोत्तर ज्योत्स्ना भोळे) ह्यांच्याशी विवाह झाला. त्यांनीही कालांतराने संगीत-नाटकाच्या क्षेत्रांत चांगला नावलौकिक संपादन केला. जुलै १९३३ मध्ये ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा ह्या श्री. वि. वर्तकलिखित प्रसिद्ध नाटकामध्ये त्यांनी केलेले पहिलेच बिंबाचे (नायिका) काम अतिशय गाजले. केशवरावांचाही ‘नाट्यमन्वंतरा’शी संबंध जडला. आंधळ्यांची शाळामध्ये ज्योत्स्नाबाईंनी गायलेल्या दोन गाण्यांची सुभग भावपूर्ण स्वररचना केशवरावांनीच केली होती. ह्या सर्वांमुळे केशवराव संगीताचे नवरचनाकार म्हणून प्रसिद्धीस आले.१९३३ साली गोविंदराव टेंबे ह्यांच्या नंतर केशवरावांनी ‘प्रभात’ ह्या सिनेमाकंपनीत संगीतदिग्दर्शक म्हणून प्रवेश केला. ‘प्रभात’ कालखंडात केशवरावांची स्वररचनाकाराची वृत्ती फुलून आली. हा बहर अमृतमंथन, संत तुकाराम, कुंकू, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, संत सखू, चंद्रसेना इ. बोलपटांमधील गीतांच्या त्यांनी केलेल्या स्वररचनांमध्ये आणि संगीताच्या दिग्दर्शनामध्ये भरपूर दिसून येतो, त्यांखेरीज कित्येक सुट्या भावगीतांनाही त्यांनी चाली लाविल्या, हा प्रामुख्याने त्यांचा निर्मितिकाल मानता येईल. पुढे ते आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संगीतविभागाचे प्रमुख झाले.
‘एकलव्य’ ह्या टोपणानावाने केशवराव भोळे ह्यांनी वसुंधरा ह्या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या रमणीय शैलीमुळे आणि माहितगारीमुळे विख्यात झाले. तेच लेख पुढे आजचे प्रसिद्ध गायक (१९३३) ह्या पुस्तकात संगृहीत करण्यात आले. ह्या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती म्हणजे संगीताचे मानकरी (१९४९) होय. त्यांनी नंतर ‘शुद्धसारंग’ ह्याही टोपणनावाने लेख लिहिले. त्यांत त्याची चिकित्सावृत्ती, परखडपणा, बोचरेपणा इ. विशेष दिसून येतात. आवाजाची दुनिया, अस्ताई, वसंतकाकाची पत्रे, माझे संगीत, अंतरा आणि जे आठवते ते हे आठवणीवजा आत्मचरित्र सुद्धा लिहिले.
केशवराव भोळे यांचे ९ नोव्हेंबर १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply