केवळ राशीवरून भविष्याचा अंदाज वर्तवता येतो का?
साडेसाती वरचे माझे दोन लेख वाचून मला अनेकांनी आपली राशी सांगून साडेसातीचा त्यांच्यावर काय चांगले-वाईट परिणाम होईल असा प्रश्न विचारला होता. सर्वाना वैयक्तिक उत्तरं देणं शक्य नसल्याने सर्वासाठी म्हणून मी हा लेख लिहितोय.
जन्मावेळी आपल्या चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी समजली जाते. त्या त्या राशीतील हा चंद्र व चंद्राचं इतर विविध ग्रहांशी होणारं चांगलं-वाईट साटं –लोटं चांगली-वाईट फळ देतात, राशी कधीही फळ देत नाही. कोणत्याही राशीतील ग्रह फळ देत असतात. ग्रह ही व्यक्ती आहे असं समजल्यास राशी हे त्याचे कपडे असतात.
कुंडलीतील कोणताही ग्रह एकेकटा कधीही आणि कोणतेही चांगले-वाईट परिणाम करण्यास असमर्थ असतो..आपण आजारी पडल्यावर डॉक्टर कडे जातो व कोणतेही निदान करण्यापूर्वी डॉक्टर जस आपल्याला रक्त, लघवी, थुंकी, मधुमेह, रक्तदाब वैगेरेच्या विविध चाचण्या करायला सांगतात व त्या चाचण्यांचे आलेले रिपोर्ट तपासून आपल्याला काय झालंय त्याचं निदान आणि त्यावर औषधोपचार करतात, तसं ज्योतिष शास्त्राचं आहे. निदान माझी तरी पद्धत तशी आहे.
कोणत्याही ग्रहाला प्राप्त झालेली राशी, स्थान म्हणजे घर किंवा भाव, नक्षत्र, भावेशत्व, ग्रहाच वय, ग्रहावर असलेली इतर ग्रहांची चांगली-वाईट दृष्टी व त्या विवक्षित ग्रहाचे इतर ग्रहांशी होणारे शुभ-अशुभ योग असे सात ‘रिपोर्ट’ पाहिल्याशिवाय मी कोणाचाही अंदाज वर्तवत नाही. प्रत्येक ग्रहाची अशा प्रकारे तपासणी करून वर्तवलेले भविष्यविषयक अंदाज सहसा चुकीचे येत नाहीत हा माझा गेल्या २२-२३ वर्षांचा अनुभव आहे.
आणखी स्पष्ट करून सांगायचं तर एक उदाहरण देतो.
आता आपल्या देशात पूर्ण बहुमताचं सरकार आहे. सरकार एकाच पक्षाचं असल्यानं ते मजबूत आहे व विरोधक त्यांचे फारसे काही वाकडे करू शकत नाहीत. सरकारला देश चालवण्यासाठी आवश्यक वाटलेले नियम व कायदे सरकार स्व-बळावर करू शकते. विरोधक विरोध करत असले तरी त्यांची ताकद मर्यादित असल्याने त्यांच्या विरोधाचा तेवढासा परिणाम होत नाही. तसंच ग्रहांच आहे. मूळ कुंडलीत शुभ ग्रहांचं सरकार मजबूत असलं की अशुभ ग्रहांचे विरोधक आपलं फारसं वाकडं करू शकत नाहीत.
आता नेमकी उलटी परिस्थिती आपल्या राज्यात आहे. इथे दोन पक्षांचे मिळून सरकार आहे व सरकार मधीलच दोन पक्षात अनेक मतभेद आहेत. एकमेकाच्या निर्णयाला विरोध करणे हा एकमेव अजेंडा असल्याने राज्यकारभार व लोककल्याणाचा अपेक्षित वेग राज्यातल्या सरकारला गाठता येत नाही हे आपण गेली दोन –अडीच वर्ष पाहतोय. नेमकं असचं आपल्या जन्म कुंडलीतल्या ग्रहांच असत असतं.
लेखाच्या चौथ्या परीश्चेदात उल्लेख केलेल्या गोष्टीवर केंद्र सरकारप्रमाणे एकमेकाला मदत करणाऱ्या ग्रहांची संख्या जास्त असली की आपल्यावर संकट आली तरी त्यातून आपण थोड्याश्या प्रयत्नाने निभावून जाऊ शकतो तर राज्य सरकारप्रमाणे एकमेकाला विरोध करणाऱ्या ग्रहांची जास्त असली की मामुली संकटातून बाहेर पडण्यासाठीही नेटाने प्रयत्न करावे लागतात.
तात्पर्य, कोणत्याही एका राशीमुळे किंवा ग्रहामुळे भविष्याचा अंदाज निदान मला तरी वर्तवता येत नाही..संपूर्ण कुंडली वर उल्लेख केलेल्या सात विविध मुद्द्यांच्या कसोटीवर पाहून मगच काही सांगता येऊ शकते. शुभाशुभ ग्रहांची एकी किंवा विरोध तपासून वर्तवलेला अंदाज सहसा चुकत नाही असंही अनुभव येतो. नुसती राशी कोणतेही भाकीत करण्यासाठी पुरेशी नसते.
-नितीन साळुंखे
9321811091
www.astroganesh.in
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply