पाऊस पडून गेल्यावर काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा हमखास होतेच. अलीकडे कोणत्याही राजस्थानी स्वीट मार्टमध्ये गरमागरम सामोसे विक्रीला ठेवलेले असतातच. ज्याला ‘छोटीशी भूक’ आहे, तो सामोसा खायला, नक्कीच प्राधान्य देतो. दुकानदार तो गरम सामोसा पेपरप्लेटमध्ये घेऊन अंगठ्याने दाबून तो फोडतो, त्यात साॅस, ग्रीन चटणी घालून वरती बारीक शेव भुरभुरतो व सोबत एक तळलेली मिरची देतो.
सामोसा फारच गरम असेल तर आपल्या तळहाताला चटका बसत असतो. आधी कडेचा कुरकुरीत भाग खाऊन झाल्यावर आपण सामोसाच्या तुकड्याबरोबर आतील मटार बटाट्याच्या भाजीचे सारण खाऊ लागतो. मधेच मिरचीचा जीभेला तडका दिल्यावर सामोसा ‘लज्जतदार’ वाटतो. सामोसा संपेपर्यंत पेपरडीश साधी असेल तर लगदा होण्याच्या मार्गावर असते. शेवटी एकदाचा हा सामोसा जठराग्नी ‘शांत’ करतो व आपण ओलसर पेपरडीशची घडी करुन डस्टबीनमध्ये टाकून, वरती एक ग्लासभर पाणी पिऊन, ढेकर देतो.
सामोसा म्हणजे थोडक्यात त्रिकोणी आकाराची, एक प्रकारची तिखट करंजीच! दिवाळीतील करंजी ही गोड सारणाची, अर्धवर्तुळाकाराची व टिकाऊ असते तर सामोसा हा त्रिकोणी आकाराचा मटार-बटाटा भाजीचे सारण घालून कुरकुरीत तळलेला, ताजा असतानाच खाण्याचा पदार्थ असतो.
पूर्वी कॅम्पामध्ये एमजी रोडवर ‘कॅफे नाझ’ या इराणी हाॅटेलमध्ये, स्पेशल सामोसे खाण्यासाठी पुणे शहरातील खव्वैये हजेरी लावायचे. तिथे सामोसेची ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही दोघे असा किंवा चौघेजण, वेटर बारा सामोसेंची प्लेट आणून समोर ठेवत असे. सोबत एक साॅसची बाटली. हे छोटे सामोरे गरम तर असायचेच शिवाय जादा तळलेले असल्याने, कमालीचे कुरकुरीत लागायचे. त्यातील कांदा व कोबीची भाजी टेस्टी लागायची. ती भरगच्च प्लेट हा हा म्हणता संपून जायची. नंतर टिपिकल इराणी चहा पिऊन झाल्यावर, आत्मा संतुष्ट होत असे.
आता अशाच प्रकारचे पट्टी सामोसे शनिपार जवळील ग्रीन बेकरीत मिळतात. तिथे हे सामोसे विक्रीला आल्यावर तासाभरात संपूनही जातात. पुणेकरांना एखाद्या पदार्थाची ‘चटक’ लागली की, तो पदार्थ ‘माऊथ’पब्लिसिटीने ‘मशहूर’ होतोच!!
सहकार नगरला सारंग बसस्टाॅप शेजारी रोज सकाळी एक व्हॅन येऊन उभी राहते. ‘शिंदे सामोसेवाले’ असा, बोर्ड त्यावर लावलेला असतो. पंधरा रुपयांत एक मोठा गरमागरम सामोसा आपल्याला पेपरप्लेटमध्ये दिला जातो. यातील सारण हे बटाटा भाजीचेच असते. तळलेल्या मिरची सोबत हा सामोसा आपली एका ब्रेकफास्टची भूक भागवतो. आणलेले सामोसे संपल्यावर पुन्हा गरमागरम सामोसे आणले जातात. कित्येकजण पार्सलसाठी तिथे रांग लावतात.
नारायण पेठेत ‘गुप्ता’ फरसाणच्या दुकानात गरम सामोसे दिवसभर मिळतात. नारायण, शनवार, सदाशिवपेठी खवैय्ये त्यावर तुटून पडतात.
बालाजी नगरमधील ‘नारायण खमण ढोकळे’वाल्याकडे सकाळी आठ वाजल्यापासून सामोरे विक्री सुरु होते. मी दर रविवारी, सामोसे पार्सलसाठी तिथे जातो. ते सामोसे खाल्ल्याशिवाय रविवार साजरा झाल्यासारखे वाटत नाही.
ज्ञान प्रबोधिनी जवळील खाऊ गल्लीत वीस वर्षांपूर्वी ‘अनारसे सामोसेवाले’चं एक खोकं होतं. ‘जीवाला खा!!’ अशी त्यांची जाहिरात होती. त्यांची तिथं दोनच माणसं काम करायची. एकजण पैसे घ्यायला व दुसरा करंडीतून गरमागरम सामोसे, पेपरप्लेटमध्ये द्यायला. सामोरे फारच चविष्ट असायचे, साहजिकच करंडीभर सामोसे दहा मिनिटात संपून जायचे. माणसं सामोसे येण्याची वाट पहात उभे रहायचे. काही वर्षांनंतर त्यांनी शेजारीच दुकान घेऊन सामोसे विकू लागले. तिथेही नेहमीच गर्दी असायची. त्यांनी सामोसेमध्ये नवनवीन प्रकार आणले. आता ते दुकान बंद करुन त्यांनी नागनाथ पाराकडून शनिपारकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन स्वरुपात ‘अनारसे सामोसे’ सुरु केलंय.
आपणही कधी जमेल तेव्हा वरीलपैकी एकातरी ठिकाणी ‘सामोसा’ खाऊन पहा, म्हणजे या लेखाचं नक्कीच सार्थक होईल.
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
१८-६-२१.
Leave a Reply