मुंबईतून आपण डॉ. आंबेडकर मार्गाने दादरच्या दिशेने यायला निघालो की, आपल्या डाव्या हाताला मुंबई महानगर पालिका मुख्यालयाच्या इमारत, टाईम्स ऑफ इंडियाची इमारत, पुढे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, अंजुमन इस्लाम शाळा लागते. इथूनच पुढे जे. जे. उड्डाणपूल लागतो. हा उड्डाणपूल जे. जे. रुग्णालयाकडे खाली उतरतो व लगेचच काही अंतरावर आपण इस्माईल मर्चंट चौकात पोहोचतो. या चौकातून आणखी एक फ्लाय ओव्हर सुरु होतो, जो पुढे काही अंतरावर जाऊन दोन विरुद्ध दिशांना विभागतो. फ्लाय ओव्हरचा उजवीकडचा हिस्सा आंबेडकर मार्गाने दादरच्या दिशेने जातो, तर दुसरा रास्ता किंचित डावीकडे जात मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयाच्या पुढे उतरतो. हा फ्लाय ओव्हर मागे जिथे दोन दिशांना विभागते, बरोबर त्याच बेचक्यात एक पूर्ण पुरुष उंचीचा काळा पुतळा दिसतो. पुतळा उभा आहे म्हणून तो ‘खडा’ आणि पारश्याचा आहे म्हणून ‘पारशी’. हाच तो आपला ‘खडा पारशी’..!!
हे एवढं वर्णन करण्याचं कारण म्हणजे, मुंबईत नव्याने येणारे अनेक जण मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी असलेल्या फिरोजशहा मेहता यांच्या उभ्या पुतळ्यालाही ‘खडा पारश्या’चा पुतळा समजतात म्हणून. भायखळा उड्डाण पुलाच्या बेचक्यातील पुतळा आणि फिरोजशहा मेहतांच्या या पुतळ्यात बरंच साम्य असल्याने हा गैरसमज होतो. दोन्ही पुतळे काळे, दोन्ही उभे आणि दोघंही पारशी..! फिरोजशहा मेहतांच्या पुतळ्याच्या संदर्भात ‘खडा या शब्दावरून एक चावट कोटीही केली जाते, पण ती इथे सांगणं अप्रस्तुत होईल. ‘फिरोजशहा मेहतांच्या पुतळ्याला खडा पारशी म्हणतात’ असा चुकीचा उल्लेख मी मुंबईवरच्या एका इंग्रजी कादंबरीत (बहुतेक सुकेतु मेहतांची कादंबरी असावी, नक्की आठवत नाही) वाचला होता. मलाही तसंच वाटायचं. इतर कुणाचा माझ्यासारखा गैरसमज होऊ नये म्हणून पहिल्या परिच्छेदात वर्णन दिलेलं आहे.
हातात चंदनाच्या लाकडाचे दोन तुकडे आणि डाव्या हातात छातीशी झेंद अवेस्ताचा ग्रंथ धरलेला हा ‘खडा पारशी’ पुतळा आहे ब्रिटिश आमदनीतील धनाढ्य पारशी व्यापारी करसेटजी मानेकजी श्राॅफ यांचा. हा पुतळा करसेटजींचे चिरंजीव मानेकजी करसेटजी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ उभारलेला आहे. पुतळा ज्यांचा आहे, त्यापेक्षा पुतळा ज्यांनी उभारलंय त्यांचं कार्य, विशेषतः मुंबईतल्या मुलींच्या शिक्षणतलं, मोठं आहे.
मुंबईतल्या त्या वेळच्या इतर बहुतेक सर्व पारश्यांप्रमाणेच व्यापारी घराण्यात जन्म घेतलेल्या मानेकजी कर्सेटजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. इंग्रजी भाषेवरचं हेच प्रभुत्व मानेकजींना इंग्रज राज्यकर्त्यांच्या अधिक जवळ घेऊन गेलं. किंबहूना मानेकजींना इंग्लिश राज्यकर्त्यांबद्दल जरा जास्तच महत्व होतं असं म्हटलं तरी चालेल. याच कारणाने बहुतेक त्यांचं, मुंबंईतील पारशी समाजाची शीर्षस्थ संस्था असलेल्या ‘पारशी पंचायतीशी’ वितुष्टही आलं होतं. इंग्रजी राज्यर्त्यांसोबतची त्यांच्या जवळीकीने त्यांना मुबईत सरकारातली मानाची व अधिकारांची पदही मिववून दिली. मानेकजींना त्यावेळच्या ज्युरीमधेही स्थान मिळाले होते. मानेकजी त्यावेळच्या ‘बोंबे ब्रांच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी (आताची एशियाटीक सोसायटी आॅफ मुंबई’चे निवडून आलेले पहिले भारतीय सदस्य होते. हे सदस्यत्व त्यांना २९ जानेवारी १८४० राजी मिळाले. पुढे ते रॉयल जिओग्राफिक सोसायटीचेही फेलो झाले.(पान २१ /४२ ग्लिम्प्सेस ऑफ बोंबे अँड वेस्टर्न इंडिया – जेम्स डग्लस -१९००)
माणेकजींना मुंबईतल्या स्त्रीयांच्या शिक्षणाविषयी कळकळ होती. त्यासाठी त्यांनी दोन तीन वर्ष त्याकाळातल्या इंग्रज अधिकाऱ्यांशी आणि मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार व त्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीही घेतल्या होत्या. मानेकजी आणि इंग्रज कराज्यकर्ते यांच्यातला हा सर्व पत्रव्यवहार ‘A few passing ideas for the benefit of India and Indians’ या त्यांनी सन १८६२ साली लिहिलेल्या पुस्तकात प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकाची एकूण चार भागांची मालिका असल्याचं त्यांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे. मी फक्त चौथा भाग, जो मुलींच्या शिक्षणासंबंधी आहे, वाचला आहे.
या सर्व लोकांकडे त्यांनी मुंबईतल्या धर्म-जात, अंधश्रद्धा इत्यादी समस्यांतून मार्ग काढण्याठी पत्रांतून चर्चा केलेली लक्षात येते व यातून मार्ग काढण्यासाठी मुली शिकल्या पाहिजेत असं म्हणून, मुलींसाठी शाळा सुरु करण्याचा त्यांचा मनोदय पत्रांतून बोलून दाखवला होता व या कामात त्यांनी स्वत:ला मदत करावी अशी विनंती केल्याचं दिसतं. या अधिकाऱ्यांना त्यांनी ते सुरु करणार असलेल्या मुलींच्या शाळेसाठी एखादी चांगली शिक्षिका लंडनहून पाठवून देण्याची वारंवार विनंती केली त्यांच्या पत्रांतून दिसून येते.
या पुस्तकातल्या पान क्रमांक ७८ वर त्यांनी इंग्लंडमधल्या त्यांच्या कुणा मित्राला लिहिलेल्या दिनांक १८ मार्च १८६० रोजीच्या पत्रात, ते सुरु करणार असलेल्या मुंलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करण्यास तयार असणाऱ्या मिसेस स्मिथ भेटून गेल्याचं कळवलं आहे. मिसेस स्मिथच्या कामाची वेळ व त्यांना महिना रु. २०० पगार ठरवल्याचंही म्हटलं आहे. शाळेसाठी ‘यंग लेडीज इन्स्टिट्यूट’ असं तात्पुरतं नांव ठरवल्याचं आणि शाळा स्वत:च्या ‘व्हिला भायखळा (Villa Byculla)’ या राहात्या घरात सुरु करायचं ठरवलं असल्यांचं म्हटलं आहे. या शाळेमधील प्रवेशासाठी मुलींचं वय ५-११ व स्त्रियांसाठीचं वय १२ ते १९ असावं असंही निश्चित केल्याचं कळवलं आहे. या शिवाय मुलींच्या शाळेसाठी विषय कोणकेणते असावेत, शाळेचा खर्च कसा सांभाळावा इत्यादी ७ नियम तयार कळवून त्यांनी इंग्लंडला कळवलं होतं. गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिनस्टन यांनी मानेकजींच्या या प्रयत्नांबद्दल गौरवोद्गार काढल्याचाही उल्लेख या पत्रसंग्रहात आहे. हा सर्व पत्रसंग्रह वाचण्यासारखा आहे व जिज्ञासुंना तो अवश्य वाचावा.
अखेर मानेकजी करसेटजी यांनी दिनांक १ सेप्टेंबर १८६३ रोजी स्त्रियांसाठी मुंबईतली सर्वात पहिली आणि ती ही इंग्रजी माध्यमाची शाळा ‘द अलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन’ या नांवाने आपल्या राहत्या घरी, ‘व्हिला बायकुला (Villa Byculla)’ येथे सुरु केली. सुरुवातील या शाळेत १३ विद्यार्थिनी होत्या. या मुलींना शिकवण्यासाठी ब्रिटिश शिक्षिका (बहुतेक मिसेस स्मिथ, नक्की नांव सांगता येत नाही) पगारावर नेमण्यात आली होती आणि त्या शिक्षिकेच्या मदतनीस म्हणून मानेकजींच्या इंग्लंडहून शिकून आलेल्या मुली काम करत होत्या.
(क्रमश:)
… पुढील कथा आगामी भाग २ मध्ये
-@नितीन साळुंखे
9321811091
मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा लेखमाला- लेख ३१ वा
‘व्हिला भायखळा’ फोटो सौजन्य – अलेक्झांड्रा शाळा,
टीप – संदर्भ पुस्तकांची यादी दुसऱ्या भागाच्या शेवटी दिली जाईल.
Leave a Reply