नवीन लेखन...

खडा पारशी.. भाग २

‘खडा पारशी’ करसेटजींचे चिरंजीव मानेकजी करसेटजी यांच्या ‘व्हिला भायखळा’ या घरात १ सप्टेंबर १८६३ रोजी सुरु झालेली ‘अलेक्झांड्रा हायस्कुल’ ही मुंबईतील मुलींना इंग्रजी शिक्षण देणारी पहिली शाळा. ह्या शाळेच्या १८६४ सलत झालेल्या पहिल्या बक्षिस वितरण सोहळ्याला त्याकाळचे गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर (मुंबईला देखणं स्वरूप देण्यात या व्यक्तीचा मोठा सहभाग आहे) सपत्नीक उपस्थित होते. पुढे सन १८६५ मधे ही शाळा फोर्ट विभागातील हाॅर्नबी रो’वरच्या (आताचा डि. एन. रोड) एका इमारतीत तात्पुरती हलवण्यात आली, ती तिथे सन १८८१ पर्यंत होती. दरम्यानच्या काळात शाळेसाठी त्यावेळच्या वूडबी (Major Sidney James Waudby ) मार्गावरील (फोर्टच्या बाॅम्बे जिमखान्याला लागून असलेला आताचा हजारीमल सोमानी मार्ग) स्वत:ची जागा मुक्रर करण्यात आली. या ठिकाणी शाळेच्या इमारतीची पायाभरणी दिनांक २३ एप्रिल १८७८ रोजी त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल (रिचर्ड टेम्पलचा पुतळा भायखळ्याच्या राणी बागेतील भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या ईस्ट लाॅनवर पाहायला मिळतो) यांच्या हस्ते झाली होती, पुढच्या तीनच वर्षात या जागेवर शाळेची ‘अल्बर्ट हॉल’ ही गॉथिक पद्धतीने बांधलेली स्वत:ची देखणी इमारत उभी राहीली आणि सन १८८१ मधे हाॅर्नबी रोडवरील तात्पुरत्या जागेवरून अलेक्झांड्रा शाळा कायमची या ठिकाणी आली. शाळेची ही नवी इमारत बांधली होती त्या काळातले प्रसिद्ध इंजिनिअर खान बहादूर मंचेरजी कावसजी मर्झबान यांनी. त्या काळातली ही देखणी आणि भव्य इमारत त्याकाळच्या फोर्ट विभागाची ओळख बनली होती.

मानेकजींची ‘द अलेक्झांड्रा नेटीव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन’ ही शाळा आजही हजरीमल सोमाणी मार्गावरच्या त्याच ठिकाणी कार्यरत आहे. फक्त स्वातंत्र्योत्तर काळात शाळेच्या नांवातून ‘नेटीव्ह’ हा शब्द गाळण्यात आला आणि आता ही शाळा ‘द अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन’ किंवा केवळ ‘अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूल’ या नांवाने ओळखली जाते.

२०१८ सालातील सप्टेंबर महिन्यात या शाळेला १५६ वर्ष पूर्ण झाली. अल्बर्ट हॉल ही शाळेची इमारत जीर्ण झाल्याने १९७० सालात पाडून टाकण्यात आली आणि त्या जागी नवीन इमारत बांधण्यात आली. आताची शाळा नव्याने बांधलेल्या इमारतीत आहे. शाळेची आधुनिक इमारत बांधताना, शाळेच्या अल्बर्ट हॉल या ब्रिटिश काळातील जुन्या इमारतीच्या कमानीचा काही अंश आणि त्यासोबत सर रिचर्डच्या हस्ते १८७८ साली बसवलेली ‘अल्बर्ट हाॅल’ इमारतीची कोनशिला आजही शाळेने जपून ठेवली आहे. काळासोबत चालताना शाळेने तिचं तिच्या इतिहासाशी असलेलं नातं तोडलेलं नाही.

या शाळेला शेजार लाभला आहे भारताच्या औद्योगिक भविष्याचा पाया रचणाऱ्या जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांच्या ‘२९, एस्प्लनेड हाऊस’ या पवित्र वास्तुचा..! मुंबईतील मुलींच्या ‘पहिल्या’ शाळेला, देशातील अनेक महत्वाच्या क्षेत्रांत ‘पहिले’पणाचा मान असलेल्या टाटांचा शेजार मिळणं, हा शुभ संकेतच असावा..

आता पुन्हा करसेटजींच्या पुतळ्याकडे येऊ. मुलींच्या शिक्षणात कमालीचा रस असलेल्या मानेकजींना ज्या आपल्या वडिलांचा पुतळा उभारावासा वाटला, ते करसेटजी मानेकजी श्राॅफ मंबईतील धनाढ्य पारशी व्यापारी होते. मुंबईला नावारूपाला आणण्याच्या प्रयत्नात त्यांचा सहभाग होता. पारशी पंचायतीचे ते सन्माननीय सदस्य होते. त्यांची स्वतःची जहाज होती, बँकर होते(श्रॉफ हे आडनाव त्यामुळेच त्यांना मिळालं होत, जे पुढे मानेकजींनी वगळलं व त्यांच्यापासून पुढे करसेटजी हे आडनांव म्हणून स्थिर झालं), ज्यांना व्यापार करायचा असे, अशाना त्यांनी नेहेमी मदत केली होती. त्यांच्याबद्दल समाजात एवढा आदर होता, की अगदी घरगुती भांडण सोडवायलाही लोक करसेटजींना मध्यस्थी करण्याची विनंती करायचे आणि त्यांनी दिलेला निर्णय मान्य करायचे.

सन १८३५ मध्ये करसेटजींना धंद्यात खोट आली आणि त्यांच्या नशिबाचे फाटे पलटले. त्यात करसेटजींचं इंग्रज सरकारशी काहीतरी भांडण सुरु होतं व ते भांडण कोर्टात असल्याने त्याचा लवकर निकाल लागत नव्बता. याचा परिणाम पैशांचं आणि व्यापाराचं नुकसान होण्यात होतं होता. या भांडणाचा उल्लेख ‘दुर्दैव’ असा मानेकजींनी लॉर्ड एल्फिन्सटन याना दि. ३० नोव्हेबर १८४३ रोजी लिहिलेल्या पत्रात केला आहे. मानेकजी पत्रात लिहितात, “…The Thing, however, discourages me the most and poiganantly is that I am deprived of means pecuniary(by the reverse of my fathers fortune) to enable me to keep pace with my inclination to make myself useful not only to my family, but also to my countrymen in general, by introducing reforms in the former as might without much difficulty be imitated by the latter. The destruction of my father’s fortune, by his unfortunately procrastinated proceedings at law with the Government, destroys all my hopes of that independency which i once pictured to myself. This misfortune led to my asking and obtaining an office under the government, which I now hold, and which, though in point of honour and responsibility is great, and, by the way, the first of kind conferred on a native of India, yet ill paid, I must confess, in corresponding ratio. My recent trip to England, though it certainly improved my mind and body, yet impaired my finances in no small measures.”

मानेकजींनी याना एल्फिन्सटन लिहिलेल्या पत्रातील ह्या उताऱ्यावरून, मानेकजींचं कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्याचं लक्षात येतं आणि म्हणून त्यांना इंग्रजांकडे नोकरी कारण भाग पडल्याचं लक्षात येत. ह्याचा आणखी पुरावा दिनांक १० मार्च १९६६ रोजी मानेकजींच्या नातवंडांनी महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री. सुखटणकर याना लिहिलेल्या पत्रात मिळतो. हे पत्र त्यांनी ‘खडा पार्शी पुतळ्याच्या स्थानांतराबद्दल लिहिलं होत. ह्या पत्रात करसेटजीचं निधन ७ मे १८४५ रोजी झाल्याचा उल्लेख करून, निधन समयी करसेटजीनी त्यांच्या वारसांसाठी साठी फक्त ३० हजार रुपयांचा वारसा ठेवला होता, असा स्पष्ट उल्लेख आहे. लॉर्ड एल्फिन्सटनला लिहिलेल्या पात्रात मानेकजींनी त्यांच्या कुटुंबावर दुर्दैव ओढवल्याचा उल्लेख केला आहे, त्याला त्यांच्या नातवंडांच्या पत्रात दुजोरा मिळतो. ह्यावरून एक अंदाज असा बांधता येतो की, व्यापारात सुरु झालेल्या दुर्दैवामुळे करसेटजींचे निधन झालं असावं आणि ती रुखरुख त्यांचे पुत्र मानेकजींच्या मनात राहिली असावी आणि वडिलांनी दिलेल्या चांगल्या शिक्षणआणि संस्कारांमुळेच आपल्याला चांगले दिवस येऊ शकले या विश्वासानेच त्यांनी आपल्या वडिलांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असावा. अर्थात हा माझा अंदाज आहे, सत्य नव्हे हे कृपया लक्षात घ्यावं.

‘खडा पारसीं या नांवाने भायखळ्याच्या दोन उड्डाण पुलंच्या बेचक्यात उभा असलेलय कारशेटजींच्या पुतळ्याचं हे मूळ स्थान नव्हे. मुळातला पुतळा इथून जवळच असलेल्या ‘नागपाडा जंक्शन येथे सन १८६८ मध्ये उभारण्यात आला होता.

सन १८६२ मध्ये मानेकजी इंग्लंड येथे गेले असताना त्यांनी एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनास भेट दिली होती व तेथे ‘मेसर्स कोलब्रुकडेल’ या कंपनीने चिली या दक्षिण अमेरिकेतल्या देशासाठी तयार केलेलं एक कारंजं त्यांच्या नजरेला पडलं आणि त्यांना ते जसंच्या तसं आपल्या वडिलांच्या पुतळ्यासाठी असावं असं वाटलं. त्या कारंज्याच्या मधोमध असलेल्या उंच खांबावर असलेल्या ‘गोडेस ऑफ स्प्रिंग -वसंत ऋतूची देवता’ च्या ऐवजी वडिलांचा पुतळा उभा करण्यास सांगून, त्या कंपनीला तसंच एक पुतळ्यासहितचं कारं जं त्यांच्यासाठी बनवण्याची ऑर्डर दिली. पुतळा तयार व्हायला ५ वर्ष गेली आणि सन १८६७-६८मध्ये कारंज्यासह पुतळा मुंबई बंदरात आला. हा पुतळा मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात देऊन तो उभारण्यासाठी नागपाडा जंक्शन येथील जागाही देण्यात आली. ज्या जागेवर हे कारंजं आणि त्यावरील करसेटजींचा पुतळा उभारला होता, त्या जागी एक तलाव होता आणि त्या तलावासह ती जागा करसेटजींच्या मालकीची होती. पुतळा कारंज्यासह असल्यामुळे पाणी असणं आवश्यक होत आणि म्हणून ती तलावाची जागा नक्की करण्यात आली होती. तलाव बुजवून त्याजागी कारंज्यासह पुतळा उभारण्यात आला. साल होत १९६८.

नागपाडा जंक्शन म्हणजे बेलासिस रोड (मुंबई सेंट्रल स्टेशनहून भायखळ्याच्या दिशेने येणार आताचा जहांगीर बोमन बेहराम मार्ग), दोन टाकीतून येणार डंकन रोड आणि इस्ट बेलासिस रोड (सात रस्त्यातून येणार आताचा मौलाना आझाद मार्ग) हे चार रस्ते नागपाड्यात ज्या ठिकाणी एकत्र येतात, ते जंक्शन. पुढे १९२८ साली ह्या ठिकणी असलेल्या पुतळ्याच्या चहुबाजूने जाणाऱ्या ट्रामच्या ओव्हरहेड वायर्समुळे पुतळा खराब होतो हे महानगरपालिकेच्या लक्षात आलं आणि मग हा पुतळा आता ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी उभारण्याचं ठरवलं. पुतळ्याचं आताच्या ठिकाणी स्थानांतरण करण्यापूर्वी महानगर पालिकेच्या आयुक्तानी ‘खडा पारशीचे नातू आणि लघुवाद न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सी. एम. करसेटजी यांची अनुमती घेतली होती. महानगरपालिका आणि ‘खडा पारशी’चे वारसदार यांच्या सर्वसंमतीने नागपाडा जंक्शन येथे असलेला हा पुतळा, सन १९२९ साली आताच्या जागी उभारण्यात आला. तो अजूनही तिथेच आहे. मध्यंतरी हा पुतळा त्याच्या मूळच्या जागी, म्हणजे नागपाडा जंक्शन येथे पुनःप्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या, परंतु ह्या स्थलांतराला करसेटजींच्या वंशजांनी हरकत घेतल्याचं त्यांनी महानगर पालिकेच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून समजतं.

कारंजं आणि पुतळा ह्याच मूळचं स्वरूप आतापेक्षा खूप वेगळं होतं. त्याची वर्णनं इंटरनेटवर विपुलतेने वाचायला मिळतात आणि म्हणून त्याची पुररूक्ती इथे करत नाही.

भायखळ्याच्या दोन उड्डाण पुलांच्या बेचक्यात उभा असलेला आणि जाता-येता सहज नजरेला पडणाऱ्या ‘खडा पारशी’ आणि त्यांच्या वंशजांनी मुंबईला आजचं स्वरूप देण्यात फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. एकूणच पारशी समाजाचं मुंबईवर फार मोठं ऋण आहे. करसेटजिच्या ‘खडा पारशी पुतळ्याकडे लक्ष जाताच हा सर्व इतिहास आपण क्षणभरासाठी आठवावा आणि आपण सर्वानी त्या सर्व महानुभावांचे उपकार स्मरावे यासाठी हा लेखन प्रपंच. इतिहासात होऊन गेलेल्या अश्यासारख्याच अनेकांनी मुंबईला मुंबईपण मिळवून दिलं आहे. जात-पंत-धर्म आणि ज्या देशाने आपल्याला आपलं म्हटलं, त्या देशाच्या सर्वसामान्य जनतेसाठी जे चांगलं करता येईल, ते या लोकांनी मनापासून केलं आणि त्याच स्मरण आपल्याला नित्य असावं ह्या हेतूने मी हे लेखन केलं आहे.

-@नितीन साळुंखे .
९३२१८११०९१

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा लेखमाला- लेख ३ वा

महत्वाच्या टीप –

१. अलेक्झांडर शाळेत मुख्य ब्रिटिश शिक्षिकेला मदत करणाऱ्या मानेकजींच्या मुलींची नांव शिरीन आणि अमी अशी होती.

२. मानेकजींचा ‘व्हिला भायखळा’ हा बंगला सध्याच्या भायखळा पोलीस स्टेशनच्या गल्लीत कुठेतरी होता. बहुतेक सध्याच्या ‘रेजिना पेचीस’ कॉव्हेन्ट शाळेच्या जागी किंवा त्याच्याच आजूबाजूला कुठेतरी तो असावा, त्याकाळचे बहुतेक सर्व मोठे व्यापारी आणि अधिकारी याच लव्ह लेनमध्ये राहत असत. नक्की जागा कुठे होती त्याचा शोध घेत आहे.

३. मानेकजींचे वडील, ज्यांचा पुतळा ‘खडा पारशी’ म्हणून ओळखला जातो, त्यांचं गिरगाव घर चौपाटी नजीक कुठेतरी होतं. त्याचंही नक्की ठिकाण समजलेला नाही. शोध जारी आहे.

४. सध्याची अलेक्झांड्रा शाळा ज्या ठिकाणी आहे, तो हजारीमल सोमानी मार्ग म्हणजे पूर्वीचा ‘वुडबी रोड’. त्या वुडबी रोडच्या नामकरणाची आणि त्याच्या हरवलेल्या आणि मला सापडलेल्या संगमरवरी शिळेची माहिती मी स्वतंत्र रित्या देणार आहे.

संदर्भ –

1. विकिपीडिया

2. Glimpses of Old Bombay & Western India with Other Papers – James Douglas

3. ‘A few passing ideas for the benefit of India and Indians-Series IV’ हा मानेकजींनी विविध इंग्रज अधिकाऱ्यांशी केलेला पत्रव्यवहार

4. Cultural Intermediaries in a colonial City- The Parsis of Bombay- ह्या श्रीमती सीमिन पटेल यांच्या प्रबंधातील अंश.

5. एसीएम कारसेटजी, बेहरोज करसेटजी आणि अमी रुस्तमजी यांनी १० मार्च १९६६ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त श्री. सुखटणकर याना लिहिलेले पत्र.

6. अलेक्झांड्रा शाळेच्या प्रिन्सिपॉल, कर्मचारी वर्ग.आणि त्यांची वेबसाईट

7. फोटो सौजन्य – अलेक्झांड्रा शाळा आणि इंटरनेट. खडा पारशी फोटो -द हिंदू या वर्तमानपत्रातील विवेक बेंद्रे यांनी काढलेला फोटो.

8. मदत सौजन्य – माझे मित्र श्री सुधीर मोरे व त्यांची मोटर सायकल.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..