दरवर्षी प्रमाणे आज म. द. वारे सरांना भेटायला मी त्यांच्या सहकार नगरमधील ‘स्नेहल’ बंगल्यावर गेलो. पहातो तो काय बंगल्याच्या फाटकाला कुलूप. शेजारची बेल वाजविल्यावर एकाने फाटक उघडले. वरती सरांच्या खोलीत जाऊन बसलो. दहा मिनिटांनी सर आले.
वर्षातून या दिवशीच मी सरांना भेटत असल्यामुळे, मधल्या कालावधीत न भेटल्याची मला खंत वाटत होती. सर मात्र त्र्याण्णव वर्षे पूर्ण करुनही उत्साहाने माझे स्वागत करीत होते. पन्नास वर्षांपूर्वी जसे होते तसेच हसतमुख, ताजेतवाने! फरक होता तो फक्त पन्नास वर्षांची भिंतीवरील कॅलेंडर्स बदलल्याचा!
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडवरील शाळेत प्रवेश घेतल्यानंतर शाळा आपलीशी वाटण्याआधी सर्व शिक्षकवर्ग मला अधिक जवळचा वाटला. जणू माझी दोन घरं होती, एक राहण्यासाठी तर दुसरं शिकण्यासाठी! मोठ्या भावाची तीच शाळा असल्याने सर्व शिक्षक ‘प्रताप नावडकरचा धाकटा भाऊ’ म्हणून मला ओळखत होते.
ग. म. गोखले उर्फ तात्या, दि. दा. जोशी, म. द. वारे, सौ. विजया भानूबाई, सौ. ललिता गुप्तेबाई, फडके सर, भागवत सर, परांजपे सर, मो. रा. वाळिंबे सर, म. वि. दीक्षित सर, केसकर सर, चिपळूणकर सर, भटबाई, लिमयेबाई, जाधवबाई, दर्शने सर, सहस्त्रबुद्धे सर, इत्यादी गुरुजनांनी मला घडवलं. इतक्या वर्षांनंतर यामधील कित्येक जण स्वर्गवासी झाले, जे आहेत ते ऐंशी-नव्वदी पार केलेल्या वारे सरांसारखे!
सरांचं शिक्षण झालं नाना वाड्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, नोकरी लागली ती देखील टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्येच. पहिला पगार होता फक्त पंचवीस रुपये. चाळीस वर्षे अध्यापनाचे काम करुन १९८७ साली निवृत्त झाले, त्यालाही तेहतीस वर्षे झाली. आज पहिल्या पगाराच्या हजारपटीहून अधिक पेन्शन मिळते आहे.
सरांनी कलाशिक्षक म्हणून सुरुवात केली. नोकरी चालू असतानाच ए.एम. केलं. नंतर बी.एड. केलं. चित्रकलेशिवाय इतर विषय शिकविण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस केले. शारीरिक शिक्षणाच्या कोर्ससाठी दिल्लीला गेले. भूगोल विषयाचा कोर्स केला. मला आठवीला असताना त्यांनी भूगोल शिकविला.
चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायला लावला. मग ती ‘सकाळ’ची स्पर्धा असायची तर कधी ‘लायन्स क्लब’ ची. चित्रकला शिक्षक संघातर्फे घेतल्या जाणाऱ्या दरवर्षीच्या स्पर्धेत सरांनी मला भाग घ्यायला लावला. महिनाभराने स्पर्धेची प्रमाणपत्रं शाळेकडे आल्यानंतर तास चालू असताना सर मला बाहेर बोलावून प्रमाणपत्र हातात द्यायचे.
एलिमेंटरी परीक्षेला मी बसलो. त्या दरम्यान सर कोणत्यातरी कोर्ससाठी बाहेरगावी गेले होते. दि. दा. जोशी सरांनी महिनाभर परीक्षेची तयारी करुन घेतली. ऐन परीक्षेच्या वेळी मी आजारी पडलो. मला ‘सी’ ग्रेड मिळाली. फारच निराशा झाली. ते प्रमाणपत्र देखील मी घेतले नाही.
दहावी नंतर मी अकरावी रमणबागेत केली. सरांचा संपर्क कमी झाला. काॅलेज झाल्यावर मी घरीच डिझाईनची कामे करु लागलो. दरम्यान सर एका कामासाठी घरी आले होते. त्यांनी आमची घरातच काम करताना होणारी अडचण पाहिली व सौ. विजया भानूबाई यांच्या ‘गुणगौरव’ इमारतीमधील जागा चालेल का? असं विचारलं. आम्ही दोघांनी होकार दिला व गेली सदतीस वर्षे सरांच्या कृपेने आमच्या ‘गुणांचा गौरव’ होत आहे.
सरांनी निवृत्त होताना शाळेमध्ये सर्वच विषयांना दरवर्षी पारितोषिके दिली जातात, हे पाहिले. फक्त चित्रकला विषयालाच आजपर्यंत कोणीही पारितोषिक ठेवलेले नव्हते. सरांनी दहा हजार एलिमेंटरी व दहा हजार एंटरमिजीएट परीक्षेसाठी पारितोषिक ठेवले. जेणेकरून त्या रकमेच्या व्याजातून चित्रकला परीक्षेतील हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रोत्साहन मिळेल.
सरांनी लहानपणापासून शिक्षणासाठी, नोकरीसाठी, विद्यार्थ्यांसाठी खूप कष्ट घेतले. सर जेव्हा मुंबईला जे. जे. ला परीक्षा देण्यासाठी जात असत तेव्हा सदरा आणि पायजमा अशा साध्या वेषात असत. आज सरांकडे सर्व काही मुबलक आहे, तरीदेखील त्यांचे पाय जमिनीवर आहेत.
सरांचा जन्म खरं तर भोगीच्या सणाचा. त्या भोगीच्या नावाप्रमाणेच त्यांनी जीवनात खूप भोगले. पानशेतच्या पुरामुळे नुकसान झाले. उतारवयात पत्नीचा वियोग झाला. संतती नसल्याने एकटेपणा भेडसावत होता. नातेवाईकांमुळे आज सर्व काही व्यवस्थित आहे.
निवृत्तीनंतर सर चित्रकलेचे क्लासेस घेत होते. एके दिवशी अभिनव कला महाविद्यालयात गेलेले असताना सरांना एक मुलगी रडताना दिसली. ती आसामहून प्रवेश घेण्यासाठी आली होती. सरांनी तिची प्राचार्यांना शिफारस केली व तिला प्रवेश मिळवून दिला. पाच वर्षे ती सरांकडे राहून फाईन आर्ट झाली. आज ती आसाममध्ये सेटल आहे, मात्र सरांच्या वाढदिवसाला येणारा पहिला फोन हा तिचा असतो…
सरांचं विद्यार्थ्यांशी नातं हे गुरु शिष्यापेक्षा मैत्रीचं आहे. टिळक रोडचा कोणताही विद्यार्थी त्यांना विसरणं शक्य नाही. त्यांनी आपल्या हयातीत कोणत्याही विद्यार्थ्याला चित्रकला विषयात नापास केलेलं नाही. कधी कुणाला शिक्षाही केली नाही…
अशा या आदरणीय वारे सरांना शतायुषी होण्यासाठी एकलव्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
– सुरेश नावडकर १४-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे
Leave a Reply