खाकी वर्दी आणि त्यातला माणूस या दोघांपासून आपण सर्वसामान्य जन जरा अंतर ठेवूनच असतो. एखाद्या पोलिसाने जाता जाता आपल्याकडे सहज कटाक्ष टाकला, तरी आपल्या छातीत उगीचच धडधडायला लागतं, मग त्याच्याशी बोलणं किंवा संवाद साधणं दूरच राहिलं. आता समजा, आपला एखादा या क्षेत्रातला मित्र किंवा नात्यातला कुणी पोलीस अधिकारी त्याच्या वर्दिमध्ये आपल्या घरी येऊन गेला की आजूबाजूला चर्चा सुरू होते.
“कळलं का ? यांच्याकडे काल पोलीस आले होते….”
“काय सांगता ?” काय झालं असेल हो ?”
“काही कळलं नाही, माणसं तर चांगली वाटतात, काय झालंय कुणास ठाऊक. आजकाल कुणाचं काही सांगता येत नाही….”
म्हणजे पोलीस हा कुणाचा नातेवाईक, मित्र म्हणून सहज कुणाकडे येऊ शकतो, हा विचारच आपल्या मनात येत नाही.
पोलिस हा जनतेचा मित्र असतो, असं कुठेतरी वाचलेलं आठवतं, पण वाचलेलं आणि प्रत्यक्षात ऐकू येणारं दोन टोकाचं असतं. तसंही आपलं मत ठाम नसतच म्हणा, ते ही बरोबर, हे ही बरोबर अशी आपल्या मनाची स्थिती असते. नंतर एकदा वाचलेलं आठवतं, पोलिस जनतेचा मित्र असावा हे विधान चुकीचं आहे. त्याचा दरारा किंवा आदरयुक्त धाकच जनतेच्या मनात असायला हवा, अन्यथा आपण त्यांनाही खिशात सारायला कमी करणार नाही. पोलिस म्हणजे हडेलहप्पी, पोलीस म्हणजे भीती, पोलीस म्हणजे दहशत, शिवराळ भाषा. म्हणजे पोलीस शब्द आला, की त्यापुढे कवी, संगीतकार, साहित्यिक, कलाकार अशी विशेषणं न येता गुन्हे, खून, दरोडे, तपास, शोध, चौकशी, रिमांड हीच विशेषणं उभी रहातात. अर्थात सामना गुन्हेगारांशी असल्यामुळे त्यांचाही नाईलाज असतो. मग कधीमधी या क्षेत्रात राहूनही कला जपणारा कुणी गायक, कवी लेखक, खेळाडू पुढे येतो. आमच्या एका साहित्य समूहात एक स्त्री कॉन्स्टेबल अत्यंत तरल कवयत्री, लेखिका म्हणून सर्वश्रुत आहे. अशाच, या क्षेत्रातील एका राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेल्या आणि अप्पर पोलीस उपायुक्त(राज्य गुप्तवार्ता विभाग) या पदावरून निवृत्त झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांशी खूप चांगली ओळख झाली, आणि वर उल्लेखलेल्या चुकीच्या कल्पनांना थोडा विराम मिळाला.
“परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ” या श्लोकाला अनुसरून आणि “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलिस दलाच्या ब्रिदाला जागून आपली वागणूक ठेवणारी आणि सर्वसामान्यांना आधार आणि दुष्कृताना धाक वाटावा असं व्यक्तिमत्त्व ल्यालेली आणि हृदयात माणूसपण जागं ठेवणारी ही व्यक्ती म्हणजे “अजित देशमुख.” २००५ साली ते राष्ट्रपती पदकाने सन्मानित झाले तेव्हा पोलीस निरीक्षक ( सिटी क्राईम ब्रांच, पोलीस आयुक्तालय, ठाणे)या पदावर कार्यरत होते.
आपल्या कार्यक्षेत्रात व्यग्र असताना सुद्धा मनाच्या एका कोपऱ्यात कला, काव्य, साहित्याचं भान आणि आवड आवर्जून जपणारे अजितजी. उंचपुरं रुबाबदार व्यक्तिमत्त्व, गुन्ह्यांचे अनेक पावसाळे पाहिलेली तीक्ष्ण नजर, डोक्यावर आज विरळ झालेले केस, कमीतकमी बोलण्यातून आपल्या मनातला आशय मांडण्याची सवय, गुन्हेगाराला कंपित करणारं, आवाजाला जरबेचं कोंदण आणि या सगळ्यापेक्षाही गुन्ह्याची चौकशी करताना, त्याच्या तळाशी जाऊन आणि घडलेल्या गुन्ह्यात गुन्हेगाराचीही भूमिका जाणून घेऊन, प्रामाणिकपणे शोध घेण्याची मानसिकता. गुन्ह्याचा शोध घेताना, आपली भूमिका पूर्णपणे ध्यानात ठेवून गुन्ह्याच्या शेवटापर्यंत जायचं, ही मनोवृत्ती असल्यामुळे त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा नेमकेपणाने लावलेला आहे. आपल्या सोबत तसच आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सहाय्यकांना योग्य मान देऊन आणि त्यांच्यातील अंगभूत विशिष्ठ गुणांना लक्षात ठेवून त्या गुणांचा गुन्ह्याची उकल करण्यासाठी उपयोग करून घेण्याची त्यांची हातोटी होती, आणि त्यामुळे आपल्या कनिष्ठ सहाय्यकांशी त्यांचे संबंध नेहमीच सुदृढ आणि चांगले राहिले.
आज पोलिसी पेशातून निवृत्त झालेले अजित देशमुख, छान कलासक्त आयुष्य जगतायत. आयुष्यभर आपल्या तत्वांना आणि कार्यक्षेत्राप्रती समर्पित वागणुकीला घट्ट चिकटून राहिल्यामुळे, या क्षेत्रातील समकालीन मित्रपरिवारात, त्यांची ओळख एक विश्वासू, निरपेक्ष आणि निस्वार्थी अधिकारी म्हणून आजही आहे.
निवृत्तीनंतर आराम करत न बसता, अजितजीनी आपल्या हृदयात जपलेल्या कलेला खतपाणी घालायचं ठरवलं. अजित देशमुख हे एक नेमकी नजर असलेले निसर्ग छायाचित्रकार आहेत हे मी स्वतः सुद्धा एकेकाळचा छायाचित्रकार असल्यामुळे ठामपणे सांगू शकतो. नेमकी नजर हा शब्द मी यासाठी वापरला, की निसर्ग छायाचित्रकारासाठी ही नजर अत्यंत आवश्यक असते. करणं अगदी क्षणभरात लक्ष्य क्लिक करायचं असतं. संधी दवडली की पुन्हा तपश्चर्या करत बसावं लागतं. मुंबईपासून जवळच असलेल्या त्यांच्या फार्म हाऊस मधल्या रानात, अक्षरशः विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी येत असतात. या फार्म हाऊसमध्ये विविध प्रकारची फुलझाडं सुद्धा आहेत. या सगळ्याला अगदी नेमक्या स्थितीत अजितजी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतात. छायाचित्रण करताना टीपण्याच्या लक्ष्याची योग्य रचना(composition) लेन्समध्ये करावी लागते, सौंदर्यदृष्टी मनात जोपासावी लागते, तरच ते लक्ष्य उत्कटतेने सकारात्मक(positive) रुप घेऊन आधी लेन्सवर आणि नंतर प्रत्यक्षात उमटतं. आणि अजितजिनी टिपलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये हे अगदी प्रकर्षाने जाणवतं. त्यांनी टिपलेली निसर्ग छायाचित्र पहाताच, “Wow !” किंवा “beautiful !” ही प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे मुखातून उमटते.
आपल्या नोकरीदरम्यानच्या कालात गुन्हेगारांच्या मनाचा तळ नजरेच्या कॅमेऱ्याने नेमका शोधणारी ही व्यक्ती त्याच नजरेने निसर्गसौंदर्याला नेमकेपणाने टिपत असते. विविध पक्षी कॅमेऱ्यातून फक्त टिपून ते थांबत नाहीत, तर त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊन, छायाचित्रासोबत ती ही निसर्गप्रेमींसाठी ते देत असतात. निसर्ग छायाचित्रण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात किंवा कोणती काळजी घ्यायला हवी याचा त्यांचा अभ्यास खरच कौतुकास्पद आहे. त्यांनी टिपलेली अनेक छायाचित्र पहाताना शब्दशः भान हरपून जातं. रोज सकाळी फोन उघडताच व्हॉट्सॲपवर त्यांचं एक सुंदर छायाचित्र दिवसाच्या शुभेच्छांसह वाट पहात असतं.
अजितजींचा कलाप्रवास इथे थांबत नाही, तर त्यांनी उकल केलेल्या अनेक गुन्ह्यांचं शब्दांकन, अगदी सहज सुंदर ओघवत्या शब्दांत वाचायला मिळतं, जे वाचताना ती उकल आणि त्या गुन्ह्याचा प्रवास अजितजींच्या शब्दांतून आपण अनुभवत जातो. हे लेखन करतानाही, फक्त स्वतःचं कौतुक सांगत न बसता, त्या केसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आपल्या सहकाऱ्यांचं योगदानही ते तितक्याच मोकळेपणाने मांडतात. या सगळयासोबतच इतरांच्या कलेचा मनापासून आनंद घेणारे एक रसिक म्हणूनही मला ते भावतात. वाचलेलं काही आवडलं की अगदी मनापासून दाद ते देऊन जातात, आणि याचं कारण त्यांनी मनापासून जोपासलेलं रसिक मन. त्यांच्या विचारप्रकृतिशी एखाद्याचे बंध जुळले, की त्या व्यक्तीला अजितजी आपला मानतात, वेळेला अगदी सहजपणे त्याच्या मदतीला येऊन जातात, आणि केलेली मदत तितक्याच सहजपणे विसरूनही जातात.
आजही त्यांना, पोलीस प्रशिक्षण घेणाऱ्या आजच्या भावी तरुण पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्याते म्हणून अधिकृतपणे आमंत्रित केलं जातं. आणि अजितजी या सगळ्यामध्ये अगदी मनापासून भाग घेत, आपली आवड, छंद जोपासत आपल्या कुटुंबासमवेत आनंदाने आयुष्य जगत आहेत, कारण मुळात या खाकी वर्दीतल्या माणसाने एक सुंदर, भावनाशील, कलासक्त मन आणि माणुसकीला आपल्या हृदयात जपलय.
प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
९७६९०८९४१२
Leave a Reply