खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत:
साहित्य :
दोन वाट्या पातळ पोहे, अर्धी वाटी शेंगदाणे, एक मोठा कांदा, १ मोठी हिरवी मिरची, ७-८ पाने कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक मध्यम आकाराची काकडी, हिंग, जिरेपूड, हिंगपूड, १ मध्यम आकाराचा लाल टोमॅटो, एक मध्यम आकाराचे लिंबू, चाट मसाला अर्धा चहाचा चमचा, फोडणीचे साहित्य, चवीनुसार मीठ. डिश सजवण्याकरता डाळिंबाचे दाणे, शेव इत्यादी
कृती:
दोन वाट्या पातळ पोहे चाळून घ्या. कांदा मध्यम आकारात चिरून घ्या, मिरचीचे ३-४ तुकडे करावेत. काकडी किसून घेऊन पिळून घ्यावी. काकडीचे पाणी वापरू नये. टोमॅटो चिरून घ्यावा. लिंबाचा रस काढावा.
फोडणीच्या कढईत दोन चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे तळून ते वेगळे काढा. राहिलेल्या गरम तेलात कढीपत्त्याची पाने टाकावीत. नंतर मोहरी टाकावी. ती तडतडली की त्यात हिंग व जिरेपूड टाकून एक मिनिट परतुन घ्या. नंतर त्यात मिरची टाकून कांदा परतून घ्या. फोडणी थंड करावयास ठेवा. फोडणीत हळद टाकणे ऐच्छिक आहे.
एका वेगळ्या कढईत पातळ पोहे घ्या. त्यात चिरलेला टोमॅटो, चाट मसाला, लिंबाचा रस, काकडीचा पिळलेला कीस व तळलेले शेंगदाणे टाकून हलक्या हाताने सर्व पदार्थ मिसळून त्यात चवीनुसार मीठ घालावे. त्यावर थंड झालेली फोडणी टाकावी. पुन्हा एकदा सर्व मिश्रण हलक्या हाताने हलवून घ्या व कढई ५-७ मिनिटे झाकून (दडपून) ठेवावे.
नंतर एका डिश मध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर डाळिंबाचे दाणे, बारीक शेव इत्यादी आवडीप्रमाणे पेरून डिश सजवू शकता.
ह्या डिशचे वैशिट्य असे की या प्रक्रिये मद्धे कोठेही पाणी वापरले नाही. टोमॅटो, लिंबू व फोडणीच्या ओलाव्यावर पोहे केले आहेत.
टीप :
1. फोडणीचे व पोह्यामध्ये मिसळलेले काकडी, टोमॅटो व लिंबाच्या मिश्रण, या मद्धे जास्ती वेळ घालवू नये.
2. फोडणी गरम असताना पोह्यात मिसळू नये. पोहे आकसून येतात.
3. काकडीच्या किसामुळे या डिशला एक प्रकारचा खमंग पणा येतो व पाणी न वापरल्यामुळे पोहे अखंड राहून गिचका होत नाही.
ह्या पध्दतीने एकदा दडपे पोहे करुन पाहीन . नक्की टेस्टी लागतील.
We will prepare ” दडपे पोहे ” with the
procedure given in details by
Dr. DK Kulkarni. Very curious to
taste this delicious dish!!
मी खोवलेला नारळ, आल्याचा रस लिंबू घालते