नवीन लेखन...

सरहद्दगांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खानअब्दुल गफारखान

जन्म. ३ जून १८९०

सरहद्द गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान ज्यांना बादशाह खान म्हणूनही ओळखले जाते, हे वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते.

गफारखानांनी १९२९ मध्ये ‘खुदा ई खिदमतगार’ नावाची संघटना उभारली होती. भारत सरकारने १९८७ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवले गेले. बादशाह खान उर्फ खान अब्दुल गफार खान हे या प्रदेशातील एका उमराव कुटुंबात जन्माला आलेले. सर्व पठाण-पख्तुन-अफगाण विशेष (बादशाह खान यांचे वास्तव्य असलेल्या प्रदेशातील लोकांना, अफगाण किंवा पठाण असे संबोधले जायचे. परंतु ते स्वत: असे म्हणत, की आम्ही पख्तुन आहोत, तीच आमची खरी ओळख आहे.) अंगात सहज आलेले. जवळजवळ सव्वासहा फूट उंची, पिळदार शरीर, तडफदार चेहरा, तेजस्वी डोळे. तशीच लढाऊ वृत्ती आणि धडाडी. केव्हाही मरायला वा मारायला सज्ज.अशा व्यक्तीला आणि त्या उग्र, धगधगत्या वातावरणात अहिंसेचा विचार सुचावा, हेच आश्चर्य. त्याहून महद् आश्चर्य म्हणजे, तो विचार एक लाखाहून अधिक पठाणांना पटवून देण्यात त्यांना आलेले यश. बादशाह खान यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा या प्रदेशावर इंग्रजी साम्राज्याचा अंमल होता. इंग्रजांचे साम्राज्य बंदूक आणि डावपेच, दहशत आणि कारस्थान यावर उभे राहिलेले. पठाण टोळ्यांना अर्थातच, अशी परकीय राजवट चालणे शक्य नाही. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरपासून इंग्रज राजवट अधिकाधिक क्रूर होऊ लागली होती. तिकडे पठाणी टोळ्या इंग्रजांना आव्हान देत होत्या. भारतातही स्वातंत्र्य भावना पसरू लागली होती. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या मध्यमवयीन वकिलाने दक्षिण आफ्रिकेत गौरवर्णीय, वंशद्वेष्ट्या सत्तेच्या विरोधात आंदोलन पुकारलेले होते; परंतु ते आंदोलन होते, सत्याग्रहाचे. अहिंसेने चाललेले. गोपाळकृष्ण गोखलेंनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन गांधीजींना भारतात पाचारण केले होते. गांधीजी भारतात आले, तेव्हा त्यांना ‘महात्मा’ हे बिरुद लावले गेलेले नव्हते. गांधीजींनी त्यांचे ‘अहिंसेचे’, ‘सत्याचे’, ‘आत्मशुद्धी’चे प्रयोग सुरू केले आणि अवघा देश फिरून त्यांनी लोक कसे जीवन जगतात, देशाची स्थिती कशी आहे, याचा प्रत्यक्ष शोध-वेध घेतला. गांधीजी जेव्हा हा शोध घेत होते, त्याच वेळेस बादशाह खान हे पख्तुनिस्तानमध्ये त्यांच्या स्वतंत्र विचारांनी अहिंसेच्या विचाराकडे वळू लागले होते. बंदुकीने, म्हणजेच हिंसेने प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही, डोळ्याचा बदला शत्रूचा डोळा फोडून घेतला तर क्रमात अवघे जग आंधळे होईल. अहिंसेने संघर्ष केला तर कदाचित लगेच विजय प्राप्त होणार नाही; पण पराभव तर नक्कीच होणार नाही आणि अंतिम विजय नक्कीच होईल, असा विचार त्यांनी मांडायला सुरुवात केली होती. परंतु पख्तुन, पठाण, अफगाण लोकांना बंदुकीचा, शस्त्रांचा, संघर्षाचा त्याग करायला सांगणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि ‘पुरुषार्था’चाच त्याग करायला सांगण्यासारखे होते. बादशाह खान यांनी अहिंसक सेना स्थापन केली. त्या सेनेचे नाव ‘खुदाई खिदमतगार’ म्हणजेच, ‘ईश्वराचे सेवक’. बादशाह खान यांच्या या सेनेत एक लाखाहून अधिक ‘सैनिक’ सामील झाले. बादशाह खान ‘फ्रंटियर’वर म्हणजे, तत्कालीन ब्रिटिश इंडियाच्या सीमेवर राहून पख्तुनिस्तानात हे अहिंसेचे काम करत होते. म्हणून ते पुढे ‘फ्रंटियर गांधी’ किंवा ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते गांधीजींचे अनुयायी नव्हते, तर एकाच विचाराने प्रेरित झालेले सहकारी होते. गांधीजी तर म्हणत असत की, त्या प्रांतात अहिंसेचे व्रत स्वीकारणे व अमलात आणणे, हे भारतात सत्याग्रही होण्यापेक्षा कठीण आहे! गांधीजींच्या आणि बादशाह खान यांच्यात २१ वर्षांचे अंतर होते. गांधीजी मोठे आणि बादशाह खान त्यांना सहकारी मानण्यापेक्षा गुरुस्थानी मानत. आयुष्याचा प्रत्येक क्षण लोकसेवेसाठी खर्च व्हायला हवा, असे व्रत दोघांनी घेतले होते. दोन्ही ‘गांधींचा’ फाळणीला विरोध होता आणि हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन-पारशी हे सर्व एकाच मानवजातीचे आहेत आणि त्यांच्यात भेदाभेद, गैरसमज व शत्रुत्व असणे हे अनैसर्गिक आहे, असे त्यांचे मत होते. ‘इस्लाम’ धर्म हा शांतता, प्रेम आणि बंधुत्वाचा आहे आणि इस्लामच्या नावावर हिंसा करणे, विद्वेष करणे, हे तर महंमद पैगंबराच्या शिकवणुकीचा अवमान करणे आहे, असे त्यांचे मत होते. बादशाह खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’मध्ये एक लाखाहून अधिक अहिंसाव्रती सामील व्हावे, यावरूनच इस्लामचा शांतता व प्रेमाचा संदेश त्या प्रांतातील जहाल इस्लामपंथीयांना पटला होता, हे सिद्ध होते. गांधीजी आणि बादशाह खान दोघांना फाळणी मंजूर नव्हती; कारण धर्माच्या आधारावर देश तोडला जात होता आणि धर्मद्वेषातून हिंसेचा आगडोंब उसळू लागला होता. गांधीजींची १९४८ मध्ये ३० जानेवारीला हत्या झाली, तीसुद्धा त्याच विद्वेषाच्या वातावरणात. बादशाह खान यांचा गुरू, सहकारी, मित्र, सहाध्यायी, मार्गदर्शक गेला आणि गांधीवादी विचारांचा झेंडा बादशाह खान यांच्याकडे आला. पाकिस्तानला बादशहा खान यांचे तत्त्वज्ञान आणि ‘खुदाई खिदमतगार’चे कार्य मंजूर असणे शक्यच नव्हते. त्यांच्या दृष्टिकोनातून तो देशद्रोह-धर्मद्रोह-पाकिस्तानद्रोह होता. साहजिकच पाकिस्तानने त्यांच्यावर निर्बंध घातले आणि ब्रिटिशांनी जितका काळ त्यांना तुरुंगात डांबले नव्हते, तितका काळ पाकिस्तानने डांबले. गांधीजींच्या हत्येनंतर आपली प्रतिक्रिया देताना आइन्स्टाइन म्हणाले होते की, या भूतलावर असा एक माणूस होऊन गेला, असे पुढील पिढ्यांना कोणी सांगितले, तर त्यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही. नेमके तेच विधान फ्रंटियर गांधींना अधिक प्रकर्षाने लागू आहे. सत्याग्रह आणि अहिंसा ही ‘शस्त्रे’ घेऊन बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देण्याचा ‘वेडेपणा’ सुचणा-या गांधीजींच्या आणि फ्रंटियर गांधींच्या चरित्राचा वेध कसा घेणार? पण, त्यांनी असे लाखो वेडे तयार केले.

कॅनडियन-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका टेरी मॅक्लुहान यांनी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशाह खान उर्फ सरहद्द गांधी यांच्या जीवनावरील चित्तथरारक डॉक्युमेंटरी उर्फ चरित्रपट बनविला.

खान अब्दुल गफारखान यांचे निधन २० जानेवारी १९८८ रोजी झाले. आपल्या समूहाकडून खान अब्दुल गफारखान यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..