आज एक फार दिवसापूर्वीची गोष्ट आठवली. एखादे वाक्य जे खोटे आहे पण वारंवार खरं आहे खरं आहे असे सांगत गेले की ती गोष्ट खरच खरी आहे असे वाटते. अगदी तसेच एखाद्या माणसाला पण अनेक लोक मिळून चुकीचे ठरवतात तेव्हाही. तोच खोटा ठरतो. त्याने कितीही जीव तोडून सांगितले तरीही. अशा वेळी तो हतबल होतो. उदास होतो. आणि शेवटी शेवटी तर त्याचा स्वतःवरचा विश्वास उडून जातो. आपला म्हणून सांगायला गेले की उलट त्यालाच म्हणतात की जाऊ दे. दुर्लक्ष कर. विचार नको करु. तुला माहित आहे ना असा स्वभाव आहे वगैरे वगैरे. आणि अगदीच असह्य झाले की देवाला सांगितले की जरा मन मोकळे होते पण जगात जगायचे असते म्हणून गप्प बसून राहणे गरजेचे असते…
एका गावात एका घरात चार भाऊ भाऊ रहात असतात. मोठा भाऊ दादा स्वभावाने शांत सोशीक आणि इतरांच्या सुखासाठी झटणारा. त्यामुळे आईवडिलांच्या पश्चात सगळ्या भावांना बहिणींना शिक्षण दिले. लग्न करून दिली. घर बांधले. आणि कुटुंब मोठे मोठे होत गेले. जबाबदारी पार पाडली. सगळ्यांच्या भविष्याची तरतूद करुन ठेवली. आणि सगळे भाऊ एकदा एका तिर्थ क्षेत्राला जातात. त्या पूर्वीही दादांनी सगळी तयारी केली. प्रवासात देखिल लहान भावांची आबाळ होऊ दिली नाही. त्यामुळे त्याला खूप त्रास झाला होता. आणि परत येताना एक घटना घडली. पूर्वी प्रवास पायी चालत करावा लागे. असेच चालत चालत येत असतांना खूप तहान लागली. जीव कासावीस होऊ लागला. पण पाणी कुठेही मिळेना. एके ठिकाणी विहीर दिसली. सगळे भाऊ निघाले जवळच असलेल्या एका झाडाखाली दादा बसून राहिला. सगळ्याचे पाणी पिऊन झाल्यावर आपण जाऊ असा विचार केला. तिघेही विहिरी जवळ गेले. पाणी वरच म्हणजे फार फार तर दोन तीन हात खोल असेल. पण ते कसे काढणार. पोहरा दोर काही नाही.. खाली उतरायची सोय नाही म्हणून हताश झाले. आणि तहान वाढतच गेली. एकाने युक्ती सांगितली की धोतराचे काठ फाडून त्याची दोरी वळू शकतो पण पोहरा किंवा एखादे भांडे कुठून आणणार. तोच एकाचे लक्ष गेले एका बाजूला जुना बूट पडला होता. तो धावत जाऊन आणला. धोतर फाडून दोरी झाली ती बुटात बांधून आतून पाणी काढता येईल अशी सोय झाली. हे सगळे दादा पहात. होता आता आपले भाऊ बुटातून पाणी पिणार हे लक्षात येताच त्याने अडवले आणि हे योग्य नाही असे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण कुणीही ऐकले नाही. तेंव्हा तो गप्प बसला. मात्र तो पाणी प्याला नाही. आणि चालू लागला. इकडे या तिघांनी बुटांनी पाणी वर खेचून आपली तहान भागवली व तेही चालू लागले. व वाटेत एक मताने काय करायचे ते ठरवले. कारण त्यांना माहीत होते की दादा ही गोष्ट घरी सगळ्यांना सांगणार मग सगळे आपल्याला नांवे ठेवणार….
यात्रा करून आले होते म्हणून गावकरी भेटायला मोठ्या प्रमाणावर आले होते तेव्हा तिघांनी सांगितले की ती बुटांनी पाणी कसे काढले होते आणि दादा ते पाणी प्याले होते. आता तिघांनी मिळून सांगितले होते म्हणून गावातील लोकांना तेच खरे वाटले. आणि दादा कितीही जीव तोडून सांगत होते पण कुणीही विश्वास ठेवला नाही. त्यामुळे घरातील बाहेरचे सगळेच दादांना चुकीचे ठरवले. आणि त्यांच्याशी संवाद बंद केला अगदी जवळची व्यक्ती सुध्दा. त्यामुळे दादा वैतागून गेला कुणाकुणाला किती दिवस पटवून देणार. कंटाळून गेला. एकटा पडला. उदास झाला त्याचा आत्मविश्वास गेला. आणि एके दिवशी तो मंदिरात जाऊन देवाला म्हणाला तू बघतोस ना सगळं. मग मला सांग असे का व्हावे. तू नेहमीच सत्याची बाजू घेतोस असे म्हणतात ना मग माझी बाजू खरी आहे तरीही मीच खोटा आहे का तेव्हा तिथे बसलेले एक साधू महाराज म्हणाले की अरे बाबा हीच तर खरी परीक्षा आहे तुझी. तुझे खरे आहे पण खोटी गोष्ट अनेक जण खर आहे असे बोलू लागले की तेच खरे मानले जाते. पण लक्षात ठेव की कौरव शंभर आणि पांडव पाचच पण विजय त्यांचाच झाला ना. दादांना पटले पण जीवनात प्रत्यक्ष अनुभव वेगळा असतो. विजय मिळेपर्यंत किती तोंड द्यावे लागते हे सांगण्यासाठी तो साधूमहाराजा कडे वळले तर तिथे ते नव्हते….
अशा वेळी काय करायचे. निमुटपणे सहन करायचे की सत्याचा विजय होतो म्हणून वाट पहात रहायची. आणि गंमत म्हणजे कुणीही विचार न करता सरळ शहानिशा न करता खरी बाजू असली तरीही आपल्यालाच शिकवतात. शहाणपण?
–सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply