नवीन लेखन...

खरं जगणं

“फुलं जगण्याचा सोपा मार्ग दाखवत असतात, किती जगावं, यापेक्षा कसं जगावं हे सांगत असतात …”

मुळात आयुष्य म्हणजे जगणं असतं का? आता हा फार जटील, गुंतागुंतीचा प्रश्न असला तरी हे जीवन जटील नाहीच. मग का आपण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच हरवून बसतो? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत… त्यांचं वैभव, त्यांची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो..?
 
तसे पाहिले तर जगण्यासाठी प्रत्येक जीव हा धडपडत असतोच. किंबहुना ही धडपड हेच त्याचे जीवन असते. परंतु या धडपडीतून ‘कलह’ हा फक्त मानवी जीवनातच निर्माण होताना दिसतो. आपल्या रोजच्या जीवनाकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला आढळून येईल की, आपण आपलं आयुष्य सरळ रेषेनं जगायचा कितीही प्रयत्न करत असलो तरी आपले जीवन हे अत्यंत संघर्षमय आहे. मुळात ही शर्यत नाहीच आहे तरी अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात सातत्याने काही ना काही झगडा सुरू असतो. हा संघर्ष केवळ व्यक्तिगत पातळीवर न राहता तो सामूहिक रूपदेखील धारण करतो. त्यातून घडणारा विनाश व होणारी दु:खनिर्मिती वारंवार अनुभवूनसुद्धा मानव अजून शांततेत जगण्यास शिकलेला दिसत नाही.
 
आपलं खरं जीवन कायम दुर्लक्षित राहतं, अडगळीच्या खोलीसारखं. वेळ येईल तेव्हा वापरून घेऊ म्हणून जपून ठेवलेल्या सामानासारखं. कधीतरी सुखी होऊ, आनंदाचं गाणं गाऊ या भ्रमात ‘वर्तमान’ कणाकणानं वाळूसारखा निसटतो… पण अपार, अथांग सुखाचा किनारा डोळ्यांना मात्र कधी दिसतच नाही…
 
‘जगणं’ ही एक सर्वश्रेष्ठ कला आहे, जी अंगीभूतच असते. ती तंत्र (टेक्निक) म्हणून कुणाला शिकवता येत नाही. जगण्याची कला ही कोणत्याही विशिष्ट पद्धतीने मिळवता येत नाही. ही कला स्वाभाविकपणे अवगत होण्यासाठी आवश्यक असते संवेदनशीलता व तरलता. ही संवेदनशीलता व तरलता वृिद्धगत होण्यासाठी जीवनातून संघर्ष, भय, क्रोध, हिंसा, लालसा, मत्सर, असुरक्षिततेची भावना, मानसिक दुखापत, सुखाचा पाठपुरावा व दु:खापासून पलायन यांसारखे घटक दूर होणे गरजेचे असते.
 
“जागृत असणं, सजग असणं हेच खरं जिवंत असल्याचं लक्षण असतं ..”
‘सजग’ असणे म्हणजे आपल्या भोवताली व विशेषत: आपल्या आत काय चालले आहे याचे भान असणे, त्याकडे आवड-निवड रहित होऊन बघणे, त्याचे अवलोकन करणे. अशा प्रकारच्या अवलोकनाने आपले मन जाणीवेच्या कक्षेत येऊन रिक्त होऊ लागते. ही ओसाड जागेची निर्जीव रिक्तता नसते, तर त्यात ‘पूर्णपणे जगलेल्या अनुभवां’तून निर्माण झालेली जीवनऊर्जा असते. ही जीवनऊर्जा प्रेममय असते. प्रेम म्हणजे मानवी अस्तित्वाचा अंगीभूत गुणधर्म. प्रेम फक्त अशा रिक्त मनातच वास्तव्य करू शकते. अशा प्रेमातूनच आपण आपले रोजचे जीवन सजगतेने जगायला शिकतो. शरीर, विचार व भावना यातील परस्परविरोध संपून त्यांच्यात एक प्रकारची सुव्यवस्था, प्रमाणता प्रस्थापित होते. त्यामुळे मानवी जीवनाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. जीवनात एक प्रकारचा मोकळेपणा व उन्मुक्ततेचा आनंद येतो. जीवनाचे सूक्ष्म स्तर उलगडत जाऊन जीवनाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. असे अर्थपूर्ण जीवन जगणे हेच खरं जगणं.
 
हे ‘खरं जगणं’ जगण्याचा गुंता उकलता आला तर किती विलोभनीय आहे जीवन..! कुठल्याही भ्रामक कल्पनांमध्ये न फसलेलं, आनंदी, नितळ, साधंसुधं जीवन सजगतेनं जगता आलं तर सुखाचा स्वर्ग मनातच उभारता येतो आणि हेच मानवी जीवनाचं उत्तर आहे. माणसाचं समृद्ध जगणं आणि आयुष्य सार्थकी लागणं याहून वेगळं काय असतं…?
 
 

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..