नवीन लेखन...

खरं काय अन् खोटं काय?

खरं आणि खोटं हे शब्द सर्वांना परिचित असतात. आपण त्या शब्दांचा वापर करत असतो. न्यायालयात शपथा घेतल्या जातात त्या खरं सांगण्याच्या, त्यापुढे ‘खोटं सांगणार नाही’ असेही म्हटले जाते. शपथपत्रात कथन केलेलं, नमूद केलेलं खरं असलं पहिजे अशी अपेक्षा असते. खरं हे सत्याला धरून, तर असत्य हे खर्‍याशी फारकत घेतलेलं असतं. एका घटनेसाठी कारणीभूत असलेल्या अनेक शक्यतांपैकी एकच शक्यता जर खरी असेल तर बाकीच्या असत्य (किती अंशी का असेना) असतात. सत्य एकच असेल तर असत्य ही अनेक असतात हे ओघानेच आले. आपले विचार व कृती यातून खरं-खोटं प्रतिबिंबित होत असतं. म्हणून आपला मेंदू या खर्‍या-खोट्याचा निर्माता आहे. तो असं काय करतो की ज्यातून कधी खरं बाहेर पडतं तर कधी खोटं? ही फार रंजक पण जटिल प्रक्रिया आहे.

खोटं बोलण्यामागील उद्देश कधी हिताचा असतो, तर कधी तो तितकासा शुध्द नसतो. हेतू कसाही असला तरी खोटं बोलताना मेंदूत काय काय घडते ते जाणून घेण्याचे शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. खोट्याचे दोन भाग असतात – खोटं निर्माण करावं लागतं आणि त्याचवेळी खरं मेंदूत राखावं लागतं. प्रयोगशाळेत परीक्षण करताना या आधारावर चाचण्यांची रचना केली जाते. विल्यम मार्सटन यांनी Lie Detector ची निर्मिती केली, नंतर डॅनियल लँगलबेन यांनी fMRI चा वापर केला. मेंदूमधे भाषेचे केंद्र, दृश्य केंद्र असते. पण खोटयासाठी एखादी विशिष्ठ जागा नसते. Prefrontal Cortex हा कपाळामागील भाग मेंदूचे उच्च केंद्र (High Command) म्हणून काम करतो. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समस्या निवारण, विचार व निर्णय घेणे या प्रक्रिया येथे घडतात. खोटं बोलताना हा भाग जास्त सक्रीय होतो. प्रामाणिकतेपेक्षा अप्रामाणिकपणासाठी मेंदूला अधीक श्रम पडतात. खोटी माहिती देण्यासाठी जास्त वेळ लागतो. हे सर्व सूचक असू शकते. पण खोटेपणाचा निष्कर्ष काढण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकत नाही. कारण स्वयंपाक करणं, बुध्दीबळ खेळणे अशा प्रसंगीसुध्दा मेंदूचा हा भाग कार्यरत असतो. आपला चेहरा व हावभाव, देहबोली बर्‍याच गोष्टी स्पष्ट करत असातात. खोटं बोलणारे शब्द एकवेळ त्यांचा प्रभाव पाडतील पण रक्तदाब, श्वसनाचा वेग, त्वचेची विद्युतवाहकता हे खरं-खोटं बोलताना बदलतात. यावर व्यक्तीचे नियंत्रण नसते, मग ती व्यक्ती किती का निर्ढावलेली असेनात. आपण खोटं बोलतोय याची जाणीव त्या व्यक्तीला असते, कारण हे ठरवून करावे लागते.

एखाद्या व्यक्तीची जनमानसातील प्रतिमा त्या व्यक्तीच्या वर्तनावर ठरते. आपली प्रतिमा बिघडणार नाही, आपल्याला सोयीस्कर अशी समोर येईल, याची काळजी त्या व्यक्तीचा मेंदू घेत असतो. हे त्याचे कामच आहे. यासाठी कधी कधी खोट्याचा आधार घ्यावा लागतो. खोटं बोलत असताना, कुठेतरी साठविलेलं खरं टाळावं लागतं. नाहीतर खरं तेच बाहेर पडायचं. खोटं दुसरीकडे साठवावं लागतं. ढोबळमानानं, खोटं बोलताना वा वागताना हे असं घडतं. समोरची व्यक्ती खरं सांगते आहे की खोटं सांगते आहे हे कसं ओळखायचं? आजीबात सोपं नाही तसं ओळखणं. कुटुंबामधे, समाजामधे बहुतेक वेळा संबंधित व्यक्तीबाबातच्या पूर्वानुभवाचा आधार घेऊन हे ठरविले जाते. पण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की खरं खोटं सिध्द होणं महत्वाचं असतं. मेंदूवर संशोधन करणारे चाचण्या विकसित करीत आहेत. अशा काही चाचण्यांची जुजबी माहिती असणे आवश्यक आहे.

Polygraph – हृदयाचे ठोके, श्वासाचा वेग व रक्तदाब यांचे मोजमाप प्रश्नोत्तराचे वेळी केले जाते. खोटं बोलताना हृदयाचे ठोके जलद पडतात, श्वासाचा वेग वाढतो असे समजले जाते.

Narco-analysis – रक्तात एक द्रव पदार्थ सोडला जातो. अर्धवट शुध्दीत गेलेल्या व्यक्तीमधे खोटं बोलण्यासाठी लागणारा विचार करण्याची क्षमता नसते त्यामुळे तो खरं सांगेल असे मानले जाते.

Brain mapping – प्रश्नाचं उत्तर देत असताना मेंदूतील विद्युत प्रवाह मोजला जातो. विचार करताना निर्माण होणार्‍या विदयुत लहरींची नोंद होते. समजा, एखद्याने उत्तर दिले की मी या नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. त्या नावाच्या व्यक्तीचा फोटो दाखविल्यावर तेच उत्तर देत असताना लहरींमधे जर बदल दिसून आला, तर तो खोटं बोलण्यामुळे असू शकतो. कारण यावेळी चेहरा ओळखणार्‍या मेंदूतील जागाही सक्रीय होतात.

P300 चाचणी – जेव्हा मेंदूला जागा, व्यक्ती वा वस्तू विषयी ओळखीची माहिती मिळते तेव्हा P300 तरंग Electroencephalogram (EEG) मधे दिसतो.

एका गोष्टीची कृपया नोंद घ्यावी. या चाचण्यांच्या विश्वासार्हतेबद्दल तज्ञांचे आक्षेप आहेत. संबंधित व्यक्तीच्या परवानगी शिवाय अशी कोणतीही चाचणी करता येत नाही व तिचे निष्कर्ष ग्राह्य धरले जात नाहीत. प्रत्येक चाचणीत काही त्रुटी आहेत. यासंबंधी नैतिकतेचा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

(आपल्या ऐकण्यात व वाचण्यात पॉलीग्राफ, नार्को असे शब्द येत असतात. त्याची माहिती व्हावी हा या लेखामागचा उद्देश.)

— रविंद्रनाथ गांगल

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..