गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती ।
श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१।
भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी ।
शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२।
प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती ।
विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३।
भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर ।
पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर ।४।
गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे ।
साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते ।५।
सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत ।
मनी इच्छीले कमी न पडावे तिच्या सेवेत ।६।
साडी चोळी बांगड्या आणि पक्वान्नाचे ताट ।
अर्पण केले जगदंबेला म्हणून स्तोत्र पाठ ।७।
पूजा अर्चा संपवूनी डोंगर पायथी आला ।
यथासांग विधीने मनी तोषला ।८।
संपत असता यात्रा घटना एक घडली ।
एक दुर्बल भिकारी, चक्कर येऊनी पडली ।९।
धावून गेला मदत करण्या हा तिजला ।
औषधोपचार करूनी, अन्न देई पोटाला ।१०।
आशीर्वाद घेऊनी गेला, त्या दुर्बल बाईचे ।
समाधान देई आनंद, त्याला या घटनेचे ।११।
यात्रेमधला खरा आनंद तो यातच मिळाला ।
श्री देवीच्या पूजेहूनी क्षण हा श्रेष्ठ तो ठरला ।१२।
केली होती पूजा सेवा जीवंत आईची ।
अंतर्मनाने पोच दिली खऱ्या समाधानाची ।१३।
डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
Leave a Reply