आज संक्रातीचा गोड सण
शुभेच्छांसाठी आला ताईचा फोन
सांगे खुशाली अन मोकळे करे मन
जिवाभावाच्या गोडव्याचा सण
आज संक्रातीचा गोड सण
सांगे ती केलीत घरी, किती पंचपक्वान्न
सुग्रास ताटभरुन आहे इथे अन्न
सोबतीला आहे पुरण नि वरण
आज संक्रातीचा गोड सण
विचारे आता खुशाली भाच्याला पण
सांग म्हणे काय छान जेवलास जेवण
केलेस का नवे कपडे, भरलं का मन
आज संक्रांतीचा गोड सण
भाचा म्हणे,हो मावशी सगळं छान छान
पोटभर जेवलो तरी भरलं नाही मन
तिळगुळाच्या लाडवाने झालाय छान सण
आज संक्रातीचा गोड सण
आई पाही लेकाकडे भरून आलं मन
अर्ध्या भाकरी ने सगळ्यांचं झालंय जेवण
तरी सांगे मावशीला छान झालाय सण
आज संक्रातीचा गोड सण
समजून चालायचं असंच आहे जीवन
तिळा तिळाने वाढवायचं मनाचं मोठेपण
तेव्हाच होईल खरा संक्रातीचा गोड सण!
— वर्षा कदम.
Leave a Reply