नवीन लेखन...

खासदार छत्रपती  उदयनराजे भोसले

खासदार छत्रपती  उदयनराजे भोसले यांचा जन्म दि. २४ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला.

उदयनराजे भोसले यांचे शिक्षण पाचगणी येथे झाले. त्यांनी प्रॉडक्शन मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी घेतली आहे. १९९० पासून राजकारणात सक्रीय असलेल्या उदयनराजे यांनी सर्वप्रथम १९९१ मध्ये उगवता सूर्य या चिन्हावर रयत पॅनेलवर सातारा नपा निवडणूक लढवली होती. तत्कालिन १४ क्रमांकाच्या प्रभातून ते विजयी झाले. १९९६-९७ मध्ये विधानसभेची जागा त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ही निवडणूक त्यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली होती. भाजप-सेना युतीच्या सरकारच्या काळात त्यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले. त्याचवेळी त्यांना महसूल राज्यमंत्रीपदही देण्यात आले. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष असताना त्यांच्या कामाचा झपाटा अवाक करणारा असल्याने कृष्णा खोरे प्रकल्पातील जवळपास ९० टक्के प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेले. त्यापैकी १० टक्के काम बाकी होते. छत्रपती उदयनराजे यांना शेतकऱ्यांविषयी विशेष आस्था असल्याने, तसेच सिंचन हा प्रश्न महत्त्वाचे असल्यानेच छत्रपती उदयनराजे यांनी कृष्णा खोऱ्यातील बहुतांशी प्रकल्प पूर्णत्वास नेले.

याच प्रकल्पातील उरमोडी धरण (साठवण क्षमता जवळपास १० टीएमसी) याचा पाया त्यांच्या काळात रचला गेला. या धरणाचे काम सुमारे १५ वर्षे रेंगाळले होते. आधी धरण, मगच पुनर्वसन ही शासनाची भूमिका होती. पुनर्वसनाबाबत शासन काम पूर्ण झाल्यावर धरणग्रस्तांना कसे वाऱ्यावर सोडते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनीही आधी मरण, मग धरण, अशी भूमिका घेत, जमिनी संपादन करण्याला ठामपणे विरोध केला. छत्रपती उदयनराजे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहात आधी पुनर्वसन मगच धरण, असे शासनाला ठणकावून सांगत, पुनर्वनसाठी त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा निधीचे वाटप केले. 15 वर्षे रेंगाळलेले प्रकल्पाचे काम छत्रपती उदयनराजे यांनी अवघ्या दीड वर्षात मार्गी लावले. त्यांच्याच हस्ते धरणाचा पाया रचला गेला.

नुकतेच सातारा जिल्ह्यातील खटाव, माण या दुष्काळी भागातील जनतेला याच धरणातून पाणी सोडल्याने या भागाची दुष्काळी ही ओळख पुसली जाण्यास मोलाची मदत होणार आहे. असो.

दरम्यानच्या काळात सातारा नपात डिसेंबर 2001च्या सातारच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली 39 पैकी 37 नगरसेवक निवडून आले. डिसेंबर 2001 ते 2006 नगरपालिकेवर त्यांची सत्ता होती. या दरम्यान सातारा विकसित होते गेले. त्यानंतरच्या निवडणुकीत – आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे यांनीही आपले पॅनेल निवडणुकीत उतरवले होते. दोन्ही पॅनेलला समसमान जागा मिळाल्या. अशावेळी अंतर्गत राजकीय संघर्षांना पूर्णविराम देत त्यांनी मनोमिलन करत राज्यात एक नवा आदर्श पायंडा पाडला. 2011 मध्येही त्यांनी मनोमिलनातून निवडणुका लढवल्या.

सातारचा ब्रिटिशकालीन कास तलाव सध्या या ना त्या कारणाने चर्चेत आहे. या तलावातूनच निम्म्या सातारची तहान भागवली जाते. शहरापासून जवळपास 25 किलोमीटर लांब असलेल्या या तलावातून उघड्याने शहराला पाणी पुरवले जात होते. त्यानंतर त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया होत असे. मात्र, या प्रवासात काही जण याच पाण्यात आपली जनावरे धुवत, काही जण कपडे धूत असत. त्यामुळे छत्रपती उदयनराजे यांनी कास ते सातारा असा बंदिस्त पाण्याचा पुरवठा सुरू केला. सातारवासीय याबाबत त्यांचे सदोदित ऋणी राहतील.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात सातव्या क्रमाकांचे सुमारे तीन लाख इतके मताधिक्य घेत ते खासदार झाले होते. तसेच २०१९ लोकसभा निवडणुकीत भरघोस मताने ते निवडून आले होते.

सातारा जिल्ह्यात तब्बल 11 धरणे आहेत. महाराष्ट्राला वीजपुरवठा करणारे कोयनाही याच जिल्ह्यातील. या धरणांसाठी सर्वाधिक त्याग केलेले शेतकरी जिल्ह्यात असताना, आमच्यावर भारनियमन का, असा सवाल उपस्थित करीत छत्रपती उदयनराजे यांनी भारनियमनमुक्त सातारा व्हायलाच हवे, असे आंदोलन उभारले. त्यासाठी पक्षीय राजकारणाचा विचार केला नाही. त्यांच्या आंदोलनाला आता फळ मिळत आहे. गेल्या चार महिन्यांपासून तांत्रिक बिघाड झाला, तरच अपवादात्मक परिस्थितीत वीजपुरवठा काही काळ खंडित होतो. मंगळवार हा महावितरणाचा तांत्रिक दुरुस्तीचा दिवस असल्याने त्या एक दिवशी सातारकरांना काही काळ वीजपुरवठा केला जात नाही.

ज्या पद्धतीने छत्रपती उदयनराजे यांनी आंदोलन लावून धरले, त्यापुढे महावितरणला झुकावेच लागले. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन त्यांनी केलेल्या या आंदोलनाला यश न मिळते, तरच नवल होते.

शेतकऱ्यांविषयी त्यांना आस्था असल्यानेच त्यांनी (IRMA), इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रीकल्चरल ही खास शेतकऱ्यांसाठीची योजना कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या सहकार्याने राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यासाठी ते प्रयत्नात आहेत. दुर्दैवाने कोणत्या आपत्तीमुळे पीक नाही आले नाही, तर सरकारने संबंधित शेतकऱ्याला भरपाई द्यावी, अशी ही योजना आहे. शेतकऱ्याला त्याच्या गुंतवणुकीची हमी मिळाली, तर तो अन्य उद्योगांकडे वळणार नाही, हा या योजनेमागचा हेतू आहे.

कृषीप्रधान देशात आज हमीभाव नसल्याने शेतकरी शेती करण्यासही घाबरत आहे. बेभरवशाचा पाऊस, हमीभाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. या पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे यांनी लावून धरलेली ही योजना, शेतकऱ्यांना आधार ठरेल.

त्यांच्या एका हाकेला हजारो सर्वसामान्य धावून येतात. कारण त्यांनी तितकी माणसे जोडलेली आहे. आपले राजेपण विसरून सगळ्यांशी ते मिळून-मिसळून वागतात. सहज बोलता-बोलता खांद्यावर ते केव्हा हात टाकून सोबत चालायला लागतील, हे कोणाच्याही लक्षात येत नाही.

बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर, या बाण्याने ते चालतात. बोलणे रोख आणि ठोक. जे ओठांवर आहे, तेच पोटात आहे, असा स्वभाव असल्याने हुजरेगिरीला इथे स्थान नाही.

त्यांच्या दातृत्वाबाबत सातारकर भरभरून बोलतात. दारी आलेला गरजू कधीच विन्मुख होऊन परत जात नाही. त्याच्या गरजेपेक्षा जास्तच त्याच्या पदरात छत्रपती उदयनराजे देतात. त्यांची वृत्ती देण्याची आहे, घेण्याची नाही. ‘दिलेर मनाचा राजा,’ असे सातारकर मोठ्या अभिमानाने छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल भरभरून बोलतात.

छत्रपती उदयनराजे भोसले हे कुलाचार पाळणारे, थोरामोठ्यांविषयी आदर बाळगून असणारे, घराण्याची परंपरा निष्ठेने जतन करणारे कुटुंबवत्सल, अशी त्यांची थोडक्यात ओळख करून देता येईल. त्यांची धाकटी बहिण श्रीमंत मनिषाराजे (आता पाटील) या नाशिक येथे असतात.

राजकारणात सध्या श्रेयवाद उफाळून आला आहे, त्यात पडायला त्यांना आवडत नाही. सुर्योदय होणे महत्त्वाचे आहे, मग सूर्य कोणाच्याही कोंबड्याने उगवू दे, त्याचे उगवणे महत्त्वाचे, ही त्यांची भूमिका आहे. प्रचार करतेवेळी, ‘मला मते देऊ नका, मला वैचारिक मत हवे. विचारांशी सहमत असाल, तरच मत द्या,’ असे त्यांचे मतदारांना आवाहन असते. सध्या पैशांच्या जोरावर निवडणुका लढवल्या जात असताना वैचारिक मते मागणारे छत्रपती उदयनराजे म्हणूनच बाकीच्या राजकारण्यांपेक्षा वेगळे भासतात. मनाला भावून जातात.

राजकारणातील दिग्गज शरद पवार यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शरद पवार हे इतरांशी पत्रव्यवहार करताना – ‘डिअर,’ अशी सुरुवात करतात. केवळ छत्रपती उदयनराजे यांच्याशी किंवा ज्यांच्याप्रती त्यांना मनोमन आत्मियता आहे, अशानाच ते ‘माय डिअर’ असे संबोधतात. ही गोष्ट फार कमी जणांना माहिती असेल.
सध्या टोलनाका बंदीचा प्रश्न राज्यात सर्वत्र गाजत आहे. मात्र, खंबाटकी घाटाचा टोलनाका, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका रात्रीत बंद केला, हे किती जणांना माहिती आहे? कंत्राटदाराने केलेला खर्च, शासनाला मिळालेले उत्पन्न, कंत्राटदाराने केलेली वसुली याची लेखापिढीच सादर करून, त्यांनी एका रात्रीत हा टोल बंद केला.

प्रतापगडावर श्री भवानीदेवी वारसाहक्काने चालत आलेले खासगी देवस्थान आहे. त्यांनी या मंदिराला पुर्नवैभव मिळवून दिले. श्री देवी मातेचे कुलाचार निर्विघ्नपणे पार पाडले जातात. त्यांनी श्री भवानीमातेला काही अलंकार नव्याने केलेले आहेत. परंपरेनुसार वारसाहक्काने मिळालेले वैभव सांभाळलेले आहेच, त्यात नव्याने भरही टाकली आहे.
त्यांच्या नावामागे श्रीमंत छत्रपती, असा उल्लेख करणे काहींना रुचत नसेल, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे ते थेट तेरावे वारस आहेत. मिरज, जत आदी ठिकाणचे संस्थानिकही आपल्यामागे ‘राजे’ उपाधी लावतात. रामराजे नाईक निंबाळकर, हे नावही यातीलच एक. यांच्या ‘राजे’ उपाधीबाबत बाकीच्यांना आकस नाही, मात्र साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाने स्वतःमागे छत्रपती ही पदवी लावू नये, हा दुराग्रह कशासाठी.

प्रतापगडावर महाराष्ट्र सरकार काही उत्सव साजरे करते. त्यावेळी शासनाकडून छत्रपती उदयनराजे यांना पूजाअर्चा करण्याबाबत परवानगी मागणारे लेखी पत्र जाते. मंदिराचे पावित्र्य राखून तो उत्सव साजरा करण्याची परवानगी, दिली जाते.

‘मी तुम्हाला फसवेन, मात्र स्वतःच्या मनाला फसवू शकणार नाही, त्यामुळे रोखठोक बोलतो,’ असे छत्रपती उदयनराजे सांगतात. साताऱ्यात आजही बुजुर्ग मंडळी आपले वय, हुद्दा, सामाजिक प्रतिष्ठा याचा विचार न करता, राजवाड्यासमोरून जाताना गादीला मानाचा मुजरा करतात. गादीचा अवमान, हा छत्रपती शिवरायांचा उपमर्द मानला जातो.

सातबाऱ्यांवरून आंदोलन झाल्याने छत्रपती उदयनराजे यांनी ते उतारे तपासले. त्यातील काहींवर सोसायट्यांची कर्जे घेतल्याची नोंद आहे. काही जणांनी जमिनींची विल्हेवाटही लावली आहे. कर्ज घ्यायचे असेल, तर त्यासाठी छत्रपती उदयनराजे यांचे ना हरकत प्रमाणपत्र लागते. ते देतातही. हा वारसा छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळापासून चालत आलेला आहे. त्यात सातारच्या गादीबरोबरच प्रतापगड, त्यावरील श्रीभवानीमातेचे मंदिर आहे. मंदिराच्या नावे काही जमीन आहे. ती सांभाळायला हवी. पुढच्या पिढीकडे आहे तशीच सुपुर्त करायला हवी, ही भावना बाळगली, तर त्यात काय चुकले, असा त्यांचा प्रश्न आहे. आंदोलक आणि एका खासगी बिल्डरने वसईत एक गृहनिर्माण प्रकल्प उभा केला आहे. त्यांना तसाच प्रकल्प किल्ले प्रतापगडाच्या परिसरात उभा करायचा आहे. त्यासाठी जमिनी विकत घ्यायला ते गेले असता, त्यांना कळले, की छत्रपती उदयनराजे यांच्या प्रमाणपत्राशिवाय या जमिनी मिळणार नाहीत. म्हणूनच ठाणे जिल्ह्यातला आमदार सातारा जिल्ह्यात येऊन धडकतो. एका विकाऊ साप्ताहिकाला पेट्या पोचत्या करून छत्रपती उदयनराजे यांच्याविरोधात भलते-सलते आरोप आरोप करतो, गादीबद्दल अवमानकारक व्यक्तव्ये करतो. हे ठरवून केलेले कारस्थान होते. मात्र, छत्रपती उदयनराजे यांनी मोर्च्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत, तुम्ही माझ्याकडे का आला नाहीत, असे विचारून पंडिती कावा उधळून लावला.

–संजीव ओक

संकलन  – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..