१९९४ साली.. वयाच्या अठराव्या वर्षी.. ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिला विचारलं गेलं, ‘तुम्हाला एखादी ऐतिहासिक घटना बदलण्याची जर संधी दिली, तर तुम्ही काय कराल?’ ऐश्र्वर्या रायने उत्तर दिलं.. मी माझी जन्मतारीख बदलेन.. दुसऱ्या मुलीनं उत्तर दिलं.. ‘इंदिरा गांधींचा मृत्यू!’ या उत्तराने तिच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुगुट चढवला गेला.. तिचं नाव, सुश्मिता सेन!!
या स्पर्धेत ऐश्वर्या राय आहे, हे कळल्यावर २६ मुलींनी त्या स्पर्धेतून माघार घेतलेली होती.. सुश्मिताही तोच विचार करीत होती, मात्र तिच्या आईने वेळीच तिला माघार घेण्यापासून रोखलं..
१९ नोव्हेंबर १९७५ रोजी हैदराबाद येथे सुश्मिताचा जन्म झाला. तिचे वडील, हवाई दलात विंग कमांडर होते व आई, ज्वेलरी डिझायनर. तिने १८ व्या वर्षीच मिस इंडिया व मिस युनिव्हर्स या दोन्ही स्पर्धा जिंकल्या!
तिचे शिक्षण झाल्यावर तिने १९९६ साली ‘दस्तक’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दिग्दर्शक होते महेश भट्ट. सुश्मिताला अभिनयाचा, काहीच अनुभव नव्हता.. महेश यांनी तिला घडवलं.. नंतर तिने सनी देओल बरोबरचा ‘जोर’ हा अॅक्शन चित्रपट केला. ‘हिन्दुस्तान की कसम’ अजय देवगण सोबत केल्यानंतर ‘बीवी नं. १’ चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळाली.
१९९९ साली एका तामिळ चित्रपटाचा रिमेक, ‘सिर्फ तुम’ प्रदर्शित झाला. त्यातील संजय कपूर सोबतचं तिचं ‘दिलबर.. दिलबर..’ हे गाणं अतिशय गाजलं. अनिल कपूरच्या ‘नायक’ चित्रपटात तिला ‘शका लका बेबी’ची भूमिका मिळाली होती, तिचं तिनं सोनं केलं..
मल्टिस्टार ‘आॅंखे’, ‘तुमको न भूल पायेंगे’ असे चित्रपट केल्यानंतर तिला शाहरुख खानचा ‘मैं हूॅं ना’ मिळाला.. त्यातील प्रोफेसर सुश्मिता, शाहरुख बरोबर प्रेक्षकांनाही खूप काही शिकवून गेली. डेव्हीड धवनच्या ‘मैंने प्यार क्यूं किया’ या चित्रपटातील तिच्या, अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले.. नंतरच्या ‘चिंगारी व ‘जिंदगी राॅक्स’ चित्रपटांनी तिने आपल्या कारकिर्दीची, सांगता केली..
दहा वर्षांतील अवघ्या वीस बावीस चित्रपटांनंतर, वेळीच निवृत्ती घेणारी ही एकमेव अभिनेत्री आहे.
ऐश्र्वर्या व सुश्मिता यांच्यात बरचसं साम्यही आहे आणि विरोधाभासही.. दोघींच्याही गालावर खळी पडते. ऐश्वर्या दोन वर्षांनी मोठी, मात्र नोव्हेंबर महिन्यातीलच आहे.. तिचे वडील मरीन इंजिनीयर तर आई, लेखिका. इयत्ता नववीत असल्यापासून ती माॅडेलिंग करु लागली. तिचा पहिला चित्रपट हा तामिळ होता. २००७ साली तिनं अनेक सहकलाकारांना ‘देवदास’ करुन अभिषेक बच्चनशी लग्न केलं.. ‘हम दिल दे चुके सनम’ हा तिचा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. एकोणीस वर्षांच्या कालावधीत तिने पस्तीस चित्रपट केले. ‘देवदास’, ‘रेनकोट’, ‘जोधा अकबर’, ‘गुरु’ असे काही तिचे चित्रपट अविस्मरणीय आहेत.
सुश्मितानं वयाच्या चोविसाव्या वर्षी, एका मुलीला दत्तक घेतलं. तिचं नाव रेनी. तिचं पालकत्व पार पाडताना तिला अजून एका मुलीला दत्तक घेण्याची इच्छा झाली. तिनं आलिसाचं पालकत्व स्वीकारलं. आज ती आपल्या दोन्ही मुलींसोबत दुबईमध्ये आनंदात रहात आहे..
ऐश्वर्या, आपल्या आराध्या या कन्येसोबत बच्चन परिवारात, अभिषेकसह रमलेली आहे. बच्चन साहेबांनी आपल्या सुपुत्राला लहान असताना सांगितलेलं होतं, ‘बेटा शाळेचा, काॅलेजचा अभ्यास जर मन लावून केलास, तर तू जीवनात ‘ऐश’ करशील..’ त्याने तसा केला म्हणूनच आज, ‘ऐश’ त्याची आहे..
सर्वसाधारणपणे सिनेरसिकांना, या दोघींमध्ये सुश्मिता आवडते. कारण ती आपल्यातील वाटते. उलट ऐश्वर्या ही सुंदर असली तरी एखाद्या कचकडी बाहुलीसारखी वाटते. तिचं सौंदर्य हे संगमरवरी पुतळ्यासमान वाटतं.. सुश्मिता ही हाडामासाची रेखीव शिल्प वाटते.. शेवटी काय, दोघीही गोडच आहेत.. एक पुन्हा पुन्हा घ्यावी अशी खीर, तर दुसरी तब्येतीला जपून मागावी, अशी बासुंदी!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-७-२२.
Leave a Reply