खेळ केवढा चाललेला,
या दुनियेच्या पटावरती,
पर्याय नसे सोंगट्यांना,
कळसूत्री बाहुल्या हलती,–!!!
जेजे घडे, मागे त्या,
कर्ता करविता असतो कोणी, दिसत नाही आपल्या डोळ्यांना, जाणिवे नेणिवेच्या पल्याडही,–!
कोण घडवी सगळ्या घटना,
मदत करी अडल्या प्रसंगी,
असंख्य रूपे तुझी देवा,
दिसती आम्हा समयी समयी,–!!!
करुणा शांती क्षमा, प्रेम, दया,
भावनांचे किती प्रकार असती, सिद्ध करत आपुला देवपणा,
देवमाणसे तत्परता दाखवती,-!
माया, ममता,आपुलकी,जिव्हाळा,
सद्भावना ना मरते कधी,
वाहे झरा माणुसकीचा,
तूच नांदतशी त्यांच्या हृदयी,–!!!
कठोर, क्रूर, निर्घृण, भयंकरा,
मात देण्या प्रवृत्त करशी,
भयानक, भीषण, भयावह प्रसंगा, चीत करण्या मार्ग दाखवशी,–!!
छळती मानवा यातना वेदना,
संहार त्यांचा करावया पाही,
अशा संकटांचा सामना करण्या,
हे ईश्वरा तूच बळ देई,–!!!
नको कुठली सुखे अनंता,
पाखर सतत तुमची रहावी,
दुसरे काही मागणे ना, नाअपेक्षा दुसरी काही,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply