सदाशिव पेठेत असताना माझ्या लहानपणी, आई संकष्टी चतुर्थीला उपवास करायची. त्या दिवशी तिने केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीमधील थोडी मलाही मिळायची. तेव्हापासून मला खिचडी जाम आवडू लागली..
श्रावण महिन्यात तिचे श्रावणी सोमवार असायचे. सोमवारची खिचडी ही गोड असायची, त्यात मिरचीचा वापर नसायचा. नवरात्र, महाशिवरात्र, आषाढी एकादशीच्या निमित्ताने मला आवडणारी खिचडी मिळत राहिली..
दहावीपासून मी संकष्टी चतुर्थी करु लागलो. जेव्हा माणसाला समोर अडचणी दिसतात, तेव्हा देवाची हमखास आठवण होते. दहावी उत्तमरित्या पास होण्यासाठी मी तळ्यातल्या गणपतीला जाऊ लागलो. त्या बुद्धीदेवतेला प्रदक्षिणा घालून आराधना करु लागलो..
दहावी, बारावी नंतर कॉलेज झालं.. चतुर्थी करीतच होतो. व्यवसायात पडल्यानंतर कधी एखाद्या चित्रपटाच्या प्रिमियर शोच्या दिवशीच चतुर्थी आली तर, ती मोडली जात असे. पुन्हा अंगारकीला मी चतुर्थी धरत असे.
चतुर्थीचा परिणाम नाटकाच्या वेळेवर सुद्धा होत असे. चंद्रोदय रात्री उशीरा असेल तर, चतुर्थी सोडून यायला प्रेक्षकांना होणारा उशीर लक्षात घेऊन नाट्यप्रयोग दहा किंवा सव्वा दहाला सुरु होत असे.
सुरुवातीला घरी तयार होणारी खिचडी कामासाठी ऑफिसवर लवकर जावे लागल्यास, हॉटेलमध्ये जाऊन खावी लागे. आमच्या ऑफिसच्या शेजारील ‘चंद्रविलास हॉटेल’मध्ये खिचडीवर तळलेला बटाट्याचा किस घालून मिळत असे. कधी ‘स्वामी समर्थ’मधून मी खिचडीचं पार्सल आणत असे. त्याच्याकडील खिचडी संपलेली असल्यास पानसरे चेंबर्समधील निकमबाईंच्या खाणावळीत हमखास ती मिळत असे. ती तयार नसेल तर स्वतः निकमबाई दहा मिनिटात खिचडी तयार करुन देत असत.
पुण्यातलं खिचडी मिळण्याचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे स्वीट होम! फडतरे चौकातील स्वीट होम खिचडीसाठी पूर्वीपासून नावाजलेलं आहे. गरमागरम फुललेली साबुदाण्याची खिचडी व लिंबाची फोड! ज्यांनी ही खिचडी खाल्लेली आहे, त्यांना नक्कीच तिची चव आठवत असेल.. अजूनही ती परंपरा स्वीट होमने चालू ठेवलेली आहे.
अलीकडे गेल्या दहा वर्षांत बाहेरुन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी गल्लीबोळात, चौकाचौकात पोहे, शिरा, उपमा बरोबर खिचडीसुद्धा मिळू लागली आहे. एक टेबल उभे करुन, त्यावर चार डब्यातून हे चार पदार्थ पंधरा वीस रुपयांत देणारे असंख्य स्टॉल जागोजागी दिसतात. सकाळी सहापासून नऊ वाजेपर्यंत व्यवसाय करुन, ते दुकानं व रहदारी सुरु होण्यापूर्वी निघून जातात.
पूर्वी डेक्कनला ‘आप्पाची खिचडी’ मिळायची. नंतर ती ओंकारेश्वर मंदिराजवळ मिळू लागली. काही वर्षांनंतर ते आप्पांचं हॉटेल बंद झालं.. मी स्वतः ती अप्रतिम खिचडी खाल्लेली आहे.
खिचडीला पर्याय म्हणून साबुदाणावड्यासाठी काही स्टाॅल व हाॅटेलं प्रसिद्ध आहेत. सदाशिव पेठेत साठे गादी कारखान्यासमोर वडाच्या झाडाखाली उत्कृष्ठ साबुदाणा वडे मिळतात. गरम वड्यासोबत काकडीची कोशिंबीर व हिरवी चटणी असते. दोनच वडे खाऊन पोट भरतं. केसरीवाड्यासमोरील प्रभा विश्रांती गृहमध्ये देखील खास पुणेरी चवीचा, साबुदाणा वडा मिळतो.
एखाद्या चतुर्थीला खिचडी नाहीच मिळाली तर मी उडपी हॉटेलमध्ये जाऊन उपवासाच्या कचोरीची ऑर्डर देतो.ऑर्डर दिल्यानंतर गरमागरम दोन गोलाकार कचोरी व दह्याची वाटी, वेटर समोर आणून ठेवतो. ती खाताना डेक्कनवरील ‘पूरब’ व अलका टॉकीज चौकातील ‘प्रिती’ हॉटेलची आठवण होते.. तेथील कचोरीच्या सारणामध्ये काजू बेदाणे असायचे.. आता तशी व्कॉलिटी राहिलेली नाही..
आमचे रमेश देशपांडे नावाचे मित्र होते. ते रहायचे येरवड्याला. मात्र खास आम्हाला भेटायला आवर्जून आॅफिसवर यायचे. आले की, त्यांच्यासोबत साबुदाण्याची खिचडी व कडक मिठा चहा होत असे. फार गप्पिष्ट माणूस. ते गेल्यानंतर खिचडी खाताना त्यांची आठवण येतेच..
उपवासासाठी खिचडी शिवाय अनेक फळं, पदार्थ उपलब्ध असतात. काहीजण केळी, रताळी, सफरचंद, इ. खातात. काहींना केळीचे, बटाट्याचे वेफर्स आवडतात. काहीजण वरईचा भात व शेंगदाण्याची आमटी आवडीने खातात. अलीकडे उपवासाची भेळही मिळते. काहींना उपवासाच्या भाजणीची थालपीठं आधार देतात. राजगिरा लाडू, राजगिरा वडी किंवा गुडदाणी खाऊन उपवास करणारे अनेकजण आहेत…
कोणी काहीही खाऊं देत.. मला मात्र साबुदाण्याची खिचडीच आवडते आणि मी प्रत्येक चतुर्थीला ती खाणारच!! आजही अंगारकी चतुर्थी आहे, मी खिचडी खाऊनच हे लिहायला बसलेलो आहे… आता आवरतं घेतो.. आज पुण्याचा चंद्रोदय रात्री दहा वाजता आहे…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२७-७-२१.
Leave a Reply