कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागांना माझ्या भेटी होत. मराठवाडा हा भाग तर माझ्या विशेष जिव्हाळ्याचा. औंरगाबादेजवळ आमचं मूळ गाव, हे त्यामागचं कारण असावं. असाच एकदा औरंगाबादमार्गे पैठणला गेलो. माझ्या मातुल घराण्याच्या, आजोळच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगणारं हे गाव. पुरातन आणि प्रख्यातही. नाथसागरानं अलीकडे पैठणला पर्यटनाचं महत्त्व आलं खरं; पण प्रतिष्ठान या नावानं या गावातून जगाच्या कानाकोपर्यात व्यापार-उदीम चालायचा. संतांची भूमी म्हणून या भूमीचं वेगळेपण. इथंच जातिभेदाला पहिला प्रतिप्रश्न विचारला गेला, मानवताधर्म उजळ झाला, ती ही भूमी. अर्थात, आता जी आठवण सांगणार आहे, त्याचा याच्याशी फारसा संबंध नसेलही; पण वेगळी माणसं जोपासणारी ही भूमी. पैठणला गेलो. तिथली पालथी नगरी पाहिली. जी अवस्था होती अत्यंत विदारक. पैठण हे पुरातन गाव कधीकाळी महापुरात सापडलं आणि गावाची उलथापालथ झाली. सध्याच्या गावाजवळच अशा पुरातन गावाच्या खुणा सापडतात. हे सारे पालथ्या अवस्थेत आहेत म्हणून पालथी नगरी एवढंच. तर इथून गावाकडे जाताना माझ्या सहकार्यानं, खरं तर मित्रानं सांगितलं, इथं आपण बाळासाहेब पाटलांकडे जाऊ. अत्यंत छांदिष्ट व्यक्तिमत्त्व आहे. नाव पाटील असलं तरी ब्राह्मण. घरात परंपरेनं पाटिलकी, म्हणून पाटील. या पाटलांनी अनेक पुरातन वस्तूंचा संग्रह केलाय. खूप कष्ट घेतलेत हे सारं जमविताना. आता पाटील हयात नाहीत; पण त्यांचा संग्रह त्यांचं स्मारक म्हणून उभा आहे. आयुष्यात बराच काळ हेटाळणी वाट्याला आलेला हा पाटील आता स्मारकाच्या माध्यमातून चिरंतन झालाय. आम्ही त्यांच्या घरी गेलो. पैठणच्या प्रसिद्ध दरवाज्यापासून पालथ्या नगरीतल्या खापरापर्यंत अन् नाण्यापासून आभूषणापर्यंतचा असा त्यांचा संग्रह पाहून भारावून गेलो. त्या वेळी या संग्रहाला सरकाी मदत नव्हती की लोकाश्रय; पण तो केवळ एका पाटलाच्या इच्छाशक्तीवर उभा राहिला होता. पुण्यात केळकरांना जे लाभलं ते त्यांच्या वाट्याला आलेलं नव्हतं. काहीही असलं तरी माणूस समाधानी होता. स्वागतशील होता. आपल्या संग्रहाबद्दल किती सांगू आणि किती नको, असं त्यांना झालं होतं. पत्रकार काय देऊ शकतो? प्रसिद्धी. मी माझ्या सहकार्याला म्हटलं, ‘छान लेख तयार करा. उभ्या महाराष्ट्राला कळू द्या, पैठणमध्ये काय घडतंय!’ यानंतरही मी पाटलांच्या संग्रहाबद्दल त्यांच्याशी बोलत होतो. कष्ठ, निष्ठा, पैसा आणि परंपरेबद्दलचा आदर याविषयी या माझ्यापेक्षा वयाने वडील असलेल्या माणसाचं कौतुक करीत होतो. एवढ्यात पाटील म्हणाले, की मला छंद आहे, मी हे सारं जमवलं, ते टिकावं हीच इच्छा आहे; पण मी काही फार मोठा छांदिष्ट नव्हे. मी असा एक माणूस पाहिलाय की त्याच्यापुढे नतमस्तक व्हावं. त्याचं नाव आठवत नाही; पण तो पैठणचा नव्हे. त्याला छंद होता तो खोटी नाणी जमा करण्याचा. फाटक्या किवा खराब नोटा किवा झिजवट नाणी तो जमा करीत नव्हता; पण अस्सल वाटणारी खोटी नाणी तो आवर्जून घ्यायचा. सहज व्यवहारात असं नाणं आलं तर आपण वैतागतो; पण तो आनंदून जायचा. त्याच्यालेखी खोटी नाणी हीच त्याची संपत्ती होती. पुढे खोटी नाणी त्याच्याकडे आपसूक येत. लोक आणून देत. ज्या नाण्यांना किमत नाही, त्यांची किमत हा माणूस द्यायचा. मला त्याच्याविषयी मोठं कुतूहल होतं. एकदा त्याला विचारलं, ‘हा आगळा-वेगळा छंद का लागला? कसा जोपासला?’ तो म्हणाला, ‘व्यवहारामध्ये खोटी नाणी येणं ही स्वाभाविक बाब आहे; पण एखादं खोटं नाणं आहे, हे लक्षात आल्यावरची प्रतिक्रिया मात्र मला कधी स्वाभाविक वाटली नाही. कारण खोटं नाणं हातात आल्यानंतर ते पटकन् कुठेतरी खपविण्याचा प्रयत्न व्हायचा. एखादा रुपया अशा प्रकारानं दिवसभरात शंभर रुपयांचं काम करायचा. चलनाचा हा असाही वेग. मला वाटलं, समाजात चांगली माणसं आहेत तशीच वाईटही. खरी आहेत तशीच खोटीही. काही वेळा खोटी माणसं कळतात, बर्याच वेळी नाहीही; पण जेव्हा ती कळतात त्या वेळी त्यांना समाजापासून अलग नाही करता येत. नाण्यांचं तसं नव्हतं. एक खोटं नाणं जेव्हा मी माझ्या संग्रहात टाकतो त्या वेळी शंभर लोकांची होणारी फसगत टळते. इतरांना फसविण्याचा त्यांचा अपराधही टळतो. मग माझं हे व्रतच होऊन गेलं. आज मी प्रचंड श्रीमंत आहे. माझ्याकडे प्रचंड खोटी नाणी आहेत!’ पाटलांनी सांगितलेली ही गोष्ट कदाचित वास्तव असेल, कदाचित काल्पनिकही; पण खोटं ते चलनातून बाद करणारं कोणीतरी हवं, ही गरज अधोरेखित करणारी होती. आता परिस्थिती बदललीय. खोटी नाणी फारशी येत नाहीत. आता खोट्या नोटा येतात आणि बेमालूमपणे चलनात आपला प्रभाव गाजवितात. खोटी माणसं तर बर्याच वेळा खूप मोठी झालेली पाहता येतात. परिस्थिती अशी आहे, की खोट्या नोटा घेणारा कुबेर आज अस्तित्वात नाही. आपल्याला आपल्या व्यवहारात, आपल्या जीवनात खोट्या नोटा अन् खोट्या माणसांचा वेगवान प्रवास थांबविता नाही का येणार? प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply