नवीन वर्ष, पहिला दिवस!
नवीन वर्ष म्हटलं की, मला अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं वाटतं. ३६५ रांजण भरलेले आहेत. कशात काय आहे, हे माहीत नाही. एकेक दिवसाचा रांजण उघडून पहायचा आणि आनंद उपभोगायचा. कधी अचानक सरदार येईल म्हणून संकटाची खबरदारीही घ्यायची…
न कळत्या वयाची पाच, कळत्या वयाची वीस व अनुभवाची पस्तीस वर्षे जमेस धरुन साठी पूर्ण केलेला मी २०२१ ला सामोरा जात आहे.
काॅम्प्युटर प्रमाणेच प्रत्येक माणसामध्ये एक हार्ड डिस्क असते. जन्मतः पूर्ण कोरी असणारी ही डिस्क जसजशी त्याला समज येऊ लागते, तसतशी ती भरत जाते. पहिल्यांदा घरातील माणसं, नातेवाईक एवढाच डाटा त्यावर असतो. शाळेत जाऊ लागल्यावर मित्र, शिक्षक, अभ्यास, खेळ याने डाटा वाढत जातो.
काॅलेज जीवनात अभ्यास व मैत्रीचे दोन पार्टीशन तयार होतात. त्याचा तोल सांभाळता आला तरच शिक्षण पूर्ण होते. मैत्रीला अघिक महत्त्व दिल्यास सेमिस्टरच्या वाऱ्या सुरु होतात.
काॅलेजनंतर व्यवसाय की, नोकरी? त्यानुसार जीवनातील पस्तीस चाळीस वर्षे नऊ ते पाच किंवा सोळा अठरा तास काम करुन चरितार्थ चालवावा लागतो.
या सर्व पायऱ्या पार करुन मी इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. साहजिकच माझी हार्ड डिस्क गेल्या चाळीस वर्षातील असंख्य अनुभवांनी पूर्ण भरलेली आहे…
आवड चित्रकलेची असताना मी काॅमर्स केलं. त्या काळात भेटलेल्या मित्रांनीच मला नवीन कमर्शियल कामं दिली. नाटक, चित्रपटांची कामं करीत असताना नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्माते संपर्कात आले.
फोटोग्राफीची आवड होतीच, ती चित्रपटांचे स्थिरचित्रणाचे काम करताना उपयोगी पडली. जेव्हा चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ भेटत होते तेव्हा वाटायचं, यांना एकत्र आणून चित्रपट निर्मिती करता येईल. मात्र प्रत्यक्षात ते अवघड होतं. आता तर तसा विचारही करु शकत नाही. वीस वर्षांपूर्वीपर्यंत सारं काही ठीक चाललं होतं. नंतर आधुनिक तंत्रज्ञानाने जगच पालटून गेलंय.
लोकसंख्या अमाप वाढली. रुपयाची किंमत कमी झाली. कामांचं प्रमाण कमी झालं. हे क्षेत्र निवडल्याबद्दल कधी कधी पश्र्चातापही होऊ लागला. जाहिरातींची माध्यमं बदलली. पेपरवरील जाहिराती कमी झाल्या. पोस्टर्सचा जमाना जाऊन फ्लेक्सचा जमाना आला. हाताच्या कारागिरीला उतरती कळा लागली. इंटरनेटवरील ‘गुगल’ मुळे हवा तो संदर्भ क्षणार्धात मिळू लागला. एखाद्या विषयाचे तयार संदर्भ कष्टाविना, पैसे खर्च न करता मिळू लागले. गेली अनेक वर्षे महत्त्वाची असलेली चित्रकारांची पायरीच संपुष्टात आली. त्याच्याशिवाय जुजबी काम पूर्ण होऊ लागली.
परप्रांतातून येणारे कामगार झोप वगळता सोळा तास काम करु लागले, परिणामी कमर्शियल कामं स्वस्त झाली. झेराॅक्स, प्रिंटींग प्रेस ही ठराविक परप्रांतियांची मक्तेदारी झाली.
साहजिकच आज भरपूर अनुभव असून देखील कामांचे प्रमाण कमी आहे. गेले वर्ष तर कोरोनाने खाऊन गिळून टाकले. आता या नवीन वर्षात पुन्हा सुरळीत जीवन सुरु व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे.
मनोरंजनाचे क्षेत्र पुन्हा सुरु होईल, नाटकांचे प्रयोग, चित्रपटांची थिएटर्स सुरु होतील. त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची रोजीरोटी चालू होईल अशी या नव्या वर्षांत अपेक्षा करुया.
माझा मोहन थत्ते नावाचा एक मित्र आहे. तो ‘कॅलिग्राफी मास्टर’ आहे. चित्रकलेबरोबरच तो कविताही छान लिहितो. त्याच्या नावाखाली एक ओळ असते… ‘थोडा कवी, थोडा चित्रकार!’
त्याच्या प्रमाणेच मला अलीकडे लिहिण्याची आवड निर्माण झाली. कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात अनेक विषयांवर लिहित राहिलो. अनेक वाचकांना ते आपलसं वाटून आवडूही लागलं… आता मोहनप्रमाणे मी देखील माझ्या नावाखाली लिहिण्याचा विचार करतो आहे…..’थोडा चित्रकार, बराचसा लेखक…’
चालेल ना?
– सुरेश नावडकर १-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply