

पण इतरांनी अजरामर केलेल्या तीन रचनांचे मला सतत आश्चर्य वाटत राहिले आहे. अजूनही भल्याभल्यांना त्या गाऊन बघण्याचा ( त्यांचं शिवधनुष्य उचलून बघण्याचा) मोह आवरत नाही.
१) जाने कहाँ गये वो दिन – “मुकेशच्या ” खूप आवृत्त्यांना हा प्रयत्न करायचा मोह आवरत नाही. खासगी मैफिलीत, ऑर्केस्ट्रात, स्वतःच्या तू-नळीवर अशा हौशी नवोदितांबरोबरच बुजुर्गांनाही हे गाणं खुणावतं. पण मुकेशच्या कोरड्या आवाजाला ( हातातून सारं निसटत गेलेल्या कलावंताच्या हाती/ ओठीच फक्त असा आर्त ऐकू येतो) सावरून घेणाऱ्या एसजे जोडीचे अश्रू ओघळणारे व्हायोलिन (आमच्या जोगांचे व्हायोलिन मात्र “गाणारे ” असायचे.)त्यांना टाळून जाते. प्रयत्न प्रामाणिक असतात पण ते दूरदेशीचे स्वर कंठातून येत नाही. समोर उत्तुंग शिखर दिसत असते पण चढताना दमछाक होते.
२) ए मेरे वतन के लोगो – सध्याच्या सगळ्या प्रसिद्ध-अप्रसिद्ध गायिकांनी याला हात लावून पाहिला पण त्यातील वेदना अद्याप त्यांच्या कंठातून उमटली नाही. तेथे सी रामचंद्र आणि लताच हवेत आणि देशभक्तीचा वाद्यवृंद !
३) रंजीस ही सही – वालचंदला असताना माझा मित्र सुधीर नेरुरकरने या मेहंदी हसन नामक माणसाची सवय लावली. आज तू-नळीवर जगजीत, शंकर महादेवन, तलत अझीझ, हरिहरन, सुरेश वाडकर यांची व्हर्शन्स आहेत. पण मेहंदी हसन अजून अस्पर्श. तेवढी तपस्या अजून इतरांच्या खात्यात जमा नाही.
( कोक स्टुडिओच्या वेडगळ प्रयत्नांना मी खिजगणतीतही धरत नाही.)
बाबला आणि कंचन त्यामानाने शहाणे -स्वतःच्या परिघाला ओलांडायचे त्यांनी टाळले.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply