बासरीचा बादशहा पंडित मा.हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म १ जुलै १९३८ रोजी झाला.
बासरी म्हटले की प्रथम पं. हरिप्रसाद चौरासिया हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. बासरीवादनाने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले हरिप्रसाद चौरसिया यांचे वडील व्यवसायाने कुस्तीपटू होते आणि हरिप्रसाद यांनीही कुस्तीतच नावलौकिक मिळवावा अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु संगीताची आवड असलेल्या हरिप्रसादांनी वडिलांच्या नकळत संगीताचा अभ्यास आरंभला. मित्राच्या घरी संगीतशिक्षणाचा सराव करणारे हरिप्रसाद काही काळ तालमीसाठी वडिलांसोबत आखाड्यात जात राहिले. वयाच्या पंधराव्या वर्षापासून चौरसियांनी त्यांच्या घराजवळ राहणार्यांच पंडित राजारामांकडून हिंदुस्तानी गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी वाराणसीच्या पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला. वेणुनादाने रसिकांचे कान तृप्त करणारे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ बासरीवादक पद्मभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया वास्तविक पैलवान व्हायचे. पण रसिकांच्या सुदैवाने नियतीच्या मनात वेगळेच होते आणि अद्वितीय असा बासरीवादक घडला.
बासरीवादनासाठी उपयुक्त ठरणार्या आपल्या दमसासाचे श्रेय ते लहानपणी केलेल्या कुस्तीच्या तालमीला देतात. पैलवान न होता आपण बासरीवादक कसे झालो, त्याची आठवण दस्तुरखुद्द पं. चौरसिया यांनी एका कार्यक्रमात सांगितली आहे., माझे वडील पैलवान होते. त्यामुळे मीसुद्धा पैलवान व्हावे, असे माझ्या वडिलांना वाटायचे. पण माझ्या आईमुळे मी बासरीवादक झालो. लहानपणी आई मला जेवण भरविताना गाणी गुणगुणायची, मला ‘लोरी’ म्हणवत झोपवायची. आईचे ते शब्द आणि सूर माझ्या मनात-डोक्यात कायम गुणगुणत राहिले. आईने माझे नावही ‘हरी’ ठेवले होते. याच ‘हरी’च्या हातात आईने बासरी दिली व मी पैलवान न होता बासरीवादक झालो. पाच दशक अखंडपणे अविरतपणे आपल्या बासरीवादनाने प्रेक्षकांना मोहित करणा-या पंडितजींना आता पर्यंत संगीत अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
बांबूपासून बनविलेली बासरी हे वाद्य साधे वाटत असले तरी ते पंडित चौरसियांच्या हाती आल्यावर ते रसिकांना खिळवून ठेवणारे वाद्य बनते. या साधनेमुळे पंडित चौरसिया यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे. हरिप्रसाद चौरासिया यांनी पं. शिवकुमार शर्मा यांच्यासोबत त्यांनी ‘सिलसिला’ ‘शिव-हरी’ या नावाने या चित्रपटालाही संगीत दिले होते. पंडितजींनी परदेशातही आपली कला सादर केली आहे. जॉन मॅकलॉघलीन आणि जॅन गारबारेक यांसारख्या पाश्चिामात्त्य संगीतकारांबरोबरही त्यांनी काम केले आहे. हरिप्रसाद चौरासिया व पं. शिवकुमार शर्मा आणि प. झाकीर हुसेन यांनी अनेक देश विदेशात मैफीली केल्या असुन लोकांना मंत्रमुग्ध केले आहे.
‘कॉल ऑफ द व्हॅली’सारखा अनेक कलावंतांनी एकत्र येत केलेला प्रयोग असो वा गायन-बासरी, बासरी संतूर अशी जुगलबंदी करण्याची कल्पना असो; त्यातून चौरसिया यांची प्रयोगशील वृत्ती दिसते आणि संगीताविषयीचे त्यांचे समर्पण हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याची खात्री पटते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=bmzD8SOnoKg
Leave a Reply