कोणत्याही वस्तूवर जेव्हा प्रकाशकिरण पडतात तेव्हा ते त्या वस्तूच्या आरपार निघून जाऊ शकतात. अशी वस्तू पारदर्शक असते. साहजिकच तिचा वापर आरशासाठी होणं शक्य नसतं. इतर काही वस्तू अशा असतात की त्यांच्यावर पडणारे प्रकाशकिरण त्यांच्याकडून संपूर्णतया शोषले जातात. अशा वस्तू संपूर्ण अपारदर्शक असतात. त्यांच्या पाठी त्या वस्तूंची छाया
पडते. आपलं शरीर अशा वस्तूंमध्ये मोडतं. म्हणून तर सूर्यप्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आपली छाया ठळकपणे पडते. पण इतर काही वस्तूंवर पडलेले प्रकाशकिरण परावर्तित होतात.
आल्या दिशेनं परत उगमाकडे वळतात. अशा वस्तू उत्तम परावर्तक असतात. त्यांचा उपयोग आरशासाठी होऊ शकतो. प्रत्यक्षात मात्र बहुतांश वस्तू हे तीनही गुणधर्म धारण करणार्या असतात. त्यांच्यावर पडलेल्या प्रकाशकिरणांपैकी काही शोषले जातात, काही आरपार जातात तर काही परावर्तित होतात. तसे ते झाले नसते तर ती वस्तू आपल्याला दिसलीच नसती. आपल्या शरीरावरूनही काही किरण परावर्तित होतात. म्हणून तर आपण दुसर्यांना दिसू शकतो. एखाद्या वस्तूचा आरशासाठी उपयोग करायचा असेल तर मग तिच्यावरून परावर्तित होणार्या प्रकाशकिरणांचं प्रमाण जास्ती असावयास हवं. साधी काच पारदर्शक असते असं आपण म्हणतो. याचं कारण म्हणजे तिच्यातून आरपार जाणार्या किरणांचं प्रमाण जास्ती असतं. तरीही काही प्रमाणात त्या किरणांचं परावर्तन होतच असतं. म्हणून तर ती काच आपल्याला दिसते. शिवाय जरा निरखून पाहिलं तर आपल्या खिडकीच्या काचेतही आपलं अंधुकसं का होईना प्रतिबिंब दिसतंच.
जर बाहेर काळोख असेल तर ते अधिक स्वच्छ दिसतं. कारण बाहेरून आरपार येणारे किरण जवळजवळ बेपत्ता झालेले असतात. उलट काचेवर काजळी फासलेली असेल तर आरपार जाणार्या किरणांचं प्रमाण लक्षणीय रीत्या कमी झालेलं असतं. त्यामुळं पलीकडचं काही दिसणं अशक्य होतं. उलट परावर्तित किरण आता सहज नजरेला पडत असल्यामुळं आपलंच प्रतिबिंब दिसणं शक्य होतं. आगगाडीच्या वातानूकूलित डब्यांच्या खिडक्या अशा काजळलेल्या काचेच्या बनवलेल्या असतात. त्यामुळं स्टेशनवर ती गाडी उभी असताना त्या खिडक्यांमधून आत डोकावून पाहता येत नाही.
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply