कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा जन्म ३ जून १९६७ रोजी झाला.
चारुदत्त आफळे उर्फ बुवा शालेय वयापासून आजवर गेली ४० हून अधिक वर्षे चारुदत्त आफळे संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. आफळे घराणे क्षेत्र माहुलीचे सज्जनगडाच्या पायथ्याचे. समर्थ रामदासस्वामींच्या समाधीमंदिराकडून आफळे कुटुंबाला कीर्तनसेवेचे व्रत मिळाले. हे व्रत चारुदत्त आफळे निष्ठेने चालवीत आहेत. वडील गोविंदस्वामी आफळे आणि आई सौ. सुधाताई गोविंद आफळे. गोविंदस्वामी आफळे हे तरुण – बाल – वृद्धांची अलोट गर्दी खेचणारे असे त्यांच्या काळातले ते एकमेव कीर्तनकार होते. तसेच सुधाताईही उत्तम कीर्तन प्रवचन करीत असत. त्या होमिओपॅथीक डॉक्टर ही होत्या. आणि हिंदुमहासभेच्या कट्टर कार्यकर्त्या होत्या. चारुदत्त आफळे यांनी मराठी विषय घेऊन B.A. पदवी प्राप्त केली व संगीत विषय घेऊन M.A. पदवी प्राप्त केली. आणि भक्तीसंगीत व नाट्यसंगीत यावर ते Ph.D. केली आहेत. आई वडिलांकडून मिळालेली समृद्ध कीर्तन विद्या जोपासत असताना – श्री. दत्तदासबुवा घाग, श्री. श्रीपादबुवा ढोले, श्री. सुंदरबुवा मराठे अशा नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन बुवांना लाभले. बुवांनी त्यांच्या आयुष्यातले पहिले कीर्तन वयाच्या पाचव्या वर्षी केले. शाळा महाविद्यालयात असताना देखील काही कीर्तने केली. पण पूर्णतः कीर्तन सेवा १९८८ पासून सुरु झाली. संगीत शिक्षणासाठी त्यांनी मुकुंदबुवा गोखले, पित्रे बुवा, पं.आगाशे बुवा, पं.शरद गोखले, मधुकर खाडिलकर, पं. विजय बक्षी, ऋषिकेश बडवे अश्या अनेकांचे मार्गदर्शन लाभले. शिलेदार यांच्या मराठी रंगभूमीच्या अनेक संगीत नाटकांना चारुदत्त आफळे यांनी ऑर्गन साथ केली आहे.
१९८८ ते २०१८ या तीस वर्षांत देश विदेशातून ५००० चे वर कीर्तने त्यांनी केली आहेत. नाट्यप्रयोग, नाट्यगीते कार्यक्रम यांची संख्या वेगळी आहेच. महाराष्ट्रासह इंदोर, उज्जैन (मध्यप्रदेश), बडोदा (गुजरात), ग्वाल्हेर, लखनौ (उत्तरप्रदेश), दिल्ली, कोलकाता (बंगाल), हैद्राबाद (आंध्र), बेळगाव, बेंगलोर (कर्नाटक) इ. प्रांतातून कीर्तन, प्रवचने झाली. श्रीलंका, कुवेत, दुबई, मस्कत, दोहा, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातही कीर्तनाचा गजर पोहोचविला.
कीर्तन करण्याबरोबर अनेक मुलामुलींना ते कीर्तनाचे प्रशिक्षण देतात. राजर्षी शाहू महाराजांवरील शाहू या मालिकेत बालगंधर्वांचे काम करण्याचेही त्यांना भाग्य मिळाले.हेमंती बॅनर्जी कृत बालगंधर्व वरील माहितीपटात बुवांनी बालगंधर्वांची भूमिका केली. ज्या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
नाट्यसेवेसाठी त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाकडून पाटणकर पुरस्कार मराठी नाट्य परिषदेकडून – पं. पलुस्कर पुरस्कार, बालगंधर्व रसिक मंडळाकडून – बालगंधर्व पुरस्कार, मंगेशकर प्रतिष्ठानाकडून – मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, व या वर्षी पुणे महानगर पालिकेकडून “बालगंधर्व पुरस्कार” असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply