नवीन लेखन...

सरपोतदार केटरर्सचे किशोर सरपोतदार

सरपोतदार केटरर्सचे किशोर सरपोतदार यांचा जन्म ४ एप्रिल १९५९ रोजी पुणे येथे झाला.

पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व म्हणजे चारुदत्त सरपोतदार. गेली सुमारे सत्तर हून अधिक वर्षं ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारूकाका सरपोतदार यांचे किशोर सरपोतदार हे चिरंजीव. आजही पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. गेल्या तीन पिढ्यांमधील नाट्य-चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी ‘पुण्यातील घरचा हक्काचा माणूस’ असलेले चारूकाका अनेकांसाठी आयुष्याचा आधारस्तंभ बनले होते. त्यांचा चवीपासून सामाजिक कार्यापर्यंतचा वारसा आजही जपलाय आणि त्याचा आलेख चढता वाढता ठेवलाय तो त्यांचे पुत्र किशोर सरपोतदार यांनी! चारूकाका सरपोतदार यांनी घालून दिलेले काही पायंडे जपत ‘पूना गेस्ट हाउस’ व सरपोतदार केटरर्स ची वाटचाल सुरू आहे. किशोर सरपोतदार यांचे शालेय शिक्षण शालेय शिक्षण शिशु विहार, मॉडर्न हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण गरवारे महाविद्यालयात झाले. त्यांनी व्यवस्थापन शास्त्राची डिग्री भारती विद्यापीठातून घेतली आहे

किशोर सरपोतदार यांनी ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात राजा परांजपे यांच्या लहान पणाची भुमिका, सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्या ‘रमा माधव’ चित्रपटात, तसेच मेघराज राजे भोसले यांनी निर्माण केलेल्या ‘संत वामनभाऊ’ या चित्रपटात संत भगवान महाराजांची भुमिका अशा अनेक लहान मोठ्या भुमिका साकारल्या आहेत. तसेच लिओ जीन्स , पारकर शर्टस अशा अनेक ब्रँड साठी त्यांनी मॉडेलिंग ही केलेले आहे.

एम.बी.ए पदवी मिळवलेली किशोर सरपोतदार यांच्यावर लहानपणापासून ‘पूना गेस्ट हाउस’, तिथलं वातावरण या सगळ्याचा विलक्षण पगडा होता. त्यामुळे मेडिकल, इंजिनीअरिंगला जाण्याइतके गुण असतानाही किशोर सरपोतदार यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. काहीही व्यवसाय करायला ते उपयोगी पडेल असं वाटलं आणि मग घरच्याच व्यवसायात लक्ष घातलं. काळाची गरज ओळखून त्यांनी ‘पूना गेस्ट हाउस’च्या अल्पोपाहार उपाहारगृहात काही बदल केले. पंजाबी डिशेस, ग्रामीण थाळी, भरलं वांगं, भाकरी, भाजणीचं थालीपीठ-लोणी अशा डिशेस सुरू केल्या. त्यामुळे प्रतिसाद वाढला.’
नवनव्या गोष्टी करण्याचा, आव्हानं स्वीकारण्याचा चारूकाकांचा वारसाही त्यांनी आत्मसात केलाय. त्यामुळे अनेक मोठ्या कार्यक्रमांना केटरिंगची जबाबदारी त्यांच्याकडेच असते. तळजाई पठारावर ४० हजार स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर असो, ‘उंबरठा’चं शूटिंग असो, की ‘जाणता राजा’चे राज्यभरातील प्रयोग असोत; खानपान व्यवस्थेसाठी किशोर सरपोतदार हे एकमेव नाव असतं.

राजीव गांधी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या उपस्थितीत पुण्यात एक मोठा कार्यकर्ता मेळावा झाला. त्या वेळी १५ हजार लोकांना एका वेळी बुफे – तोही पुण्यात पहिल्यांदाच पुरविण्याचा पराक्रम किशोर सरपोतदारांनी केला आहे. अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान कलावंतांना जेवू घालणाऱ्या किशोर सरपोतदारांनी १९८५ मध्ये देशातला पहिला ‘फूड फेस्टिव्हल’ फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर आयोजित केला होता. शंभरहून अधिक पदार्थ आणि हुरड्यापासून चायनीजपर्यंत अशी रेंज असलेल्या या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळाला आणि यातून मिळालेल्या उत्पन्नातील एक लाख रुपये ‘श्रीवत्स’ला दिले गेले. आजही चारूकाकांची परंपरा कायम राखत केईएम रुग्णालयातील वीस गरीब रुग्णांचे रोजच्या जेवणाचे डबे इथून मोफत पुरविले जातात. शहरातील कुठल्याही समारंभ-कार्यक्रमात जेवणावळीनंतर अन्न शिल्लक राहिल्याचा निरोप मिळाला तर स्वखर्चानं वाहतूक व्यवस्था करून ते गरिबांना वाटण्याचं काम किशोर सरपोतदार करतात. या एका वेळच्या कामाला सुमारे साडेचार हजार रुपये खर्च येतो; पण शे-दोनशे लोकांचं पोट भरल्याचं समाधान त्यांच्यासाठी मोठं आहे.

‘एमसीसीआय’चे सर्व उपक्रम, कन्स्ट्रो, एक्सपो, महाटेक, किसान अशा मोठमोठ्या उपक्रमांमध्ये केटरिंगची सारी व्यवस्था किशोर सरपोतदारांकडेच असते. काही काळापूर्वी त्यांनी पुण्यातील पँव्हेलियन मॉल मध्ये पीजीएच एक्सप्रेस या नावाने मराठी पदार्थांचे आऊटलेट चालू केले आहे.

दरवर्षी किशोर सरपोतदार हे गणपतीच्या आधी मोदक बनविण्याची कार्यशाळा घेत असतात. पूना गेस्ट हाउस तर्फे दरवर्षी गणपतीत मोदक व दिवाळीत फराळ मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. सणासुदीच्या काळात समाजातील सर्वांना अत्यंत रास्त दरात मिठाई मिळावी, या हेतूने किशोर सरपोतदार यांनी ३८वर्षांपासून ‘ना नफा ना तोटा’ या तत्वाने मोतीचुर लाडू, चिवडा विक्रीची योजना महाराष्ट्रात प्रथम सुरू केली. त्याच्या द्वारे लो कॅलरी फराळ, डाएट फराळ, मिक्स फराळ बॉक्स आदी योजना त्यांनी प्रथम सुरू केल्या. सामाजिक बांधिलकी आणि रोजीरोटीसाठीचा व्यवहार यांचा उत्तम समन्वय साधण्यात त्यांना यश आलं आहे. आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या क्षेत्रांत सतत लोकसेवा करू शकतो या विचारांवर त्यांचा विश्वास आहे. किशोर सरपोतदार यांचे चिरंजीव सनत सरपोतदार हे आता त्यांच्या व्यवसायात मदत करत असतात.

किशोर सरपोतदार हे अनेक संस्थांसाठी काम करत असतात. त्यांनी अनेक संस्थांच्या उभारणीला हातभार लावला आहे. ‘प्रिझम ट्रस्ट’ ‘रेडक्रॉस’ची महाराष्ट्र शाखा, स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व समिती, पुणे केटरिंग असोसिएशन, पुणे हॉटेल असोसिएशनचे सचिव, पूना रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन, हॉस्पिटॅलिटी वर्ल्ड असोसिएशन या अनेक संस्थांचे काम ते करतात. पर्सिस्टंट कंपनीच्या ‘दे आसरा’, या उद्योजक घडविण्यासाठी अग्रेसर असलेल्या एनजीओ चे फूड इंडस्ट्री विषयी मार्गदर्शक (मेंटोर) या पदावर म्हणून किशोर सरपोतदार करत असून असून असंख्य नवोदित उद्योजकांना त्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापठात हॉस्पिटॅलिटी विषयक ‘तज्ञ सल्लागार या नात्याने किशोर सरपोतदार काम पाहतात. काही काळापूर्वी निवारा वृद्धाश्रमाच्याही जनरल बॉडी वर त्यांची निवड झाली आहे.

सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आदी अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे फूड इंडस्ट्री विषयी नव उद्योजकांना मार्गदर्शक असे अनेक लेख आजपर्यंत प्रसिद्ध झाले आहेत.

किशोर सरपोतदार यांनी ‘पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच’ हे स्टेज कलाकारांना कायमच उपलब्ध करून दिले असून या मंचावरून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले आहेत. सध्या कोरोना मुळे सर्व ऍक्टिव्हिटीज बंद आहेत. नाहीतर दर सोमवारी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतोच.

कोरोनाच्या अवघड अशा काळात फक्त संगीतातील नव्हें तर लहान मुलांच्या कार्यक्रमापासून. पपेट शो असे ऑनलाइन कार्यक्रम करून ‘पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच’ व अजित कुमठेकर यांनी लोकांना त्या वेळेस बोलतं केलं व सर्व लोकांना एका धाग्यात गुंफण्याचे काम केलं….हे ऑनलाइन कार्यक्रम ‘पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच’ने प्रथमच राबवला होता.

‘प्रिझम ट्रस्ट’ तर्फे पुण्यात मतिमंद मुलांची शाळा चालवली जाते. काही वर्षापूर्वी सरपोतदार बंधूंच्या तर्फे कामशेत रस्त्यावर ‘मिराघर’ या नावाने वृद्धाश्रम उभारले आहे.

किशोर व अभय सरपोतदार यांच्या पूना गेस्ट हाऊसला २०२० मध्ये ‘निनाद अन्नब्रह्म पुरस्कार’ मिळाला आहे. कै.महादेव वामन जोशी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात “एसएमएस’ हे संवादाचे महत्त्वाचे माध्यम ठरते आहे. मन प्रसन्न करणारे “एसएमएस’ अनेक जण एकमेकांना पाठवत असतात. अशाच एसएमएसचे संकलनाचे एक पुस्तक किशोर सरपोतदार यांनी केले आहे. याचबरोबर काही कोडी पण या पुस्तकात दिली आहेत. लवकरच चारुकाका सरपोतदार यांच्या जीवनावर डॉक्युमेंट्री करण्याचा त्यांचा मानस आहे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..