कितीही वर गेला तरी,
पतंगाला ठाऊक असते,
उतरायचे जमिनीवरी,
कधीतरी ते होणार असते,–!!!
उंच — उंच झोके घेऊनी,
उडत राहतो निळ्या आभाळी, त्याचाच सारखा वेध घेत,
स्वारी वर कशी पोहोचते,–!!!
उंच, उदंड त्या गगनी,
सुखद गारव्याची मजा असते, इकडून तिकडे विहरत राहून,
धुंदी कशी पहा चढते,–!!!
जमीन भासे अगदी छोटी,
तुच्छ सारी दुनिया वाटते,
लाथ मारून कसा तिजवरी,
सर सर आलो वर पहा ते,–!!!
तुमची दुनिया इवली इवली,
जशी भातुकली भासते,
वरून निरखताना कशी,
गर्वाने छाती फुगते,–!!!
शेपूट आपुले फिस्कारुनी,
हिंडताना धमाल येते,
उतरु तेव्हा उतरू खाली,
अहमभावाचे आवरण चढते,–!
स्पर्धा साऱ्या पक्ष्यांशी,
गगनही मग ठेंगणे वाटते,
तुमच्या मधला आगळा मी,
हृदय कसे आनंदित होते,–!!?
काही काळ गेल्यावरी,
कुणी येते मांजा कापते,
हवेत जाती इमले विरूनी,
जमीनच शेवट जवळची वाटते,–!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply