मुंबईचा माहिम भाग ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. इथेच सन इसवी सन ११४०मध्ये राजा प्रताप बिंबाची राजधानी होती. नंतरही काही राजे या इथे वास करून गेले, श्री प्रभादेवीचं मंदीरही इथेच होतं. इतरही मंदीरं, राजवाडे, मंत्री-सरदारांच्या गढ्या होत्या असतीलच..
सध्या इथे मेट्रोच्या कामासाठी जमिनीत खोलपर्यंत खोदकाम सुरु आहे. या खोदकामाच्या दरम्यान ऐतिहासिक काळातील काही गोष्टी सापडण्याची दाट शक्यता आहे किंवा सापडल्याही असतील, परंतू तसं कुठे वाचनात आलेलं नाही.
हिच बाब माहिम परिसरात सुरु असलेल्या मोठाल्या टाॅवर्सच्या बाबतीत शक्य आहे. गगनडुंबी (शब्द बरोबर आहे. टाॅवर्सची उंची आता ढगांच्या आतपर्यंत डुंबताना पाहाता येते. वाटल्यास निरिक्षण करावे.) टाॅवर्स बांधताना त्याचा पाया जमिनीत बराच खोलपर्यंत खणावा लागतो. त्या खोदकामातही अशा काही वस्तू सापडलेल्या असू शकतात. परंतू तसंही काही वाचनात आलेलं नाही.
कोणत्याही प्रकारच्या खोदकामात असे ऐतिहासिक महत्वाचे अवशेष सापडले, की सरकारचं पुरातत्व खातं त्या अवशेषांची शहानिशा करुन, गरज पडल्यास खोदकाम सुरु असलेली सर्वच जागा पुढील संशोधनासाठी ताब्यात घेतं, असा माझा समज आहे. असं होऊ नये म्हणून असे काही अवशेष सापडल्यास त्यांची परस्पर विल्हेवाट लावली जाण्याचीच शक्यता जास्त आहे किंवा तशी लावली जातही असेल, कुणास ठाऊक..! तेवढा पुरेसा कोडगेपणा आपल्या सर्वांच्या अंगात पुरपूर मुरलेला आहे.
खाजगी बिल्डर्स असोत, की ‘कल्याणकारी राज्य’ असं बिरुद स्वत:च्या नांवामागे किंवा नांवापुढे मिरवणारी सरकारी यंत्रणा असो किंवा ‘मुंबय नाय कुणाच्या बापाची’ म्हणत घोषणा ठोकणारे आणि स्वत:ला या मुंबईचे भुमीपुत्र म्हणवणारे आपण सर्व जण असोत, कुणाचंही अर्वाचिन मुंबई शहर आणि त्याच्या प्राचीन इतिहासाशी काहीही देणं घेणं उरलेलं नाही, हे एव्हाना सिद्ध झालंय. कुणाचंच कुणावर नियंत्रण नाही..!!
पण मी हे का लिहितोय?
कोडग्यांना इतिहास नसतो आणि भविष्यही नसते, ते वळवळतात फक्त वर्तमानाच्या शेणातच..
कोडग्यांवर काहीच परिणाम होणार नाही हे माहित असूनही का लिहितोय?
कदाचित माझा कोडगेपणा लपवण्यासाठी असावं. कुणास ठावूक..!!
— नितीन साळुंखे
Leave a Reply