नवीन लेखन...

कोडी

 

नागपूरच्या जवळच एक छांदिष्ट व्यक्तिमत्त्व राहतं. भास्कर नंदनवार हे त्याचं नाव. त्याचं वेगळेपण असं, की हा माणूस भारतातल्या किमान दोन-पाचशे दैनिक, नियतकालिकांना शब्दकोड्यांचा पुरवठा करतो. मी पुण्याला असतांना माझा एक पत्रकार मित्र किशोर देवधर शब्दकोड्याचं काम करायचा. कधीकाळी तो मुख्य प्रवाहातल्या प्रत्रकारितेत होता. ‘ब्लिट्स’मध्येही त्यानं काम पाहिलं अन् नंतर वृत्तपत्रांशी त्याचा संबंध राहिला तो शब्दकोड्यांपुरता. मी जेव्हा नागपूरला काम करू लागलो तेव्हा वाचकांची एक गरज म्हणून शब्दकोडी हवीत, असा निष्कर्ष निघाला. आज-कालचं कोणतंही वृत्तपत्र पाहा. त्यात शब्दकोडी आहेतच. स्वाभाविकपणे भास्कर नंदनवार यांना आमत्रण दिलं. हा माणूस खरंच अवलिया. त्याच्याकडे रोज शेकड्यांनी वृत्तपत्र, नियतकालिकं, अनियतकालिकं येत असतात. या देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या बातम्यांचाही त्यानं छान वापर केला. वेगवेगळ्या वृत्तपत्रांत स्तंभ चालविले. आमची भेट झाली, त्यांना मी माझी गरज सांगितली तेव्हा शब्दकोड्यांचीही बाजारपेठ कशी झालीय, याचा प्रत्यय आला. किती चौकोनांचं कोडं हवं? म्हणजे उभे-आडवे चौकान किवा शब्द! त्यासाठी काही विषय हवाय का? म्हणजे वैज्ञानिक, क्रीडाविषयक, सामान्यज्ञान, सिनेमा वगैरे? की साधंच, मराठी भाषेची कसोटी पाहणारं? बरं, कोडी सोपी हवीत की अवघड? की अधूनमधून सोपी-अवघड? शब्दकोडे रोज हवंय की आठवड्याला महाशब्दकोडे? प्रश्न अनेक होते. त्यांची उत्तरे शोधताना माझी दमछाक झाली. शब्द प्रमाणभाषेतले हवेत अन् कोडी फार अवघडही नकोत, असं सांगून तो प्रश्न तिथंच संपविला. शब्दकोड्यांपुरता हा विषय संपलेला होता; पण माझ्या मनात त्यामुळं निर्माण झालेली कोडी सुटत नव्हती. दौर्‍यांमध्ये, भेटीगाठींमध्ये, वितरण विभागाच्या बैठकांमध्येही शब्दकोडी आणि वाचकांची त्याबद्दलची प्रतिक्रिया हा माझ्या औत्सुक्याचा विषय असायचा. अर्थात, शब्दकोडी ही काही मला नवीन नव्हती. माझ्या लहानपणी शब्दरंजन कोडी हा त्या वेळच्या ‘मराठा’ या दैनिकातला महत्त्वाचा विषय असायचा. ‘इलस्ट्रेटेड विकली’मधल्या क्रॉसवर्डमध्ये अडकलेले अनेक शब्दसंशोधक मी पाहिलेले होते. आमच्या घरात माझ्या पत्नीचा भाऊ हा तर शब्दकोडी हटकून पाहायचा. ती सोडविण्याचा छंद इतका, की कोडं सुटलं नाही, तर तो सैरभैर व्हायचा. मी पत्रकार अन् त्यामुळं शब्दभांडार मोठं असणार म्हणून कधीतरी हत्तीला पाचअक्षरी पर्यायी शब्द काय, असा प्रश्नही माझ्यापुढं यायचा. ‘हत्ती’ या शब्दाच्या पुढं माझी गाडी जात नसे. एका अर्थानं या शब्दकोड्यांनी नागपूरच्या मुक्कामात मला घेरलं होतं. शब्दकोड्यांमुळं आपला अंक वाचकांच्या हाती अधिक काळ राहतो, अंकातील बातम्या वाचल्यानंतरही त्याचा वापर होऊ शकतो, शब्दकोड्यांनी अंक शिळा होत नाही, ग्रामीण भागात शब्दकोड्यांना खूप मागणी असते, आपल्या स्पर्धक वृत्तपत्रांनी सोळा चौकोनाचं कोडं सुरू केलंय, आपल्याकडेही हवंच अशी एक ना दोन असंख्य कारणं शब्दकोड्यांसाठी पुढे येत असायची. पुण्यात किशोर देवधरनं तर ‘श्री आणि सौ’,‘भन्नाट टाइमपास’, या नावाची शब्दकोड्यांची साप्ताहिके चालवून यशस्वी करून दाखविली होती. एकूण शब्दकोड्यांना पर्याय नव्हता; पण त्याचवेळी माझा अनुभव असाही होता, की ज्यांना- ज्यांना मी शब्दकोड्यांबद्दल विचारायचो, त्यांनी- त्यांनी ती वाचलेली, पाहिलेली नसायची. आम्ही ते नाही वाचत, असं काही मंडळी स्पष्टपणे सांगायचीही. शब्दकोड्यांसाठीच्या स्पर्धेचाही अनुभव काहीसा असाच होता. बक्षीस मिळविणारात तेच- ते वाचक हटकून असायचे. शब्दकोड्यांना पर्याय नाही हे मान्य, पण ते कोण सोडवितात? अन् का? या प्रश्नाचं समर्पक उत्तर मला गवसत नव्हतं. असंच एकदा सध्याच्या तरुणांपुढील प्रश्न, अशा विषयावर चर्चा सुरू होती. ती चांगलीच रंगात आली होती. बेरोजगारी, भ्रष्टाचार, असहिष्णू वृत्ती, सरकार दरबारी होणारा विलंब, निगरगट्ट शासनव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू होती. एक टप्पा असा
आला, की सातत्यानं अपयशाचा सामना करावा लागल्याने आजची पिढी निराशाग्रस्त होण्याचा धोका वाढलाय का?…चर्चा पुढे तशीच सुरू राहिली; पण चर्चेतलं माझं लक्ष मात्र संपलं होतं. वृत्तपत्रातील कोडी सोडविण्यामागे भाषासमृद्धी हा हेतू असेलही कदाचित; पण त्यापेक्षाही कोडं सुटल्याचा आनंद मोठा असावा, याची जाणीव मला होत होती. कोडी सोपी हवीत. का? तर ती
सुटली नाहीत किवा त्यासाठी खपूच वेळ द्यावा लागला, तर माणूस आधीच पराभव स्वीकारून मोकळा होत असावा किवा फार अवघड आहे म्हणून ते बाजूला ठेवत असावा. कोड्यांचा मूळ हेतूच ती सोडविणं हा असल्यानं ती सोपी असणं आवश्यकच ठरत असावं. मनात आलं, माणसाच्या आयुष्यात सतत, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कोडी येत असतात. त्यातली काही सोडविता येतात तर काही नाही. वृत्तपत्रातल्या कोड्यांचं तसं नसावं. एक तर ती सहजी सुटतात. आपल्यालाही कोडी सोडविता येतात, हा विश्वास बळावतो अन् मग तो पुन्हा नव्या कोड्याची प्रतीक्षा करीत राहतो. ही कोडी सोडविताना वास्तवातल्या कोड्यांचं काय, हा प्रश्न मनात अजूनही कायम आहे. पाहा, तुम्हाला उत्तर सापडतंय का?

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

2 Comments on कोडी

  1. श्री आणि सौ हे शब्दकोड्यांचे साप्ताहिक नविन प्रकाशनतर्फे प्रकशित करण्यात येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..