नवीन लेखन...

कोहळा – एक अमृत फळ

कोहळा एक अमृत फळ

कोहळा किंवा कोहळा भारतात खाल्ली जाणारी एक फळभाजी आहे. ह्याचे शास्त्रीय नाव बेनिन्कॅसा सेरीफेरा. हा पुढील नावानी सुद्धा ओळखला जातो. (भुरा कोहळा; हिं. कुम्हडा, पेठा; गु. भुरा कोळू; क. संडिगे बुडेकुंबकलाई; इं. व्हाइट गोर्ड मेलॉन, ॲश गोर्ड; लॅ. बेनिन्कॅसा सेरीफेरा; कुल-कुकर्बिटेसी).

ही मोठी व वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल मूलतः जपान व इंडोनेशियातील व जावा येथून आली असून नंतर तिचा प्रसार आशिया, आफ्रिका व अमेरिका येथे झाला. भारतात बंगाल व पंजाब येथे महाराष्ट्रापेक्षा अधिक लागवड केली जाते. हिची अनेक शारीरिक लक्षणे कुकर्बिटेसी (काकडी वर्गीय वनस्पतींशी) जुळणाऱ्या वर्णनाप्रमाणे आहेत कोहळ्याची सरपटत वाढणारी वेल प्रतानांच्या (आधाराच्या) साहाय्याने वर चढते. तिची पाने मोठी व खालच्या बाजूने केसाळ असतात. फुले मोठी, एकलिंगी, एकएकटी व पिवळी; फळे लंबगोल, रसाळ, लवदार व पूर्ण पिकल्यावर पांढऱ्या मेणचट थराने आच्छादलेली; . भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे; पण साधारण दहा-बारा पट मोठे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते, काही काळाने ही लव गळून जाते. त्याचा आतील गर हा मऊ व पांढराशुभ्र असतो व त्यामध्ये आद्रतेचे (पाण्याचे) प्रमाण जास्त असते. कोहळा हिरव्या रंगाचा असतो. पाने खरखरीत असतात, तर फुले पिवळ्या रंगाची असतात. कोहळ्याला संस्कृत भाषेत कुष्मांड असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो.
वसंत ऋतूमध्ये फुले येतात. ग्रीष्मात फळे धरतात. ही फळे तयार होईपर्यंत शरद-हेमंत ऋतू उजाडतो. फळाचे वजन जास्तीत जास्त दोन कि ग्रॅ.; फळ शीतल, पौष्टिक, सारक, मूत्रल (लघवी साफ करणारे) व वाजीकर (कामोत्तेजक) असते.

लागवड:

समुद्रसपाटीपासून १,२०० मी. हून जास्त उंचीवरील गरम हवामानात हे पीक चांगले वाढते. जमिनीत आळी करून भरपूर शेणखत घालून पावसाळ्यात प्रत्येक आळ्यात चारपाच बिया लावतात. दोन-तीन आठवड्यांनी आळ्यात दोन जोमदार रोपे ठेवून बाकीची काढून टाकतात. पुढे जरूरीप्रमाणे पाणी देतात. फळे दोन-अडीच महिन्यांनी येतात. ती पुढे दोन-अडीच महिन्यांत पक्व होतात. वेलावरच पक्व झालेली फळे जास्त टिकतात. हेक्टरी ५,०००–६,००० किग्रॅ. फळे मिळतात.

कोहळ्यातील पोषकघटक :
एक कप किंवा 100 ग्राम कोहळ्यातील पोषकघटक पुढीलप्रमाणे असतात.त्याच्या या औषधी गुणधर्मामुळे आहारामध्ये त्याचा आवर्जून वापर करावा.
• कॅलरीज – 17
• एकूण कर्बोदके – 4 g
• फायबर – 3.8 g
• प्रथिने – 0.5 g
• एकूण चरबी 0.3 g
• कोलेस्टेरॉल 0%
• पोटॅशियम 7.9 मिलीग्राम
• मॅग्नेशियम 3%
• कॅल्शियम 2%
• लोह 2%
• व्हिटॅमिन बी- 60%
• व्हिटॅमिन C – 2%
• व्हिटॅमिन डी 0%

उपयोग:
० कोहळा सप्तधातूंचे पोषण करणारा असल्यामुळे वाढीच्या वयातील मुलांना याची नियमितपणे थालीपीठ, भाजी करून द्यावी. यामुळे मुलांची सर्व अवयवांची वाढ चांगली होऊन उंचीदेखील वाढते. तसेच स्मरणशक्ती व बुद्धीवर्धनासाठीदेखील कोहळ्याचा वापर करावा.
०मज्जासंस्थेची कार्यशक्ती वाढविण्यासाठी कोहळ्याचा आहारात वापर करावा. कोहळा सूप किंवा रस पिल्याने मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो.
० कोहळ्यामध्ये तंतुमय पदार्थ व आद्र्रता भरपूर असल्याने मलावरोधाची तक्रार असलेल्यांनी कोहळ्याची भाजी खावी. यामुळे शौचास साफ होते.
० मूळव्याधीचा त्रास होत असेल व शौचाच्या वेळी रक्त पडत असेल तर कोहळा आवर्जून खावा.
० कोहळा हा शुक्रवर्धक असल्याने व धातूदौर्बल्य दूर करून धातूंचे पोषण करणारा असल्यामुळे वंध्यत्व असणाऱ्या रुग्णांनी कोहळ्याचा रस साखर घालून प्यावा.
० हृदयविकार असणाऱ्यांनी हृदयाचे बळ वाढविण्यासाठी कोहळा रस किंवा कोहळा सूप प्यावे.
० नाकातून रक्त येणे या विकारात कोहळ्याचा रस प्यावा, कारण कोहळा हा रक्त पित्तशामक असल्याने लगेचच आराम मिळतो.
० कृश व्यक्तींनी धातूदौर्बल्य कमी होऊन शरीराचे पोषण होण्यासाठी व वजन वाढविण्यासाठी कोहळ्यापासून बनविलेला कोहळेपाक नियमित खावा.
० गर्भवती स्त्रीने कोहळ्यापासून बनविलेला कुष्मांडावलेह या अवलेहाचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे गर्भस्थ बाळाचे व मातेचे पोषण व्यवस्थित होते.
० तळहात, तळपाय यांची आग होत असेल व त्याबरोबर जळवात हा विकार झालेला असेल तर रात्री झोपताना तळव्यावर कोहळ्याचा कीस बांधून ठेवावा, त्यामुळे थंडावा निर्माण होऊन भेगा हळूहळू कमी होतात.
० जुनाट ताप, सर्दी, खोकला, क्षयरोग, टायफॉइड, मलेरिया, कावीळ आदी आजारांमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर त्यावर कोहळा हे उत्तम टॉनिक आहे.
० उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी कोहळ्याचा रस साखर घालून प्यावा.
० भाजलेल्या जखमांचा दाह कमी करण्यासाठी कोहळ्यांच्या पानांचा किंवा फळाच्या आतील गर त्वचेवर लावावा. त्यामुळे लगेचच दाह कमी होतो.
० चेहऱ्यावरील मुरुमे, काळे डाग कमी करून सौंदर्य वाढवण्यासाठी कोहळ्याचा गर चेहऱ्यावर लावावा.
० मूतखडा झालेला असल्यास तसेच लघवी साफ होत नसल्यास व लघवीला जळजळ होत असेल तर कोहळ्याचा रस प्यावा.
० अशा प्रकारे शरीराच्या सप्तधातूंचे पोषण होऊन त्यांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी व एकूणच शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारामध्ये कोहळ्याचे सेवन आवर्जून करावे.

कोहळा खाण्याचे फायदे :
1. दमा, खोकला, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. बिया गोड, शीतल आहेत. कोरडा खोकला, ताप, उपदंश इत्यादींवर गुणकारी असतात. बियांचे तेल कृमिनाशक असते.
2. हृदयासाठी उपयुक्त..
कोहाळात भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-C असते. हे घटक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी आवश्यक असतात. पोटॅशियममुळे रक्तवाहिन्यामधील तणाव कमी करून रक्तदाब कमी करण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित करून शरीरात योग्य रक्त प्रवाह राखला जातो. अशाप्रकारे, कोहळा हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन-C हार्ट अटॅकची शक्यता कमी करण्यासाठी उपयुक्त असते.
3. नाकातून रक्तस्त्राव थांबविण्यासाठी.
नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या असल्यास कोहाळ्याचा रस पिणे आणि कोहळा खाणेही उपयुक्त ठरते.
4. अ‍ॅसिडिटी कमी करते.
जर आपल्याला अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास तर कोहळ्याचा रस तयार करून त्यात थोडीशी हिंगाची पूड घालावी. कोहाळ्याचा रस दररोज सकाळी व संध्याकाळी प्यावा. यामुळे आम्लपित्तपासून आराम मिळण्यास मदत होते. अ‍ॅसिडिटीबरोबरच अल्सरचा त्रासही कमी होण्यास कोहळा फायदेशीर असतो.
5. मळमळ व उलट्या थांबवते.
मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी यासारखे त्रास होत असल्यास चार चमचे कोहळ्याचा रसात साखर मिसळून मिश्रण घ्यावे.
6. मूळव्याधमध्ये उपयुक्त.
मूळव्याधाचा त्रास होत असल्यास त्यावरही कोहळा फायदेशीर ठरतो. यासाठी कोहळ्याचा 2 चमचे गर, 1 चमचा गूळ, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा हिरड्याचे चूर्ण एकत्र मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दिवसातून दोनदा दुधाबरोबर प्यावे. यामुळे मुळव्याधची समस्या लवकर दूर होण्यास मदत होते. तसेच मूळव्याधीत होणाऱ्या बद्धकोष्ठता आणि रक्त पडणे या समस्याही दूर होतात.
7. वजन कमी करण्यास उपयुक्त.
कोहाळ्यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असून ते कमी कॅलरीज असते त्यामुळे वजन कमी करण्यास कोहळा उपयोगी ठरतो.
8. किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त.
कोहाळाचा आहारातील सेवनामुळे किडनी निरोगी राखण्यासाठी मदत होते. किडनीचे आरोग्य उच्च रक्तदाबामुळे धोक्यात येत असते. मात्र कोहळा रक्तदाब नियंत्रित ठेवत असल्याने किडन्या निरोगी राहण्यास मदत होते.
9. लघवीची जळजळ कमी करते.
कोहाळ्याचा रस पिण्यामुळे लघवीला साफ होऊन लघवीला जळजळ होणे दूर होते. मूतखडा झाल्यासही लघवी साफ होत नसल्यास कोहळ्याचा रस प्यावा.
10. फिट येणे यावर उपयुक्त.
फिट येणे किंवा एपिलेप्सीचा त्रास असल्यास 1 चमचा गाईचे तूप, 9 चमचा ज्येष्टमध चूर्ण, 9 चमचा कोहाळा रस हे मिश्रण एकत्रित करून घ्यावे. फिट येणे या त्रासाची अधिक माहिती जाणून घ्या.
11. वीर्य वाढवतात.
ज्या पुरुषांची प्रजनन क्षमता कमी असते त्यांच्यासाठी कोहळा खाणे फायदेशीर असते. याच्या नियमित सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढू शकते.
12. मुलांसाठी उपयुक्त.
वाढत्या वयातील मुलांच्या आहारात कोहळ्याचा जरूर वापर करावा. कारण मुलांची वाढ योग्यप्रकारे होण्यासाठी यांमुळे मदत होते. तसेच मुलांची बुद्धी व स्मरणशक्ती वाढण्यासाठीही कोहळ्याचा उपयोग होतो.
13. त्वचा आणि केसांसाठी चांगले
कोहळा रस अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो त्वचा आणि केसांना
रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतो. हे व्हिटॅमिन सी ने देखील समृद्ध
आहे, जे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते, एक प्रोटीन जे निरोगी त्वचा आणि
केसांसाठी आवश्यक आहे.
14. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते
मधुमेहाचा त्रास असलेल्यांसाठी कोहळा रस हा एक उत्तम उपाय आहे. त्यात साखरेचे
प्रमाण कमी असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, याचा अर्थ
रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होत नाही. कोहळा रस रक्तप्रवाहात साखरेचे
शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते.

कोहळा खाण्यामुळे होणारे नुकसान –
कोहळा आरोग्यासाठी फायदेशीर असतो तसेच काहीवेळा कोहळा खाण्यामुळे त्रासही होऊ शकतो. जास्त प्रमाणात कोहळा खाण्यामुळे वजन अधिक वाढू शकते. तसेच ज्यांना दमा, सर्दी किंवा ब्राँकायटिस त्यांनी कोहळा खाणे टाळावे. कारण या त्रासामध्ये कफ वाढू शकतो.

कोहळ्या पासून बनणारे खाण्याचे पदार्थ:
भारतातील आग्रा येथे बनणारी पेठा नावाची गोड मिठाई कोहळ्यापासून बनते. ही मिठाई बर्फाच्या वडीसारखी अर्धपारदर्शक असते. भाजी, कोहळ्याचे तुकडे घातलेले दक्षिण भारतीय सांभार, रायते, सूप, सांडगे, कोहळेपाक, पेठा,
कोहळेपाक हा पौष्टिक समजला जातो. हा बाजारात मिळतो. हा द्रवस्वरूपात असतो. आग्य्राचा पेठा म्हणून प्रसिद्ध असलेली मिठाई ही कोहळ्यापासूनच बनवली जाते. कोहळ्याचे थालीपीठ, पराठा, भाजी, कोहळा रस व सूप असे अनेक प्रकार बनविता येतात.

कार्तिक शुक्ल नवमीला कुष्मांड नवमी, किंवा अक्षय नवमी म्हणतात. या दिवसाला महाराष्ट्राबाहेरचे लोक आवळा नवमी म्हणतात.

वास्तुशास्त्रातील एक समजूत : वास्तूमधून नजरदोष शोषून घेतल्यावर हे फळ नासते. म्हणजे दरवाज्यावर टांगलेला कोहळा खराब झाला तर नकारात्मक शक्ती नाश पावली असे समजून, पुन्हा दुसरे फळ घरात उंबरठ्यावर चार चौघांना दिसेल असे बांधून ठेवतात.
कोहळ्यांचा गर भाजी, सांडगे व पापड इत्यादींसाठी उपयोगात आहे. उत्तर भारतात कोहळ्यापासून पेठा मिठाई करतात. आग्र्याचा पेठा प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात कोहळा आमटीत मिसळतात. कोहळ्यापासून महाराष्ट्रात कोहळेपाक बनवितात. कोहळ्याचा रस पेय म्हणूनही घेतात.
असा हा बहुगुणी व बहुउपयोगी कोहळा अत्यंत महत्वाची फळभाजी आहे.

डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा : ९८८१२०४९०४
तारीख : २३.०३.२०२४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

3 Comments on कोहळा – एक अमृत फळ

  1. मराठीत एक म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे.आवळया पेक्षा जास्त औषधी गुण या कोहळा या फळात् आहेत.हा लेख वाचला कि या म्हणी चि सत्यता पटते.खुप उपयोगी असणारा कोहळा हा जरी भाजीपाला मार्केटला दिसतो पण याचा वापर कसा करायचा व् हे गुणकारी औषधी फळ का खायचे हे समजत नाही.हा लेख वाचून कोहळा कसा औषधी आहे हे कळते.हैद्राबाद मध्ये प्रत्येक घराच्या बाहेर हा कोहळा पांढऱ्या कापडाच्या घराबाहेर टांगलेला दिसेल.नवीन वाहन घेतले कि त्याच्या चाका खाली कोहळा ठेऊन गाडी सुरु केली जाते.हा कोहळा वास्तू दोष ,नजर, निवारक् आहे.लेख हा दुर्मिळ औषधी वनस्पती चि शास्त्रीयदृष्ट्या माहिती देतोच् पण तो कसा आपल्या आहार मध्यें समवेश् करावा हे मह्त्व सांगतो.असे दुर्मिळ औषधी फळाची माहिती सर्वांना होणे आवश्यक आहे.लेखा मधील माहिती सहज भाषेतून असल्याने ती वाचताना कोहळा किती ऊपयोगी आहे हेच कळते.

  2. कोहळा एक अमृत फळ, हा लेख नांवां प्रमाणे, लेखकाने कोहळा चे अनेक औषधी गुणधर्म उलगडून सांगितले आहे त. साधारणपणे आपल्याला तुच्छ वाटणारे हे फळ, शक्तिवर्धक व अनेक आजारांवर उपयोगी औषध आहे. लेख नक्की वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..