एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती लवकर पूर्ण होत नाही. भाईंनी कोकणातील कवी, लेखक व रसिकांना जोडण्याचा ध्यास घेतला होता. केवळ तीन महिन्यात सगळी जुळवाजुळव करून 1991 च्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोकण मराठी साहित्य परिषदेची गुढी उभारली गेली. उत्तर कोकणातून डहाणू, पालघर, केळवे, माहीम, वसई, ठाणे, कल्याण तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्हा यातील साहित्य रसिक कोमसापच्या कल्पनेने भारून गेले.
सुप्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणात स्थापन केलेल्या ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ या संस्थेचा प्रवास आता 30 हून अधिक वर्षे झालेला आहे. मुळात ही संस्था स्थापन करण्यामागचा मधुभाईंचा हेतू शुद्ध होता. कोकणातील साहित्यिक नावारूपाला यावेत, त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक साहित्यिक जोडले जाऊन त्यांची प्रगती व्हावी हा होता. ‘कोमसाप’च्या आता वृक्षाला फळे रसाळ गोमटी येऊ लागली आहेत. महाराष्ट्राला कोकण प्रांताने 1940 पासून अनेक साहित्यिक दिले होतेच. आता या संस्थेच्या उपक्रमामुळे कोकणातून नवी पिढी उदयास आलेली आहे आणि महाराष्ट्राला नवनवे लेखक, कवी माहीत झाले आहेत.
अशी एखादी संस्था स्थापन करण्याची संकल्पना कशी सुचली याबद्दल मधुभाईंनी स्वतःच मला सांगितलेल्या आठवणी अशा –
1990 साली मधु मंगेश कर्णिक यांनी ’महाराष्ट्र साहित्य परिषदे’ तर्फे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला. त्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार होते द .मा .मिरासदार. मतदारांची यादी पाहता असे दिसून आले की रत्नागिरीत मोठे संमेलन होणार असूनही, कोकणातील मतदार होते अवघे दोनच ! भारतभरातील इतर मतदारांच्या मतांमुळे कर्णिक निवडून आले खरे पण कोकणातील लोक साहित्य संस्थेशी जोडले गेले नाहीत हे सत्य हे कळून आले. कोकणच्या लोकांना आपली वाटेल अशी एखादी साहित्यसंस्था निर्माण करण्याची गरज आहे हे भाईंच्या लक्षात आले. मग रत्नागिरीच्या साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी कोकणात आपण ’कोकण मराठी साहित्य परिषद’ अशी संस्था स्थापन करणार असल्याची घोषणा केली. तसेच आपले साहित्यातील आदर्श केशवसुत यांचे एक स्मारक मालगुंड येथे उभे करण्याचा प्रकल्पही घोषित केला. दोन्ही संकल्पनांचे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे आणि शं.ना. नवरे यांनीही या योजनेला पत्र लिहून पाठिंबा दिला.
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती लवकर पूर्ण होत नाही. भाईंनी कोकणातील कवी, लेखक व रसिकांना जोडण्याचा ध्यास घेतला होता. केवळ तीन महिन्यात सगळी जुळवाजुळव करून 1991 च्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोकण मराठी साहित्य परिषदेची गुढी उभारली गेली. उत्तर कोकणातून डहाणू, पालघर, केळवे, माहीम, वसई, ठाणे, कल्याण तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्हा यातील साहित्य रसिक कोमसापच्या कल्पनेने भारून गेले. त्यावेळी कोकणात अशी एकही साहित्य संस्था अस्तित्वात नव्हती. भाईंनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी खूप दौरे केले. कोमसापची शाखा सुरू करण्यासाठी सबंध कोकणातून निमंत्रणे येत होती. भाई प्रत्येक प्रांतात जाऊन त्यांच्याशी संवाद करायचे. कोमसापची स्थापना का करावी लागली, तिचे कार्य काय आहे हे भाई सर्वांना समजावून सांगत. साहित्य संमेलने, पुस्तक प्रकाशन, कार्यशाळा, परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन असे संकल्पित कार्यक्रम सर्वांपुढे ठेवत असल्याने गावोगावी स्वागत होत होते. 24 मार्च 1991 ला रत्नागिरीला कोकणातील सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधींची दाटी झाली आणि ’लोकसत्ते’चे संपादक माधव गडकरी यांच्या हस्ते कोकण मराठी साहित्य परिषदेचं रीतसर उद्घाटन झालं.
संस्थात्मक कार्य मी करू शकलो कारण माझ्याजवळ माणसं चांगली होती. असे भाई आवर्जून सांगतात. कोमसापच्या उभारणीतील सुरुवातीचे कार्यकर्ते होते अरुण आठल्ये, राजा राजवाडे, वसंत सावंत, प्राचार्य कोडोलीकर, अरुण नेरूरकर, डॉ. वि. म. शिंदे, श्रीकांत शेट्ये, पाटणे वकील, विद्याधर भागवत. कोमसापची स्थापना ही कोकणासाठी एक महत्त्वाची सांस्कृतिक घटना होती. मात्र ‘मराठी साहित्य परिषदे’च्या अधिकाऱ्यांनी कोमसापला संलग्नता देण्याचे नाकारले. पण प्रत्येक जिल्ह्यात कमिटी स्थापन करून कोमसापने आपले काम स्वबळावरच सुरू केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जाहीर केलेला दुसऱ्या महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कविवर्य केशवसुत यांचे स्मारक. त्याचे भूमिपूजनही मधुभाईंनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा एक वर्षाचा काळ संपायच्या आतच केले. मालगुंड येथील शिक्षण संस्थेने उत्स्फूर्तपणे मदत केली, त्यामुळे हे शक्य झाले. यासाठी निधी जमवणे हे मात्र कष्टाचं आणि जोखमीचं काम होतं. मधुभाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, या स्मारकासाठी निधी जमवण्यासाठी खूप वणवण केली. एकूण साठ लाखांचा निधी त्यांनी जमवला. त्यामध्ये महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि शरदरावजी पवार या दोघांनी सिंहाचा वाटा उचलला होता. काही रक्कम कोकणातील नगरपालिका आणि तत्सम संस्था, एनरॉन तसेच केशवसुतांचे वंशज, कुटुंबीय, पंकज कुरुलकर, अचला जोशी यांनी स्मारक प्रकल्पास दिली. गोरेगावचे दोशी वकील, रमेश कीर व अशोक बहुलकर यांनी काही गृहोपयोगी वस्तू दान केल्या. पुण्याच्या कवयित्री स्वाती सामंत यांनी आपल्या कवयित्री मैत्रिणींसह काव्यदिंडी गावोगाव नेली आणि जमलेली रक्कम स्मारकाकडे पाठविली. शाळांच्या विद्यार्थ्यांनीही निधी जमवून कोमसापला दिला. अशा तर्हेने समाजातील अनेक घटक या प्रकल्पाच्या निमित्ताने कोमसाप परिवारात सामील झाले आणि संस्थेला बळकटी आली.
केशवसुत स्मारकाचे भाईंचे स्वप्न साकारले गेले. या स्मारकाचे डिझाईन अभय कुलकर्णी या तरुण स्थापत्यकाराने केले होते. स्मारकामध्ये खुला रंगमंच, मोफत वाचनालय, सुसज्ज ग्रंथालय, अतिथी गृह, आधुनिक मराठी काव्यसंपदा दालन (श्रेष्ठ कवींचे समीक्षात्मक परिचयही तेथे लिहिले आहेत) पहावयास मिळते. या स्मारकाचे उद्घाटन कविवर्य कुसुमाग्रज यांचे हस्ते मे 1994 मध्ये झाले. उदघाटनप्रसंगी, केशवसुतांच्या मूळ घरात प्रवेश करताच कुसुमाग्रजांनी तेथील माती कपाळाला लावली आणि म्हणाले ’आज मी धन्य झालो.’ हे स्मारक म्हणजे एक काव्यतीर्थ असल्याचे कुसुमाग्रज आपल्या भाषणात म्हणाले, तेव्हा मधुभाईंना गहिवरून आले. कोमसापकडून एक चांगला प्रकल्प पूर्ण झाला होता.
या संस्थेने आपल्या वाटचालीत खूप महत्त्वाची कामगिरी केली आहे. ती म्हणजे सातत्याने कोकणात साहित्य जागर करणे. लोकांना साहित्याशी जोडून ठेवणे. कोमसपच्या मुंबई, ठाणे, पालघर येथील शाखाही उत्तम काम करत आहेत. कोमसापचे पहिले संमेलन चिपळूण येथे झाले. त्यावेळी अध्यक्ष होते कविवर्य मंगेश पाडगावकर. अध्यक्षाची निवड निवडणूक घेऊन नव्हे तर त्याच्या कार्यावरून सर्वानुमतेच होत असते. तीच प्रथा आजवर कायम आहे. त्यानंतर झालेल्या साहित्य संमेलनात एकापेक्षा एक दिग्गज साहित्यिक अध्यक्षपदासाठी लाभले. श्री. पु. भागवत, श्री. ना. पेंडसे, विंदा करंदीकर, शं. ना. नवरे, वि. वा. प्रभूदेसाई, विजया राज्याध्यक्ष, नारायण सुर्वे, माधव गडकरी, म. सू. पाटील, दिनकर गांगल, भालचंद्र मुणगेकर हे ‘कोमसाप’चे संमेलनाध्यक्ष झाले.
2000 सालानंतर झालेल्या संमेलनांचे अध्यक्ष कवी अशोक नायगावकर, नाटककार व पत्रकार जयंत पवार हे झाले. ही सगळी संमेलने कोकणात गुहागर, महाड, अलिबाग, सावंतवाडी, नवी मुंबई, वसई, केळवे अशा गावातून, शहरातून झाली. त्यामुळे कोकणातील नवीन कवी, लेखकांना चांगले व्यासपीठ मिळाले. प्रथितयश लेखकांचा सहवासही मिळाला. साहित्य विचारांचे आदान प्रदान होत गेले. कवीसंमेलने, कवीकट्टा, साहित्यावरील परिसंवाद अशी साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल आणि कोकणातील निसर्गरम्य पर्यटन, त्यामुळे मुंबई, ठाणे येथील साहित्यप्रेमीही कोकणातील संमेलनांना येऊ लागले. कोमसापची संमेलने गोवा आणि बेळगावातही झाली होती. मधुभाई सर्व लेखक, कवी सभासदांचे हसतमुखाने स्वागत करतात आणि लहान-मोठ्या सर्व लेखकांच्या प्रगतीचा आलेख त्यांच्या लक्षात असतो हे विशेष. त्यांच्यासोबत सुरुवातीपासून काम करणारी मंडळी गजानन पाटील, रेखा नार्वेकर, नमिता कीर, प्रदीप ढवळ, उषा परब, रुबारियो पिंटो, अशोक चिटणीस, भारती मेहता, सुनीता जोशी, एल. बी. पाटील, गजानन परब आणि दत्तात्रय सैतावडेकर अजूनही कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत.
आज कोमसाप ही एक वाङ्मयीन उपक्रम राबवणारी नव्या तरुण कार्यकर्त्यांची उत्साहाने रसरसलेली अशी साहित्य संस्था आहे. अनेक महिला कार्यकर्त्याही संस्थेसाठी काम करत आहेत. महिलांसाठी वेगळे संमेलन करून त्यांच्या विषयांना प्राधान्य देण्याची कल्पना अमलात आणली गेली. कोमसापाची एकूण सहा महिला साहित्य संमेलने झाली. महिलांच्या साहित्यावर विचार करण्याला अग्रक्रम देण्यात आला. डॉ. तारा भवाळकर, वीणा गवाणकर, डॉ. अरुणा ढेरे, उषा मेहता अशा साहित्यिका संमेलनाध्यक्ष म्हणून लाभल्या.
संस्था स्थापन झाल्यापासून 15 वर्षे मधुभाई संस्थापक अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी संस्थेची धुरा खंद्या कार्यकर्त्यांवर सोपवली. न्यायमूर्ती भास्करराव शेटे, पु. द. कोडोलीकर, महेश केळुस्कर, यांनी अध्यक्षपद भूषविले. कोमसापाची कार्यकारणी दर तीन वर्षांनी बदलत असते. नुकत्याच आलेल्या 2021 च्या केंद्रीय कार्यकारिणीने ठाणे जिल्ह्यात अनेक उपक्रमांची रेलचेलच केली. केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर (कोकणातील ‘रत्नागिरी एक्सप्रेस’च्या संपादिका) व केंद्रीय कार्याध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक प्रदीप ढवळ, कार्यवाह माधव अंकलगे व ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी पदे स्वीकारल्यावर लगेचच युवा साहित्य संमेलनाचे ठाण्यात आयोजन केले आणि तरुण लेखकांना या साहित्य दिंडीत सामील करून घेतले. 11-12 जानेवारी 2022 मध्ये काशिनाथ घाणेकर सारख्या भव्य रंगमंदिरात युवा साहित्य संमेलनाचे आयोजन केले. युवाशक्तीच्या केंद्रीय अध्यक्ष दीपा ठाणेकर व त्यांच्या तरुण टीमने अहोरात्र मेहनत करून हे संमेलन यशस्वी केले. ठाणे शहर कोमसापची टीम, तसेच आनंद विश्व गुरुकुलच्या कार्यकर्त्यांची फळी या कार्यात सहभागी होती. या संमेलनात कथाकथन, कवितावाचन याबरोबरच कवितेवरील नृत्येही सादर झाल्याने तरुणाईचा सहभाग वाढला. भव्य रांगोळी प्रदर्शन, नाटके, चर्चा इत्यादी आकर्षणे ठरली.
त्या पाठोपाठ पालघर येथे केंद्रीय कार्यकारिणीने राज्यस्तरीय सहाव्या महिला साहित्य संमेलनाचे आयोजन केले. अपरांत भूमीतील सागरी डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या पालघर जिल्हा या साहित्य सिंचनाने पुलकित झाला. संमेलन समितीवर असलेल्या उषा परब आणि स्वागताध्यक्ष ज्योती ठाकरे (अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य) यांनी उत्तम आयोजन करून संमेलनात शेकडो महिलांचा सहभाग घडवून आणला. सुप्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या संमेलनाध्यक्ष होत्या. ‘आजची आत्मनिर्भर स्त्री ’, ‘साहित्याच्या बदलत्या दिशा’, ‘महिलांचे राजकीय आरक्षण’ अशा काही विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली गेली. महिलांची प्रचंड उपस्थिती लाभली. कवी कट्ट्यावर दोन दिवस महिलांनी स्त्रीजीवनातील अस्पर्श विषयांवरही आपल्या कविता सादर केल्या.
कोमसापने लेखकांना सतत कार्यरत ठेवण्यासाठी काही खास उपक्रम आयोजिले आहेत. ‘झपूर्झा’ हे त्रैमासिक कोमसापचे मुखपत्रच आहे. नमिता कीर आणि कवी दत्तात्रय सैतावडेकर हे संपादक म्हणून काम करत आहेत. ‘झपुर्झा’मधे सभासद लेखक सातत्याने कविता, कथा व लेख लिहीत असतात. 1995 ते 2015 या काळात प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे संकलन नमिता कीर यांनी संपादिका या नात्याने प्रसिद्ध केले.
गेली 25 वर्ष कोकण मराठी साहित्य परिषद वाङ्मय पुरस्कारही जाहीर करत आहे. उत्तम लेखक समोर यावेत, त्यांचे साहित्य वाचले जावे यासाठी हा गुणांचे कौतुक करण्याचा सोहळा असतो. आत्मचरित्र, नाटक, एकांकिका, कादंबरी, एवढेच नव्हे तर वैचारिक साहित्यासाठी संकीर्णवाङ्मयासाठीही पुरस्कार दिले जातात. त्यामुळे नवे नवे लेखक दरवर्षी प्रकाशात येतात. ‘कविता राजधानी’ हा मोठा पुरस्कार साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या कवीला दिले जातो. आजपर्यंत कवी महेश केळुसकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, नीरजा, अनिल कांबळी, सौमित्र अशा अनेक मान्यवर कवींना या पुरस्काराने गौरविले गेले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनात या कवींची मैफल नेहमीच रंगत असते. तसेच कोकणातून साहित्यक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लेखकाला ‘कोकण साहित्य भूषण’ हा पुरस्कार दिला जातो. महाड शाखेतील दोन साहित्यिकांना हा मानाचा पुरस्कार मिळाला होता.
ठाणे शहरात कोमसापाची शाखा प्रा. अशोक चिटणीस यांनी स्थापन केली. तेरा वर्षे ते अध्यक्ष होते. त्यांनी विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या उपक्रमातर्फे साहित्याची ओळख करून दिली. त्यानंतर काही वर्षांनी मी ठाणे शहर अध्यक्ष झाले. सहा वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत मी अनेक साहित्यिक उपक्रम राबवले. त्यात दोन लेखन उपक्रम होते. प्रसिद्ध अशा कथासंग्रह व कादंबऱ्यांवर सभासदांकडून परीक्षणं लिहून घेऊन त्याचे संकलन ‘पुस्तकांवर बोलू काही’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. या उपक्रमात 52 लेखकांनी 80 पुस्तकांची परीक्षणे लिहिली. या पुस्तकाला कोमसापचा संकीर्ण वाङ्मयाचा 2022 चा अरुण नेरूरकर स्मृतीपुरस्कार मिळाला. तसेच मधु मंगेश कर्णिक यांच्या कथासंग्रह, कादंबरी व कविता संग्रह यांवर आस्वादात्मक लेख लिहून त्याचे संकलन ‘मधुबन’ या नावाने प्रसिद्ध केले. यात 45 लेखकांनी भाग घेतला आणि मी संपादक म्हणून काम केले. ‘मधुबन’ या शीर्षकांनी प्रसिद्ध झालेला हा ग्रंथ ‘उद्वेली प्रकाशन’च्या साहाय्याने आम्ही सभासदांनी मधुभाईंच्या 90व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित केला. या ग्रंथाचे प्रकाशन सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे यांचे हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला मधु मंगेश कर्णिक स्वतः आणि नमिता कीर, प्रदीप ढवळ आणि कोमसापचे सभासद असलेले ‘उद्वेली’चे विवेक मेहत्रे यांची उपस्थिती लाभली. लेखकांची तिसरी पिढी कार्यरत झाली आहे. आता नातवंडे लिहू लागली आहेत असा उल्लेख मधुभाईंनी आपल्या मनोगतात केला.
कोमसापचा प्रवास सुरूच राहील. आज एकूण पन्नास ते साठ शाखा कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यात जास्तीत जास्त शाखा आहेत. कोकणातून नवे नवे लेखक महाराष्ट्राला मिळतील. नवी मूल्ये, नव्या संकल्पना येतील. समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील. भाईंचे स्वप्न पूर्ण करायला आम्ही सगळे सतत झटत राहू.
—मेघना साने
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply